गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
“आज महिलांनी गाठलेले यश सावित्रीबाईंच्या संघर्षाचे फलित” – प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत
दिव्य भारत बीएसएम न्यूज : दि. 7 जानेवारी 2026
पालघर | (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके):-

पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘स्त्री शिक्षणाच्या जननी’ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. महिला विकास विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक क्रांतीला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविकात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. “आजच्या आधुनिक युगात महिलांनी शिक्षण, विज्ञान, प्रशासन, उद्योग, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात जे यश संपादन केले आहे, त्याचा पाया सावित्रीबाई फुले यांनी उभा केला आहे. समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी जो संघर्ष केला, तो आजच्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरावा,” असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रत्येक विद्यार्थिनीने सावित्रीबाईंच्या जीवनातील धैर्य, जिद्द व समाजपरिवर्तनाची प्रेरणा आत्मसात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सहा. प्रा. निलेश साळवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सावित्रीबाई फुले यांनी केवळ अक्षरओळख करून दिली नाही, तर महिलांना सन्मानाने जगण्याचे बळ दिले. आज महिलांची प्रगती ही त्यांच्या संघर्षाचीच देण आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले.”
कार्यक्रमात विद्यार्थिनींचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित स्वयंरचित व संकलित कविता सादर केल्या. त्यांच्या कवितांतून सावित्रीबाईंच्या सामाजिक संघर्षाचे, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे व त्याविरोधात उभ्या केलेल्या लढ्याचे प्रभावी चित्रण करण्यात आले. “भिडावरचे दगड-शेण झेलणारी माऊली”, “ज्ञानाचा दीप हातात घेऊन अंधाराशी लढणारी सावित्री” अशा ओळींनी उपस्थितांची मने भारावून गेली. काही विद्यार्थिनींनी भाषणातून सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले यांनी खांद्याला खांदा लावून केलेल्या कार्याचा उल्लेख करत समाजपरिवर्तनातील त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील २२० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य डॉ. आर. एन. पवार, डॉ. वैभव माने, ग्रंथपाल डॉ. अर्जुन होन यांच्यासह महाविद्यालयातील सर्व सहाय्यक प्राध्यापकांची उपस्थिती लाभली. महिला विकास विभाग व सांस्कृतिक विभागाच्या समिती सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका सुजाता गावित यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर सहाय्यक प्राध्यापिका हर्षाली दुबळा यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. एकूणच, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करताना महाविद्यालयात सामाजिक जाणीव, स्त्री-पुरुष समानतेचा संदेश आणि शिक्षणाच्या सामर्थ्याची प्रखर जाणीव निर्माण झाली. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : दि. 7 जानेवारी 2026
पालघर | (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके):-
