दिव्य भारत बीएसएम न्यूज : रविवार , दिनांक : 23 ऑगस्ट 2026

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात समाज दिन उत्साहात साजरा
त्र्यंबकेश्वर 🙁 प्रतिनिधी ):- मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर आणि अभिनव बाल विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने समाज दिन मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच वाचनाची सवय जोपासून समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असा संदेश मान्यवरांनी दिला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस १९ ऑगस्ट हा दिवस सन १९८२ पासून ‘समाज दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर कडलग यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. अशोक सोनवणे, माजी शिक्षणाधिकारी, मविप्र समाज, नाशिक, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अॅड. कैलास पाटील, शालेय, स्थानिक व्यवस्थापन समिती आणि महाविद्यालय विकास समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घुले यांनी समाज दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. मविप्र समाजाने ग्रामीण व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी केलेल्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि वाचन संस्कृती यांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.


‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ – प्रा. अशोक सोनवणे
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. अशोक सोनवणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा सविस्तर आढावा घेतला. ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ हा विचार समाजाला देणाऱ्या महात्मा फुले यांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी मोठा संघर्ष केला, असे त्यांनी सांगितले.महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री-पुरुष तसेच सर्व जाती-धर्मातील व्यक्तींना शिक्षणाची समान संधी मिळावी, यासाठी फुले दांपत्याने आयुष्यभर संघर्ष केला. सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा विरोध, चिखल, शेण व दगडांचा मारा सहन करूनही मुलींच्या शिक्षणाचे कार्य थांबवले नाही, याची आठवण त्यांनी करून दिली.महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी विधवा महिलांसाठी पाळणाघर सुरू करून त्यांना आधार दिला. सामाजिक रूढींना आव्हान देत त्यांनी विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण आणि सामाजिक समतेसाठी कार्य केले. काशाबाई या विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला शिक्षण देत डॉक्टर बनविण्याचा आदर्शही त्यांनी समाजासमोर ठेवला, असे प्रा. सोनवणे यांनी सांगितले.फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, भाऊसाहेब हिरे आणि मविप्र समाजाचे संस्थापक यांसारख्या समाजसुधारकांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत. ‘समग्र फुले साहित्य वाचा, शिक्षण घ्या आणि आपल्या भविष्यासाठी संधी निर्माण करा,’ असे आवाहन प्रा. सोनवणे यांनी केले.

‘शिक्षणामुळे माणसाला शहाणपण येते’ – अॅड. कैलास पाटील
स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अॅड. कैलास पाटील यांनी शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, शिक्षणामुळे माणसाला शहाणपण येते आणि समाजातील भेदभाव समजून घेण्याची दृष्टी प्राप्त होते. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी शिक्षणाची चळवळ उभी केली नसती, तर आज आपण महाविद्यालयाच्या प्रांगणात बसलेलो नसतो.त्र्यंबकेश्वर महाविद्यालयातून शिक्षण घेऊन परिसरातील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत पुढे गेले आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये प्रथम वकील होण्याचा मान आपल्याला मिळाला आणि आज परिसरात ६० पेक्षा अधिक वकील कार्यरत आहेत, यामागे शिक्षणाची मोठी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.कर्मवीर रावसाहेब थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमातून उभारलेली मविप्र संस्था आज विशाल वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना नियमित वाचन करावे आणि कर्मवीरांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.


‘वाचन करा, अभ्यास करा आणि आयुष्य घडवा’:– कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर कडलग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि इतर समाजसुधारकांचे चरित्र वाचण्याचे आवाहन केले. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी अनेक समाजसुधारकांनी आपल्या सुखाचा त्याग करून शाळा व महाविद्यालये उभी केली.संत गाडगेबाबांनी शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला मदत केली. शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचविण्याची त्यांची तळमळ आजच्या पिढीने समजून घेतली पाहिजे. ‘वाचन करा, अभ्यास करा आणि इतिहास घडवा,’ असा प्रेरणादायी संदेश मधुकर कडलग यांनी विद्यार्थ्यांना दिला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा व प्राध्यापकांचा गौरव : समाज दिनाच्या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य व गणित विभागप्रमुख डॉ. सोमनाथ घुले यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील गणित विषयात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०० रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविले.
त्याचप्रमाणे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख ,प्रो. डॉ. भागवत महाले यांनी तृतीय वर्ष कला शाखेतील राज्यशास्त्र विषयात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला ५०० रुपये रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या सत्कारामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल सकारात्मक स्पर्धा आणि प्रेरणा निर्माण झाली.
कार्यक्रमाला वसंतराव भोसले (महाविद्यालय विकास समिती सदस्य), समाधान बोडके (स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य), अरुण मेढे (शालेय व्यवस्थापन समिती सदस्य), आनंदा कसबे, सचिन ठाकरे (मुख्याध्यापक, अभिनव बाल विकास मंदिर) आदीसह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी मान्यवर उपस्थित होते. वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे समाज दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दामले व प्रा. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गांगुर्डे यांनी मानले. कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कार्याचा आदर्श, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक विचारांची प्रेरणा आणि वाचन-अभ्यासाची सवय या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याला दिशा द्यावी, असा संदेश देत समाज दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार , दिनांक : 22 ऑगस्ट 2026
