हजरत जमादार बाबा दर्गा हे येडशी गावातील श्रद्धास्थान आहे. दररोज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. मात्र दर्ग्याच्या समोरच घरगुती कचरा, खरकटे अन्न, प्लास्टिक पिशव्या, ओला-सुका कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना नाक दाबून जावे लागते, तर काही वेळा कचऱ्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पहाटेच्या सुमारास काही महिला घरातील कचरा थेट दर्गा परिसरात आणून टाकतात. यामुळे कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत जातात. एकदा कचरा साचला की इतर नागरिकही तिथेच कचरा टाकू लागतात आणि काही दिवसांतच संपूर्ण परिसर अस्वच्छ बनतो.

या समस्येबाबत यापूर्वीही दिव्य भारत बीएसएम न्यूजच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला होता. 4 नोव्हेंबर रोजी “येडशी ग्रामपंचायतीचा कचराकांड – हजरत जमादार बाबा दर्गा परिसरात घाणीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त” अशी बातमी प्रकाशित झाल्यानंतर घंटागाडीच्या गुत्तेदाराने तातडीने दखल घेत कचरा हटविला होता. मात्र ही कारवाई तात्पुरती ठरली. कचरा हटवल्यानंतर अवघ्याच दुसऱ्या दिवसापासून पुन्हा त्या ठिकाणी कचरा टाकण्यास सुरुवात झाली.

पत्रकारांनी पुन्हा कचऱ्याचे ढीग पाहून संबंधित गुत्तेदाराशी संपर्क साधला असता, गुत्तेदाराने सांगितले की ग्रामपंचायतीने त्यांना घंटागाडीच्या कामावरून काढून टाकले आहे. त्यामुळे कचरा उचलण्याशी आता त्यांचा काहीही संबंध नाही. या घटनेनंतर एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे—जर ग्रामपंचायतीने गुत्तेदाराला कामावरून काढले असेल, तर येडशी गावातील कचरा उचलण्याची जबाबदारी सध्या कोणाची आहे? आणि दर्गा परिसरातील साचलेला कचरा हटविणार कोण?

महाराष्ट्र शासनाकडून ग्रामस्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियान अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र येडशीसारख्या मोठ्या गावात जर मुख्य रस्त्यालगत, धार्मिक स्थळासमोर कचऱ्याचे ढीग साचलेले असतील, तर या योजनांचा प्रत्यक्षात उपयोग काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. ग्रामपंचायतच जर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असेल, तर गाव स्वच्छ कसे राहणार?

कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे केवळ दुर्गंधीच नव्हे, तर डास, माश्या, उंदीर यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

येडशीतील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीकडे पुढील मागण्या केल्या आहेत—

हजरत जमादार बाबा दर्गा परिसरातील ही समस्या केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून, ती गावाच्या आरोग्य, श्रद्धा आणि प्रतिष्ठेशी संबंधित आहे. वारंवार तक्रारी होऊनही जर ठोस उपाययोजना होत नसतील, तर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे येडशी ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

जर वेळेत कारवाई झाली नाही, तर ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. आता येडशी ग्रामपंचायत या गंभीर प्रश्नाकडे कधी आणि कसा लक्ष देते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.