११८ वर्षांच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव : गोखले एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सेवा गौरव समारंभ उत्साहात संपन्न

दिव्य भारत बीएसएम न्यूज: शुक्रवार , दिनांक : 24 जुलै 2026
नाशिक | प्रतिनिधी : छाया लोखंडे
शिक्षण, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची तब्बल ११८ वर्षांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सेवा गौरव समारंभ शुक्रवार, दिनांक . २४ जुलै २०२६ रोजी नाशिक येथील गुरुदक्षिणा इमारतीतील पलाश सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांतील दहावी व बारावीच्या सार्वजनिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव, खजिनदार व मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या महापौर सौ. हिमगौरी आडके, तर विशेष अतिथी म्हणून नासा स्पेस एज्युकेटर सौ. अपूर्वा जाखडी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे आणि चेअरमन डॉक्टर . सुहासिनी संत उपस्थित होत्या. यावेळी श्री. प्रदीप देशपांडे, प्राचार्य डॉ . राम कुलकर्णी, श्री. अक्षय देशपांडे, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, विविध शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एस. एम. आर. के. महिला महाविद्यालयाच्या संगीत विभागातील विद्यार्थिनींनी सुमधुर ईशस्तवन सादर करून वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर संस्थेचे प्रेरणादायी गोखले एज्युकेशन सोसायटी गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ . सुहासिनी संत यांनी संस्थेच्या ११८ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारमूल्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व या संस्थेच्या मूलभूत ध्येयधोरणांवर प्रकाश टाकला. त्यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देत कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली.प्रमुख अतिथी महापौर हिमगौरी आडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ शैक्षणिक यश नव्हे, तर सुरक्षित, जबाबदार आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडविताना जीवन सुरक्षित ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. उत्तम चारित्र्य, शिस्तबद्ध आचरण, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी ही आदर्श नागरिकांची ओळख आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सामाजिक माध्यमांच्या वाढत्या प्रभावाच्या युगात विद्यार्थ्यांनी दिशाभूल होऊ न देता स्वतःच्या बुद्धिमत्तेचा सकारात्मक वापर करून ज्ञानार्जनाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.” त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात संस्थेच्या शैक्षणिक आणि वैचारिक वाटचालीचे दर्शन घडविणारी ‘स्वयंप्रकाश’, ‘स्वयंप्रेरणा’, तसेच IMKE ही प्रकाशने प्रकाशित करण्यात आली. याचबरोबर डॉ. राम कुलकर्णी लिखित ‘सुजाण पालकत्वाची २१ सूत्रे’ आणि ‘Handbook for Senior Citizens’ या महत्त्वपूर्ण ग्रंथांचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशनांमुळे शिक्षण, पालकत्व आणि सामाजिक जाणिवा अधिक व्यापक होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.विशेष अतिथी अपूर्वा जाखडी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना विज्ञान, अवकाश संशोधन आणि एरोस्पेस अभियांत्रिकी क्षेत्रातील अमर्याद संधींची माहिती दिली. त्यांनी नासा आणि विज्ञान भारतीच्या ‘स्पेस ऑन व्हील’ या उपक्रमाची सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे जिज्ञासू दृष्टीने पाहावे, संशोधनाची आवड जोपासावी आणि जागतिक पातळीवरील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने आरुषी निकम आणि आर्या कोतकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या यशामागील पालक, शिक्षक आणि संस्थेच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ दीप्ती देशपांडे यांनी जीवनमूल्यांवर आधारित अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले. त्या म्हणाल्या, “जीवन ही आनंदाच्या शोधाची अखंड यात्रा आहे. प्रत्येक व्यक्ती आनंदाच्या शोधात असते; मात्र स्वतःचा आनंद शोधताना समाजाप्रती असलेली बांधिलकी विसरता कामा नये. समाजातील दुर्बल, मागास आणि वंचित घटकांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविणे हे गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख ध्येय आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडविणे हीच आमची खरी सेवा आहे.”या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे संस्थेच्या विविध शाळा आणि महाविद्यालयांतील दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेला गौरव होय. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे, प्रमाणपत्रे आणि शुभेच्छा देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात अनेक दशके समर्पित सेवा देणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांचाही भावपूर्ण सत्कार करण्यात आला. विशेष अतिथी अपूर्वा जाखडी यांच्या हस्ते सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. विष्णू उगले यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी संस्थेचे विभागीय सचिव डॉ . राम कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ . स्नेहा रत्नपारखी यांनी केले.शिक्षण, संस्कार, गुणवत्ता आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर संगम घडविणारा हा विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सेवा गौरव समारंभ नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि संस्मरणीय सोहळा ठरला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना शिक्षकांच्या योगदानालाही सन्मान देणारी गोखले एज्युकेशन सोसायटीची ही परंपरा आगामी काळातही शिक्षण क्षेत्राला प्रेरणा देणारी ठरेल, अशी भावना उपस्थित मान्यवर आणि शिक्षणप्रेमींनी व्यक्त केली.
दिव्य भारत बीएसएम न्यूज
मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले
प्रतिनिधी :छाया लोखंडे
दिव्य भारत बीएसएम न्यूज: शुक्रवार , दिनांक : 24 जुलै 2026

