

येडशी येथे गजानन भैय्या नलावडे यांच्या पुढाकारातून महिला सन्मान योजनेअंतर्गत लालपरी बसद्वारे पुरूषोत्तम पुरी देवदर्शन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
दिव्य भारत बीएसएम न्यूज
येडशी |( प्रतिनिधी : सुभान शेख):-
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्यासाठी माजी उपसरपंच तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते गजानन भैय्या नलावडे यांनी स्वखर्चातून राबविलेल्या विशेष उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पुरूषोत्तम पुरी, योगेश्वरी देवी (अंबेजोगाई), वैजनाथ परळी आदी प्रमुख धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी लालपरी बसची व्यवस्था करून शेकडो महिलांना मोफत प्रवास व दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि धाराशिव-कळंब मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, येडशी परिसरातील महिलांसाठी तो विशेष आकर्षणाचा विषय ठरला आहे.
महिला सन्मान योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना धार्मिक पर्यटनाची संधी मिळावी या उद्देशाने गजानन भैय्या नलावडे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाशी संपर्क साधून विशेष लालपरी बसची व्यवस्था केली. दिनांक ३१ मे रोजी पहाटेच्या सुमारास येडशी बसस्थानकातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी तीन लालपरी बसेस मागविण्यात आल्या होत्या.
यावेळी बसचे विधिवत पूजन करण्यात आले. बसला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडण्यात आले तसेच विशेष बॅनर लावून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी तीन बसेसमधून एकूण १३६ महिला पुरूषोत्तम पुरी व अन्य धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी रवाना झाल्या. महिलांच्या सोयीसाठी प्रत्येक बसमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय चहा, बिस्किटे तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता दुसऱ्या टप्प्यात दिनांक २ जून रोजी पुन्हा तीन बसेसची व्यवस्था करण्यात आली. या दिवशी तब्बल १६५ महिला दर्शनासाठी रवाना झाल्या. महिलांच्या प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक बसमध्ये पिण्याच्या पाण्याचे कॅन ठेवण्यात आले होते. तसेच महिलांना राजगिऱ्याचे लाडू वाटप करून त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली.
उपक्रमाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे दिनांक ३ जून रोजी आणखी दोन बसेसची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे ९० महिलांना या दिवशी देवदर्शनासाठी रवाना करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या संपूर्ण उपक्रमामुळे येडशी परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे अनेक महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना गजानन भैय्या नलावडे यांचे मनापासून कौतुक केले. ग्रामीण भागातील अनेक महिलांना धार्मिक स्थळांना भेट देण्याची इच्छा असते; मात्र आर्थिक अडचणी किंवा वाहतुकीच्या अभावामुळे त्यांना ती पूर्ण करता येत नाही. अशा महिलांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांनी सांगितले की, यापूर्वीही त्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून यावेळीही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान पाणी, अल्पोपहार आणि आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात आल्यामुळे त्यांना कोणताही त्रास झाला नाही. धार्मिक स्थळांचे दर्शन घेताना मिळालेला आध्यात्मिक आनंद अविस्मरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
येडशीतील महिला भगिनींनी गजानन भैय्या नलावडे यांचे विशेष आभार मानत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक सहभागासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून या उपक्रमाची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू असून सामाजिक, धार्मिक आणि जनहिताच्या कार्यांमध्ये गजानन भैय्या नलावडे यांचा सक्रिय सहभाग असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महिलांना देवदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या प्रवासाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून केलेले नियोजन हे कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या उपक्रमामुळे महिला सन्मान योजनेचा लाभ प्रत्यक्षात तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. धार्मिक पर्यटनास चालना मिळण्याबरोबरच महिलांमध्ये सामाजिक एकात्मता आणि आत्मविश्वास वाढण्यासही मदत होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
यावेळी माजी उपसरपंच तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते गजानन भैय्या नलावडे, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष अमोल पवार, बाळासाहेब पवार, गणेश पवार, अशोकराव देशमुख, सुभान शेख, विकास (बिबन) नलावडे, भारत पवार, अनंत जमाले, एसटी कर्मचारी बालाजी नागटिळक, ऋषिकेश पवार तसेच येडशी गावातील अनेक ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांच्या धार्मिक भावना जपत त्यांना सन्मानपूर्वक देवदर्शनाची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम येडशी परिसरात कौतुकाचा विषय ठरत असून, सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडणाऱ्या गजानन भैय्या नलावडे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.
दिव्य भारत बीएसएम न्यूज
प्रतिनिधी: सुभान शेख


