दिव्य भारत बीएसएम न्यूज : दिनांक : १ मे २०२६

शैक्षणिक, सामाजिक व संशोधन क्षेत्रातील २५ वर्षांच्या कार्याची दखल —प्रोफेसर डॉ. भागवत शंकर महाले यांना ‘सकाळ गौरवगाथा पुरस्कार 2026’ प्रदान
नाशिक, दिनांक : १ (प्रतिनिधी) :- मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. भागवत शंकर महाले यांच्या शैक्षणिक, पत्रकारिता , सामाजिक आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना पुणे सकाळ मध्यम समूह संस्थे तर्फे ‘सकाळ गौरवगाथा पुरस्कार 2026’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी नाशिक येथे एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला.
या वेळी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, फ्रावशी अकॅडमीचे अध्यक्ष रतन लथ तसेच ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर यांच्या हस्ते डॉ. महाले यांना सन्मानित करण्यात आले. मराठी भाषेतील अग्रगण्य दैनिक असलेल्या ‘सकाळ’तर्फे दिला जाणारा हा पुरस्कार त्यांच्या २५ वर्षांच्या विविधांगी कार्याची दखल घेत प्रदान करण्यात आला आहे.
डॉ. महाले हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विशेषतः गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांसाठी तयारी, तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचे कार्य त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले आहे. आतापर्यंत त्यांनी ३५ हून अधिक विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला आहे. याशिवाय, अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करून पीएच.डी.पर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे. संशोधन क्षेत्रातही डॉ. महाले यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे ६० संशोधन निबंध प्रकाशित केले असून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच त्यांनी ९ पुस्तकांचे लेखन केले असून त्यामध्ये सामाजिक, राजकीय आणि आदिवासी विषयांवर सखोल अभ्यास करण्यात आला आहे. या पुरस्कार समारंभात त्यांच्या “महाराष्ट्रातील आदिवासी समाजजीवन” आणि “महाराष्ट्रातील जात जमात पंचायती” या दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांमुळे समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र क्षेत्रात महत्त्वपूर्ण भर पडणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
सामाजिक क्षेत्रातही डॉ. महाले यांनी भरीव काम केले आहे. पाणीटंचाई, रस्त्यांची समस्या, गरिबांच्या वैद्यकीय खर्चासाठी मदत, तसेच विविध सामाजिक अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष काम केले आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे.राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपला अनुभव वाढवण्यासाठी २०२४ मध्ये कळवण–सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ही त्यांची पहिलीच निवडणूक असली तरी त्यांनी या माध्यमातून लोकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
या सन्मानप्राप्तीबद्दल मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस अँड .नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराव मोगल, चिटणीस दिलीप दळवी तसेच नाशिक (ग्रामीण) संचालक रमेश पिंगळे, बागलाण संचालक डॉ. प्रसाद सोनवणे, कळवण संचालक रवींद्र (बाबा) देवरे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, प्राचार्य डॉ. कल्पना अहिरे, डॉ. सोपान कुशारे, निवृत्त प्राचार्य डॉ. पुंडलिक देवरे, संशोधन मार्गदर्शक डॉ. अजय गव्हाणे, डॉ. अरुण वनारसे, प्रा. मनोज मगर, डॉ. रमेश निकम, डॉ. संदीप निकम, डॉ. राजेंद्र हिरे, डॉ. मनोहर जोपले, श्री. सचिन कोठावदे, प्रा. मंगेश गांगुर्डे, डॉ. जया शिंदे, प्रा. श्रीमती शाश्वती निरभवणे यांच्यासह अनेक सहकारी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी फोन व सोशल मीडियाद्वारे त्यांचे अभिनंदन केले.
प्रोफेसर डॉ. महाले यांच्या या यशामुळे त्र्यंबकेश्वर तसेच नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळत असून भविष्यातही ते शिक्षण, संशोधन आणि समाजसेवा या क्षेत्रांत असेच योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : दिनांक : १ मे २०२६