
नाशिक रोड प्रतिनिधी : संजय परमसागर :-
” स्वतःला आणि रस्त्यातील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागरूक व जबाबदार रहा – श्री. सदाशिव गणगे
नाशिकरोड : दिनांक 25 : ” रस्ता सुरक्षा ही प्रत्येक व्यक्तीची सामूहिक जबाबदारी असून यात वाहतूक नियमांचे पालन करणे आणि सुरक्षितपणे वाहन चालवणे तसेच पादचाऱ्यांचे संरक्षण करणे आणि स्वतः सुरक्षित आणि इतरांनाही सुरक्षित ठेवून कुठलीही हानी ना पोहोचवता वाहन चालवणे. त्यासाठी स्वतः हेल्मेट परिधान करून टू व्हीलर चालवणे आणि चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर अवश्य करा व तसे प्रवृत्त करा व वाहतूक नियमांचे व रहदारीचे नियम पालन करा, ” असे युनायटेड वे, मुंबईचे प्रकल्प समन्वयक श्री. सदाशिव गणगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात युनायटेड वे मुंबई व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ” रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यशाळा ” आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सदाशिव गणगे यांचे समवेत महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, विज्ञान शाखेचे उपप्रकार डॉ. सतीश चव्हाण, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर व राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी फारूक मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ट्रेनर विकी उबाळे, वैशाली नेवे, आणि राकेश ढाकणे यांनी उपस्थित एनएसएसच्या विद्यार्थ्यांना सिम्युलेटर मशीन द्वारे प्रशिक्षण देण्यात आले तसेच ड्रग्स बर्स्ट गॉगल द्वारे प्रत्यक्ष माहितीचे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत एकूण १८० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व माहिती पुस्तिका वितरित करण्यात आली. या कार्यशाळेच्या माध्यमातून १५ विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली ‘ रोड सेफ्टी मॅनेजमेंट क्लबची ‘ स्थापना करण्यात आली. कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी ड्रायव्हिंग करण्यासाठी ट्रॅफिक नियमांच पालन करणे गरजेचे आहे सदर प्रशिक्षण मध्ये ट्रॅफिक पोलिस सहकार्य, ट्राफिक सिग्नल स्टॉप लाइन, झेब्रा क्रॉसिंग, गाडीचे मॅन्टेन्स कसे करावे, सीट बेल्टचा वापर करा, ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोनचा वापर करू नये, दारू पिऊन गाडी चालवण्याचे दुष्परिणाम व अपघात वाढीचे कारणे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. कांचन सनानासे यांनी केले तर आभार हे एनएसएस कार्यक्रम अधिकारी फारुख मुलाणी यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. राहुल उपळाईकर यांनी यशस्वीपणे केले.

