दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार, दिनांक :१६ जून २०२६

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ३० कोटींच्या अत्याधुनिक शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण
आजचे विद्यार्थीच देशाचे भवितव्य,….अपर मुख्य सचिव (महसूल)-विकास खारगे

पालघर,(प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके ):- दि १५ जून २०२६ : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत, नव्या शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात आणि ३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण अशा दुहेरी आनंदाच्या वातावरणात डहाणू तालुक्यातील सूत्रकार येथील शासकीय आश्रम शाळेत सोमवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना, “आजचे विद्यार्थी हेच देशाचे भवितव्य असून त्यांचे स्वागत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमास आमदार विनोद निकोले, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, सहाय्यक प्रकल्प अधिकारी बन्सीलाल पाटील, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विकास खारगे म्हणाले की, पूर्वीच्या काळात विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीने स्वागत होत नव्हते. मात्र आता शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून शासन, शिक्षक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्रितपणे विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, वह्या आणि शालेय साहित्य उपलब्ध झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सूत्रकार येथील नव्याने उभारलेल्या शाळा इमारतीसह मुला-मुलींसाठीच्या स्वतंत्र वसतिगृहांचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने शासनाचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. इमारतींच्या उभारणीनंतर त्यांच्या देखभालीकडेही विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
आदिवासी मुलींना प्रेरणा देताना त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांचे उदाहरण दिले. “मुली डॉक्टर, आयएएस अधिकारी, शास्त्रज्ञ, अभियंता किंवा पोलीस अधिकारी होऊ शकतात. त्यासाठी शिक्षणाची साथ आणि पालकांचा पाठिंबा आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. पालकांनी मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी महसूल विभागाच्या विविध योजनांची आणि जमीन हक्कांबाबतच्या कायद्यांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचावी यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पुस्तकाची माहिती दिली. सातबारा, वारसा हक्क आणि जमीन मालकीसंबंधीचे अधिकार नागरिकांना सहज समजावेत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुलांच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या विविध योजनांमुळे आदिवासी भागातील शिक्षणाला नवी दिशा मिळत आहे .यावेळी अपर मुख्य सचिव विकास खरगे यांनी ग्रामपंचायत गंजाड येथे वनपाट्टे धारकासाठी ई केवायसी शिबीर व जि. प. शाळा कोटबी-बुजडपाडा येथे भेट दिली.
दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार, दिनांक :१६ जून २०२६

