गुढीपाडव्याच्या मंगलदिनानिमित्त सर्वत्र नववर्षाचे स्वागत होत असताना, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मात्र आपल्या दुःखाची गुढी उभारली आहे. मागील 1022 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला आज नव्या वर्षाच्या निमित्ताने विशेष धार आली.शेतकरी कर्जमुक्ती समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सरकारने जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीच्या निकषावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी सांगितले की, “सरकारने पात्र-अपात्र असा निकष लावून कर्जमाफीची घोषणा केली, पण यामुळे फक्त बँकांचे हित साधले गेले. शेतकऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य मात्र ढासळले आहे.”

बँकांनी शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करण्याच्या नोटिसा पाठवल्या, लिलावाच्या कारवाया केल्याने शेतकरी चिंतेत आहेत. याच्या विरोधात 1022 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, मात्र सरकार दखल घेत नाही.समितीने आधी बँकांच्या नोटिसा रामकुंडात बुडवून निषेध केला. आमदारांच्या दारापुढे ढोल-ताशे वाजवून निषेध व्यक्त केला. सरकारने गाजर दाखवले म्हणून गाजर आंदोलनही केले. तरीही सरकारने लक्ष दिले नाही.

गुढीपाडव्याच्या दिवशी आंदोलन स्थळावर शेतकऱ्यांनी “दुःखाची गुढी” उभारली. शेतकऱ्यांची कैफियत मांडताना समितीने स्पष्ट केले की, आता 56 हजार शेतकरी व समिती सदस्य काळ्या टोपी घालून सरकारचा निषेध करतील.

समिती अध्यक्ष भगवान बोराडे, आदिवासी विकास संस्था अध्यक्ष कैलास बोरसे, स्वाभिमान भारत पक्ष अध्यक्ष मोती नाना पाटील, सदस्य दिलीप पाटील व खेमराज कोर यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांची पीडा लक्षात घेऊन सरकारने तातडीने कर्जमुक्ती द्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा देण्यात आला आहे.