या मेळाव्याच्या व्यासपीठावर माजी सभापती जनार्दन भोये, उत्तम कडू, सावळीराम पवार, इंद्रजित गावित, विजय घांगळे, भिका राठोड, चंद्रकांत वाघेरे, वसंत बागुल, भरत पवार, अशोक धुम, परशराम गावित, कैलास भोये, सदू बागुल, चिंतामण गवळी, नितीन गावित, भारती चौधरी, मनिषा महाले, मेनका पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच तालुक्यातील विविध विभागांतील शासकीय अधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना जे. पी. गावित म्हणाले की,“महाराष्ट्रात सर्वाधिक वनपट्टे लाभार्थी सुरगाणा तालुक्यात आहेत. हे शक्य झाले कारण माकपच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी बांधवांना योग्य मार्गदर्शन केले.”

ते पुढे म्हणाले की,

  • सुरगाणा – १३ हजार
  • पेठ – ५ हजार
  • त्र्यंबकेश्वर – ४ हजार
  • दिंडोरी – ४ हजार
  • कळवण – ३ हजार
  • चांदवड – २ हजार
  • सिन्नर व नाशिक – प्रत्येकी ३ हजार

या प्रमाणे किसान सभेच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड झाली आहे.

वनपट्टेधारकांच्या ताब्यात कसत असलेल्या जमिनीचा पूर्ण हक्क मिळावा, अशी मागणी करत गावित म्हणाले,“ज्यांच्या ताब्यात पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे, त्या जमिनीचा संपूर्ण ताबा सरकारने द्यायलाच हवा. कायद्याची अंमलबजावणी प्रभावी झाली पाहिजे.”

वनजमिनीच्या हक्कासाठी झालेल्या संघर्षाची आठवण करून देताना त्यांनी सांगितले,“या लढ्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला आहे. जेलभरो आंदोलनाच्या काळात तुरुंगात जागा उरली नव्हती. न्यायालयालाच तुरुंगात यावे लागले, हा इतिहास माकपने रचला आहे.”एका गर्भवती महिलेला जेलमध्येच प्रसूती झाली, आणि त्या बाळाचे नावच ‘जेलसिंग’ ठेवण्यात आले, ही घटना संघर्षाची तीव्रता दर्शवते.

वनपट्ट्याबाबत पात्रतेची माहिती देताना गावित म्हणाले,“२००० पूर्वीचे अतिक्रमण असेल तरच जमीन मिळू शकते. ही माहिती नसल्याने अनेक पक्षांनी भरलेले अर्ज निकाली काढण्यात आले.”ते पुढे म्हणाले,“केवळ जेलभरो आंदोलनात सहभागी झालेल्यांचेच दावे पात्र ठरले.”

गावित यांनी आपल्या भाषणात भावनिक शब्दांत सांगितले,“जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत गोरगरीब जनतेची सेवा करत राहणार. जमीन ही कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भूमिहीन असेल तर माणसाला घाटावर जावे लागते.”जमीन हीच उपजीविकेचा आधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मेळाव्यात नव्याने वनजमिनीचे प्रकरण कसे करायचे, अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यामुळे उपस्थित आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला.

या मेळाव्यामुळे सुरगाणा तालुक्यातील वनपट्टेधारकांचा संघर्ष अधिक बळकट झाला असून ताब्यातील जमिनीचा संपूर्ण हक्क मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

सुरगाणा तहसील कार्यालयाच्या आवारात आयोजित वनपट्टेधारक मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी आमदार जे. पी. गावित