कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर यांनी “आजच्या काळातील पत्रकारितेचे बदलते स्वरूप” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, “पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला-युवकांचे हक्क, सामाजिक अन्याय यावर आवाज उठवणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे.”

लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, सत्य, पारदर्शकता आणि निर्भीडपणा या मूल्यांवर पत्रकारितेची उभारणी होते. डिजिटल युगात सोशल मीडिया, वेब पोर्टल्स, इलेक्ट्रॉनिक माध्यमे वाढली असली तरीही जबाबदार व मूल्याधिष्ठित पत्रकारिता अधिक महत्त्वाची ठरते.

प्राचार्य पी. के. चव्हाण यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की,“समाज घडविण्यात पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे. वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी आणि विवेकी समाजनिर्मितीसाठी पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.”डॉ. सी. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेकडे करिअर म्हणून पाहण्याचे आवाहन करत, संशोधनात्मक व तथ्याधारित लेखनाची गरज अधोरेखित केली.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी आपल्या अनुभवातून पत्रकारितेतील आव्हाने, ग्रामीण भागातील बातमीदारी, प्रशासनाशी समन्वय, तसेच सामाजिक प्रश्न मांडताना येणाऱ्या अडचणी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.पत्रकार रतन चौधरी यांनी सांगितले की, ग्रामीण पत्रकारिता ही केवळ बातमी देणे नसून ती समाजाच्या प्रश्नांशी जोडलेली असते.दौलत चौधरी यांनी तरुणांनी सत्य पडताळणी (Fact Checking) व नैतिकतेचे भान ठेवण्याचे आवाहन केले.

पत्रकार दिनानिमित्त निबंध व भाषण, प्रश्नोत्तर सत्र, विचारमंथन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पत्रकारितेच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारून संवाद साधला. यामुळे कार्यक्रम अधिक जिवंत व संवादात्मक ठरला.

कार्यक्रमास व्ही. डी. पगार, एन. डी. पाटील, पी. डी. पाटील, एस. जी. पाटील, बी. जे. देवरे, एल. व्ही. महाजन, डी. ए. शेवाळे, श्रीमती एन. आर. बोरसे, आर. आर. सोनवणे आदी प्राध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप प्रेरणादायी वातावरणात झाला. विद्यार्थ्यांमध्ये पत्रकारितेविषयी जाणीव, कुतूहल व सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यास हा कार्यक्रम यशस्वी ठरला.