

आदिवासी कला व संस्कृतीचे दर्शन: या महोत्सवात कोकणा, कोकणी, महादेव कोळी, वारली या आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरा आणि वेशभूषेचे अनोखे दर्शन घडणार आहे.लोकगीते, लोककथा, दंतकथा, लग्नगीते, परंपरागत खेळ, उत्सव, विधी, हस्तकला, लोकनृत्य, वनौषधींचे पारंपरिक ज्ञान अशा विविध स्वरूपातील सांस्कृतिक वारसा एकाच मंचावर सादर होणार आहे.
परंपरा आणि संस्कृतीचा उत्सव : नाशिक जिल्हा पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड, श्रीभूवन आणि चिंचपाडा या गावांमध्ये अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान दुपारी २ ते ७ या वेळेत हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. या महोत्सवाचा उद्देश आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरा, कला, नृत्य, संगीत, खाद्यसंस्कृती, हस्तकला यांचे संवर्धन करून त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नवा वाव देणे हा आहे.
चिंचपाडा : ठाकर नृत्याचे मोहक सादरीकरण :पावरी वादनाचे मंत्रमुग्ध करणारे सूर ,थाळ गाण्याचा लयबद्ध ठेका
ढाक भक्तीचा दैवी तालडांगी नृत्याची डौलदार झलकनंदी नृत्याची धार्मिकता डेरा वादनासारखी दुर्मिळ महिला लोककला
तर पिंपळसोंड येथे पर्यटकांना तातापाणी येथील गरम पाण्याचे झरे, साखळचोंड धबधबा आणि पारंपरिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.लोककला आणि हस्तकलेचा मेळावा: फेस्टिव्हलमध्ये विविध पारंपरिक कला आणि हस्तकलेचे प्रदर्शनही ठेवण्यात आले आहे. मुखवटे तयार करणारे कारागीर बांबू टोपल्या व शोभिवंत वस्तू बनवणारे कलाकार होडी तयार करणारे पारंपरिक शिल्पकार, वाद्यनिर्मिती करणारे कलाकार :पारंपरिक खाद्यपदार्थ बनविणारे स्थानिक महिला गट, हे सर्व एकाच मंचावर पाहण्याची ही दुर्मिळ संधी पर्यटकांना लाभणार आहे.
नृत्यसंगीताची अविस्मरणीय मैफल : तारपा नृत्य, काबंड नृत्य, ठाकर नृत्य, संबळ वादन, पावरी नृत्य अशा विविध दरीकरणांनी महोत्सवात उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, या सर्व नृत्य-गायन प्रकारांमध्ये स्थानिक आदिवासी समाजाचा सक्रीय सहभाग असून, पिढ्यानपिढ्या चालत आलेला त्यांचा वारसा प्रत्यक्ष पाहण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे.

सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा प्रयत्न :या फेस्टिव्हलचा खरा हेतू केवळ मनोरंजन नाही, तर आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे हा आहे.या निमित्ताने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘आदिवासी सांस्कृतिक विकास आणि सर्वसमावेशक पर्यटन’ या विषयावर चर्चा, व्याख्याने आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत.हे उपक्रम ग्रामीण आर्थिक विकासाला चालना देऊन पर्यटन क्षेत्रात नवे मार्ग खुलं करतील, असा आयोजकांचा विश्वास आहे.
सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची सांगड :पिंपळसोंड, तातापाणी, वांगण, डोल्हारे, चिंचपाडा, श्रीभूवन आणि बर्डा या गावांतील आदिवासी समाज शतकानुशतकं लोकपरंपरा आणि प्रथा जपून ठेवत आहे.या पारंपरिक वारशाचा आधुनिक जगाशी सेतू बांधण्याचे काम या फेस्टिव्हलच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
पर्यटनास चालना:महोत्सवाच्या माध्यमातून सुरगाणा तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटन स्थळे जसे की तातापाणी गरम पाण्याचे झरे, धबधबे, घनदाट जंगल, जैवविविधतेचे अद्भुत दर्शन या सर्व गोष्टी अधिक प्रसिद्ध होतील.
यामुळे स्थानिक ग्रामस्थांना पर्यटन व्यवसायातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
ग्रामस्थ व प्रशासनाचा उत्स्फूर्त सहभाग :या महोत्सवात ग्रामस्थ, स्थानिक स्वयंसेवी संस्था तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे.गावागावांतून आलेले कलाकार, शाळकरी विद्यार्थी आणि महिला मंडळ यांनीही सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीत भाग घेतला आहे.
पर्यटकांना आवाहन:महोत्सवाचे आयोजक व ग्रामस्थ यांनी समाजातील सांस्कृतिक आणि सामाजिक आवड असणाऱ्या नागरिकांना तसेच पर्यटकांना आवाहन केले आहे की –जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, महोत्सवाचा आनंद लुटा आणि आदिवासी समाजाच्या वारशाचे साक्षीदार व्हा. नाशिक अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सव हा फक्त एक सांस्कृतिक मेळावा नाही, तर परंपरा, संस्कृती, निसर्ग आणि आधुनिकतेची सांगड घालणारा सोहळा आहे.यातून केवळ आदिवासी कलांना वाव मिळणार नाही, तर स्थानिकांना रोजगाराच्या संधी, पर्यटनाला चालना आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन होणार आहे. सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड, श्रीभूवन आणि चिंचपाडा या गावांमध्ये होणारा हा महोत्सव राज्यातील आणि बाहेरील पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.
दिव्य भारत बीएसएम न्यूज
सुरगाणा प्रतिनिधी:रतन चौधरी
मुख्य संपादक डॉ. भागवत महाले