दिव्य भारत बीएसएम न्यूज: शुक्रवार ,दिनांक : 24 जुलै 2026

सुरगाणा तालुक्यावर अतिवृष्टीचा कहर : पुरात शेतकऱ्याचा मृत्यू, भूस्खलन, पूल पाण्याखाली; जनजीवन पूर्णतः विस्कळीत, खड्यांचे साम्राज्य प्रवाश्यांचे हाल
दिव्य भारत बीएसएम न्यूज
दिनांक 23 जुलै 2026
सुरगाणा (नाशिक )(| प्रतिनिधी: रतन चौधरी ):-
सुरगाणा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसाने अक्षरशः थैमान घातले असून संपूर्ण तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग ३६ तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी फरशी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे शेती, घरे, रस्ते, वीजपुरवठा आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान ” मधला तळपाडा ते सुरगाणा” आणि “सुरगाणा ते अहवा” हा अंतराराज्य महामार्ग अतिशय खराब झालेला आहे. फारशी पूल तुटला आहे.त्यामुळे वाहतूकिस मोठे खड्डे पडलेले असल्याने प्रवाश्यांचे हाल होत आहे. भोरमाळ येथील शेतकरी पुंडलिक मोतीराम चव्हाण (वय ४२) हे २२ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गावातून आपल्या शेताकडे जात असताना नाल्यात आलेल्या पुराच्या पाण्यात पाय घसरून वाहून गेले. स्थानिक नागरिक व प्रशासनाने शोधमोहीम राबविल्यानंतर त्यांचा मृतदेह नाल्यात आढळून आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली आहे. लाडगाव येथील गोविंद सोनू चौधरी तसेच म्हैसमाळ येथील खंडू माले यांच्या घरांच्या भिंती कोसळून मोठे नुकसान झाले आहे. गायधरपाडा (हतगड) येथील राजू मोतीराम पवार यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने घराचे नुकसान झाले आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मांडवे येथील शेतकरी विठ्ठल लहानू जाधव यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या विहिरीलाही मोठी हानी पोहोचली आहे. ठाणगाव येथील झरीचा तलाव फुटल्याने परिसरातील नऊ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. यात सुभाष महाले, गुलाब महाले, नारायण महाले, जयराम महाले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे. अंबोडे येथील सुभाष अमृता महाले, धरमू गोविंद ठाकरे आणि गोविंद चंदर घांगळे यांच्या भातशेतीचेही अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी साठवण बंधारे फुटल्याने सुपीक जमीन खरडून गेली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्ते आणि पूल वाहतुकीसाठी बंद झाले होते. बार्हे–हस्ते, अंबाठा–खुंटविहीर आणि अलंगून–सुरगाणा या मार्गांवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. भवाडा ते गहाले या मार्गावरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने या भागातील संपर्क पूर्णतः तुटला आहे. पिंपळसोंड, रघतविहीर, आंबेपाडा (बे), बोरचोंड, उंबरपाडा (पी) आदी भागांमध्ये नद्या व नाल्यांना आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खुंटविहीर परिसरातील रानविहीर गावालगत असलेल्या उखर्डी डोंगरावर मोठे भूस्खलन झाले आहे. डोंगरावरील माती, दगड आणि गोटे गावालगतच्या पाण्याच्या टाकीपर्यंत येऊन पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत.अतिवृष्टीमुळे वीज वितरण व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. उंबरठाण परिसरात वीजेचे खांब कोसळल्याने गेल्या ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला असून अनेक गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला असून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश, शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता तसेच दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. नागरिकांना मोबाईल चार्जिंग, इंटरनेट सुविधा आणि इतर मूलभूत सेवांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेऊन महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली असून विविध गावांमध्ये पाहणी सुरू आहे. संभाव्य धोकादायक ठिकाणांवर नागरिकांनी विनाकारण जाऊ नये, पूरग्रस्त नाले व नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.सुरगाणा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकरी, पूरग्रस्त व घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी, वीजपुरवठा पूर्ववत करावा, तुटलेले रस्ते व पूल तातडीने दुरुस्त करावेत तसेच भूस्खलनग्रस्त भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.सध्या तालुक्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने पुढील काही तास अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्य भारत बीएसएम न्यूज
प्रतिनिधी : रतन चौधरी

दिव्य भारत बीएसएम न्यूज: शुक्रवार ,दिनांक : 24 जुलै 2026
