
खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतले देवीचे दर्शन, मंडळाच्या कार्याचे केले कौतुक
दिव्य भारत बीएसएम न्यूज : दिनांक :30-09-2025

उरण, ( रायगड ) दि. ३०( विठ्ठल ममताबादे ) :-उरण तालुक्यात नवरात्रौत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो.उरण तालुक्यातील भेंडखळ गावात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ तर्फे नवरात्रौत्सव साजरा होत असून नवरात्रौत्सव साजरा करण्याचे हे यंदाचे २२ वे वर्ष आहे. २००४ पासून सदर नवरात्रौत्सव अखंडितपणे भेंडखळ मध्ये साजरा होत आहे. या नवरात्रौत्सव मध्ये अनेक विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. या मंडळाच्या देवीचे भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात दर्शन घेऊन विविध कार्यक्रमाचा लाभ सुद्धा घेतला आहे. नवरात्रौत्सव दरम्यान मावळ लोकसभा मतदार संघांचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी या मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. मंडळानी आयोजित केलेल्या विविध उपक्रमाचे, कार्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कौतुक केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा, विद्यार्थ्यांचा यावेळी खासदार बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांचाही खासदार बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ चांगले कार्य करीत असून विविध उपक्रम राबवून समाजात जनजागृती करीत आहे. या मंडळाचे कार्य कौतुस्कापद, उल्लेखनीय आहे. अशीच जनतेची सेवा आपल्या हातून घडो असे शुभेच्छा देत खासदार बारणे यांनी मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.नवरात्रौत्सव दरम्यान सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्याध्यक्ष अतुल भगत, अध्यक्ष वैभव भगत, उपाध्यक्ष राकेश भगत, सचिव यतिश भगत, खजिनदार जय भगत, सर्व सल्लागार,सर्व कार्यकारिणी सदस्य, व्यवस्थापकीय सर्व सदस्य, महाप्रसाद समितीचे सर्व सदस्य विशेष मेहनत घेत आहेत.
