मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत पालघर तालुक्यातील मान ग्रामपंचायतीकडून सर्वांगीण विकासाची उदाहरणीय कामगिरी
दिव्य भारत बीएसएम न्यूज |
डहाणू (पालघर) , (प्रतिनिधी : संजय बहादुरे)
पालघर तालुक्यातील मान ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत राबविलेल्या विविध विकास योजनांमुळे ग्रामविकासाच्या दिशेने भरीव पाऊल टाकले आहे. ग्रामपंचायतीने केवळ मूलभूत सुविधांपुरते मर्यादित न राहता पर्यावरणपूरक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली असून, त्यामुळे मान ग्रामपंचायत आज तालुक्यात आदर्श ठरत आहे.
🔹 पायाभूत सुविधा व ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप:
ग्रामपंचायत कार्यालयासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून त्यामुळे वीजखर्चात बचत तर पर्यावरण रक्षणालाही हातभार लागला आहे. याच धर्तीवर गावातील सर्व पाड्यांमध्ये सौर नळ पाणी योजना राबविण्यात आली असून नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पेयजल उपलब्ध झाले आहे. गावात सौर दिवे बसवून रात्रीच्या वेळी सुरक्षितता व प्रकाशाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
🔹 पाणी, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन :
गावात भूमिगत गटारे, कचरा विलगीकरण शेड, तसेच प्रत्येक कुटुंबाला डस्टबिनचे वाटप करण्यात आले आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करताना ग्रामस्थांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर मिळाला. लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला असून त्यामुळे जलसंधारणास चालना मिळाली आहे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीद्वारे पावसाचे पाणी साठवण्यावर भर देण्यात आला आहे.
🔹 रस्ते, निवारा व सार्वजनिक सुविधा:
गावातील दळणवळण सुलभ करण्यासाठी पानंद रस्ते, काँक्रीट रस्ते विकसित करण्यात आले. स्मशानभूमी, निवारा शेड, तसेच अंत्यविधीसाठी स्टेनलेस स्टील तिरडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी बेंचेस, तर युवकांसाठी व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

🔹 शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील सकारात्मक बदल:
ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी इमारतींचे रंगरंगोटी, CCTV बसवणे, सौरऊर्जा, तसेच शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप या उपक्रमांमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. अंगणवाडी व आरोग्य सेविकांच्या सहकार्याने माता-बाल आरोग्यावरही लक्ष देण्यात आले.
🔹 महिलांसाठी सक्षमीकरण व कौशल्य विकास:
महिला बचत गटांच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात आले. यामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. महिलांच्या सहभागामुळे ग्रामविकास अधिक गतिमान झाला आहे.
🔹 दिव्यांग व सामाजिक घटकांसाठी विशेष योजना: दिव्यांग व्यक्तींना आर्थिक सहाय्य, तसेच विविध सामाजिक घटकांसाठी कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. यामुळे सामाजिक समावेशनाला बळ मिळाले आहे.
🔹 ISO मानांकन : गुणवत्तेची पावती: मान ग्रामपंचायतीला ISO मानांकन प्राप्त झाले असून, हे प्रशासनातील पारदर्शकता, गुणवत्तापूर्ण सेवा व कार्यक्षमतेचे प्रतीक मानले जाते.
🔹 नेतृत्व व लोकसहभाग:
या सर्व विकासकामांसाठी सरपंच मा. सौ. अंजली भावर, उपसरपंच सौ. हिना धोडी, ग्रामपंचायत अधिकारी श्री. रमेश उंदरे, कृषी सहाय्यक सौ. पूजा संखे, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आशा व आरोग्य सेविका, पेसा गाव अध्यक्ष व सदस्य, युवक आणि ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत मान ग्रामपंचायतीने राबविलेल्या या सर्वांगीण योजनांमुळे ग्रामविकासाचा एक आदर्श मॉडेल उभा राहिला आहे. लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि शाश्वत विकास या त्रिसूत्रीवर आधारित मान ग्रामपंचायत आज पालघर तालुक्यात प्रेरणादायी ठरत आहे. ही यशोगाथा इतर ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.

