पालघर फटाका कारखाना स्फोट प्रकरण: डॉ. नीलम गोऱ्हे यांची घटनास्थळी पाहणी; कामगार सुरक्षेसाठी औद्योगिक आराखड्याची गरज अधोरेखित

दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार : दिनांक : २३ एप्रिल २०२६

पालघर, दि. २३ (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके ):

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाई गावात घडलेल्या अनधिकृत फटाका कारखान्यातील भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.डॉ. गोऱ्हे यांनी कोनसाई गावातील स्फोटग्रस्त ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत त्यांनी संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. दुर्घटनेचे कारण, कारखान्याची कायदेशीर स्थिती, सुरक्षा उपाययोजना याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.

यानंतर त्यांनी वाडा येथील शासकीय रुग्णालयात जाऊन जखमी कामगारांची भेट घेतली. जखमींची विचारपूस करत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि त्यांना धीर दिला. तसेच जखमींच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्ट केले की, या दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी त्या स्वतः पाठपुरावा करणार आहेत. तसेच या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी पोलीस, महसूल, कामगार व औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना, अनधिकृत कारखान्यांवर नियंत्रण आणि कामगारांच्या हक्कांचे संरक्षण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या चर्चेची माहिती दिली.डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने जिल्ह्यातील सर्व अधिकृत कारखान्यांची यादी जाहीर करावी. या यादीची नियमित पडताळणी पोलीस पाटील आणि ग्रामसेवकांनी करणे आवश्यक आहे. जर ग्रामसेवक अनुपस्थित असतील, तर ही जबाबदारी पोलीस पाटलांनी पार पाडावी, आणि ज्या ठिकाणी पोलीस पाटील उपलब्ध नसतील, तेथे संबंधित पोलीस निरीक्षकांनी ही जबाबदारी स्वीकारावी.त्यांनी पुढे नमूद केले की, ज्या ठिकाणी दहा किंवा त्याहून अधिक कामगार कार्यरत आहेत, तेथे कामगार कायदे काटेकोरपणे लागू करणे अत्यावश्यक आहे. महसूल, ग्रामविकास, कामगार आणि औद्योगिक सुरक्षा विभागांनी समन्वयाने काम केल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात.

प्रत्येक कारखान्यात आवश्यक सुरक्षा उपाययोजना अनिवार्य करण्यात याव्यात, तसेच ‘फायर रक्षक’ नेमण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आग, स्फोट किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.कामगारांच्या सुरक्षिततेसाठी एक व्यापक ‘सुरक्षिततेचा औद्योगिक आराखडा’ तयार करण्याची गरज असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी ठामपणे मांडले. या आराखड्यात सुरक्षा प्रशिक्षण, नियमित तपासणी, आपत्कालीन यंत्रणा, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि अनधिकृत उद्योगांवर नियंत्रण यांचा समावेश असावा, असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच कामगारांच्या शोषणासंदर्भातील तक्रारी ग्रामविकास विभागाने नोंदवाव्यात आणि त्यावर तातडीने कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी दिली. कामगारांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक हक्कांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या घटनेचा सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात येणार असून शासनस्तरावर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगार भावेश वावरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळू नये आणि त्याच्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सक्षम सरकारी वकिलांची नेमणूक करण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.या पाहणी दौऱ्यात भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, वाडा-विक्रमगड प्रांताधिकारी डॉ. संदीप चव्हाण, वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, पंचायत समिती गट विकास अधिकारी सुनील गवारी, कामगार विभागाचे अजित मोहिते, ग्रामसेविका वैभवी भोईर, सरपंच कैलास टोके, उपसरपंच निलेश मोकाशी तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकूणच, कोनसाई येथील ही दुर्घटना औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर इशारा देणारी ठरली आहे. प्रशासनाने यापुढे अधिक सजग राहून कठोर उपाययोजना केल्यास अशा घटना टाळता येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार : दिनांक : २३ एप्रिल २०२६