





साक्री येथे 78 वा ‘होमगार्ड वर्धापन सप्ताह’ उत्साहात साजरा

β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि .11 डिसेंबर 2024
β⇒साक्री (धुळे), ( प्रतिनिधी : दीपक मोरे ) :– साक्री (धुळे) येथे दिनांक 7 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या आदेशाने 78 वा होमगार्ड वर्धापन सप्ताह विविध उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. 8 डिसेंबर 2024 रोजी साक्री शहरातील पोलीस स्टेशन, सुभाष चौक, श्रीराम मंदिर, पोळा चौक, बस स्टॅंड, आणि गोल्डी पॉइंट असा भव्य रूट मार्च आयोजित करण्यात आला. या रूट मार्चने होमगार्डच्या शिस्तबद्धतेचे आणि राष्ट्रसेवेतील योगदानाचे दर्शन घडवले.

स्वच्छता अभियान आणि रुग्णसेवा
रूट मार्चनंतर साक्री पोलीस स्टेशन आवार, दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसर, आणि शासकीय ग्रामीण रुग्णालय साक्री येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम घेऊन रुग्णसेवा आणि समाजसेवेचा संदेश देण्यात आला. हा कार्यक्रम डॉ. कुणाल भदाणे, तालुका समादेशक मनोज पगार, अंशकालीन लिपिक प्रशांत दाणे, आणि कॉटर गार्ड सार्जंट राजेंद्र बोराळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. या उपक्रमांमध्ये 55 पुरुष होमगार्ड आणि 9 महिला होमगार्ड असा एकूण 64 जणांचा सहभाग होता.
कार्यक्रम यशस्वीपणे साजरा करण्यासाठी जिल्हा कार्यालयाचे केंद्रनायक दिपक चौधरी, प्रशासकीय अधिकारी दिनेश दसनूरकर, आणि पलटण नायक मंगल पाटील यांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रम राबविण्यात आले. होमगार्ड वर्धापन सप्ताह हा राष्ट्रसेवेतील योगदान आणि समाजप्रेरणेचा उत्सव ठरला. या निमित्ताने होमगार्डच्या समर्पणभावनेचे आणि सेवा वृत्तीचे दर्शन घडले.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०