





२ डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 🌲
प्रदूषणावर वेळीच नियंत्रण आणले नाही तर मोठा धोका उद्भवू शकतो सावधान!
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि. 1 डिसेंबर 2023
β⇔नागपूर ,ता, 1 ( प्रतिनिधी : रमेश लांजेवार ) :– औद्योगिक क्षेत्रासह संपूर्ण क्षेत्रातील प्रदूषणावर नियंत्रण असने अती आवश्यक आहे.कारण भारतातील प्रदुषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे.औद्योगिक तसेच वैयक्तिक पातळीवर प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडल्याचे दिसून येते व यामुळे गंभीर परिणाम सुध्दा होतांना आपण पहातो.याचा विपरीत परिणाम मानव, पशु-पक्षी,जीव-जंतु, जीवसृष्टी, नैसर्गिक संसाधने, आणि हवामानावर होत आहे.यामुळेच आज आपल्याला स्थल,जल, वायू या तिन्ही ठिकाणी प्रदूषणाचा धोका वाढल्याचे दिसून येते.
२ डिसेंबर १९८४च्या रात्री भोपाळ जवळील युनियन कार्बाईडच्या कारखान्यातून विषारी वायू गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले.हा दिवस भारतसह जगासाठी काळीमा फासणारा ठरला.या दुर्घटनेची आठवण विशेषतः औद्योगिक क्षेत्रासाठी आणि यापुढे अशा घटना घडू नये यासाठी सर्वांनीच काळजी घ्यावी म्हणून २ डिसेंबर हा दिवस भारतात “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” म्हणून पाळला जातो.जगातील औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाशी संबंधित दुर्घटनांमध्ये भोपाळ वायू दुर्घटना सर्वात भीषण आणि महाभयानक समजली जाते.अशाच प्रकारच्या दोन घटना अमेरिकेतील थ्री माईल आयलॅड (१९७९) आणि रशियातील चेर्नोबिल (१९८६) या औद्योगिक क्षेत्रातील भयावह घटना घडल्या होत्या.म्हणजेच पृथ्वीसह संपूर्ण जीवसृष्टीला प्रदूषण विनाशाकडे नेतांना दिसत आहे.मानव हा बुध्दीजीवी प्राणी आहे, त्यामुळे मानवच प्रदूषणावर नियंत्रण ठेवु शकतो.नद्यांच्या काठावर मानवी संस्कृती विकसित झाली.पुढे त्या मानवाच्याच साक्षीने त्या-त्या पध्दतीने सांस्कृतिक धरोहर घोषित करण्यात आली.परंतु ज्या नद्यांच्या काठावर मानवाने आपले वास्तव्य बनवीले त्या नद्यांमध्ये दुषीत पाण्याचा लोंढा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसुन येतो.पाण्याच्या दृष्टीकोनातून नद्यांच्या अवतीभवती मोठमोठी गावे वसायची व त्या नद्यांच्या पाण्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी व पीण्याच्या पाण्यासाठी केला जात असे.परंतु आता परीस्थिती बदलेली दिसून येते.सध्याच्या परिस्थितीत नद्यांच्या अवतीभवती मोठमोठी औद्योगिक वसाहत पहायला मिळते.याच औद्योगिक क्षेत्रातील दुषीत पाणी नदीत सोडल्या जाते.त्यामुळे आपल्याला आजही अनेक मोठमोठ्या नद्या प्रदुषणाचा गंभीर मार झेलतांना दिसतात आणि यामुळे त्यांच्या आजूबाजूचा संपूर्ण परीसरात प्रदूषित झालेला दिसुन येतो.
प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेमध्ये असे लक्षात आले की देशातील प्रमुख नद्यांच्या १५० टापू प्रदूषीत असल्याचे सांगितले आहे.म्हणजेच नदि-नाले,तलाव, हवेतील वातावरण हे संपूर्ण प्रदुषणाकडे मोठ्या प्रमाणात वाटचाल करताना दिसत आहेत.याला मानवाने ताबडतोब रोखले पाहिजे अन्यथा अनर्थ होऊ शकतो.आज भारताची राजधानी दिल्ली प्रदुषणाचे माहेरघर बनली आहे.कारण कधी-कधी प्रदुषणाचे प्रमाण एवढे वाढुन जाते की शाळांना सुट्टी द्यावी लागते.कारण हिवाळ्यामध्ये वायू प्रदूषण अत्यंत धोकादायक स्थितीत येवून ठेपते.देशातील प्रदुषण फटाक्यांनी वाढते ही चुकीची कल्पना आहे.देशातील प्रदुषणामध्ये वाढ मुख्यत्वेकरुन औद्योगिकरण व वाहनांच्या दुषित धुरामुळे मोठ्या प्रमाणात होत आहे.फक्त दिवाळीचे एक-दोन दिवस फटाक्यांमुळे प्रदुषणात वाढ होते.त्याला फटाक्यांमुळे प्रदुषण झाले असे म्हणता येणार नाही.आज भारत प्रदुषणाच्या बाबतीत जगात आठव्या क्रमांकाचा प्रदुषित देश म्हणून गणना होते ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.
भारतात प्रदुषण ही एक मोठी समस्या असुन भारतीय शहरात सरासरी पार्टिक्युलेट मॅटर(पीएम कण)२.५ हे ५३.३ मायक्रोग्रॅम आढळले.हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा १० पट अधिक आहे.हा अहवाल स्वित्झर्लंडची संस्था आयक्यू एअरने दिनांक१४ मार्च २०२३ रोज मंगळवारला”वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट”(जागतिक वायू गुणवत्ता अहवाल) नावाचा आपला अहवाल प्रसिद्ध केला.यावरून आपण समजू शकतो की प्रदुषणाच्या बाबतीत भारत अत्यंत गंभीर व धोकादायक स्थितीत आहे.जगातिल टॉप १०० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी ६५ शहरे एकट्या भारतातील आहेत.यात मुख्यत्वे करून दरभंगा, आसोपूर, पाटणा,नवी दिल्ली, कोलकाता,मुंबई,हैद्राबाद,बंगळूरु, चेन्नई यांचा समावेश आहे.त्यामुळे प्रदूषणाच्या बाबतीत भारताची चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे.वाढत्या प्रदुषणाचे मुख्य कारण म्हणजे वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण, जंगलकटाई, सांडपाणी, मोठ्या प्रमाणात वाहनांचे आवागमन, हवाई वाहतूक इत्यादींमुळे आज पृथ्वीतलावरील संपूर्ण जीवसृष्टीला धोका निर्माण झाला असून भयभीत आहे व यामुळे सर्वांचेच जगने अत्यंत कठीण झाले आहे.परंतु २ डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस या निमित्ताने सर्वांनीच प्रदूषणावर नियंत्रण आणण्याचा संकल्प केला पाहिजे.जी-२० परिषदेत सुध्दा जागतिक स्तरावर प्रदुषण नियंत्रणावर मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली.देशातील शहरीकरण रोखने, औद्योगिकरणावर नियंत्रण ठेवणे, भारतात सरकारी वाहने प्रदुषित धुळ जास्त ओकतात यावर अंकुश लागायला हवा.व देशातील जंगलतोड ताबडतोब थांबवून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हायला पाहिजे.तेव्हाच आपल्याला प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात यश प्राप्त होईल.अन्यथा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो याला नाकारता येत नाही.सावधान!
लेखक :-
रमेश कृष्णराव लांजेवार. (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो .८२०८१८०५१०
