दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार , दिनांक : 29 ऑगस्ट 2026
येडशीत १५०१ वी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात; धार्मिक मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

दिव्य भारत बीएसएम न्यूज
येडशी(धाराशिव :उस्मानाबाद) : (प्रतिनिधी : सुभान शेख):-
धाराशिव (उस्मानाबाद) तालुक्यातील येडशी येथे मुस्लिम समाजाच्या वतीने पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त १५०१ वी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि सामाजिक सलोखा जपत साजरी करण्यात आली. गुरुवार, दिनांक . २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेल्या जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीत (जुलूस) मुस्लिम समाजबांधवांसह गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.येडशी गावात अनेक वर्षांपासून धार्मिक परंपरा आणि रितीरिवाजानुसार ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव साजरा केला जातो. यंदाच्या उत्सवासाठी जामा मस्जिद कमिटी, मौलवी तसेच मुस्लिम समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष नियोजन केले होते. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील विविध भागांत सजावट करण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रजा बेकरीपासून मिरवणुकीला सुरुवात : जुना चमडा बाजार परिसरातील जमादार बाबा नगर भागात असलेल्या रजा बेकरीपासून जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला उपस्थित मुस्लिम समाजबांधवांना सरबत देण्यात आले. त्यानंतर धार्मिक वातावरणात मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. विविध ठिकाणी करण्यात आलेली आकर्षक सजावट आणि मिरवणुकीतील उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या मौलवींनी नात पठणास सुरुवात केली. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनकार्याचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या नात पठणामुळे वातावरण भक्तिमय झाले. मुस्लिम समाजातील महिला, पुरुष आणि युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांच्या वतीने सहभागी बांधवांसाठी अल्पोपहार व खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. वाटेत मुस्लिम समाजबांधवांनी वडापावचा आस्वाद घेतला. तसेच दोन ठिकाणी केळीचे वाटप करण्यात आले. गावात परतल्यानंतर शिरा व सरबताची व्यवस्था करण्यात आली होती.
छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन : जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीदरम्यान बसस्थानक चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दिला.
त्यानंतर मिरवणूक तुळजाभवानी चौकात पोहोचली. येथे मुस्लिम समाजबांधवांनी उत्साहात घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला. गावातील विविध भागांतून मिरवणूक पुढे जात असताना नागरिकांनी ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.नागरिकांकडूनही सहकार्य मिरवणूक छत्रपती शहाजी राजे महाराज चौकात पोहोचल्यानंतर माजी उपसरपंच गजानन नलावडे यांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी नागरिकांना बिस्किटांचे पुडे वाटप करण्यात आले. या उपक्रमात गजानन नलावडे, अमोल पवार, गणेश पवार, आबा पवार, अशोकराव देशमुख, बालाजी नकाते, बालाजी नागटिळक, सुरेश देशमुख आदींनी सहभाग घेतला.तसेच सुनील शेळके यांच्या वतीनेही बिस्किटांचे पुडे वाटप करण्यात आले. विजयकुमार सस्ते यांच्या वतीने मिरवणुकीतील मुस्लिम समाजबांधवांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. विविध समाजघटकांकडून करण्यात आलेल्या या सहकार्यामुळे येडशीतील सामाजिक सलोखा आणि परस्पर बंधुभावाचे चित्र अधोरेखित झाले.
विविध भागांतून जुलूस मार्गस्थ :
मिरवणूक पुढे गुरव गल्ली, नलावडे गल्ली, सुभाषनगर आणि इंगळे गल्ली या भागांतून मार्गस्थ झाली. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी सहभागी बांधवांचे स्वागत केले. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने गावातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.
मिरवणुकीदरम्यान समाजबांधवांनी शांतता आणि शिस्त राखत धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. पारंपरिक पद्धतीने नात पठण, घोषणा आणि विविध ठिकाणी करण्यात आलेल्या सेवाभावी उपक्रमांमुळे उत्सवाला सामाजिक आणि मानवतावादी स्वरूप प्राप्त झाले.
जामा मस्जिदसमोर मिरवणुकीचा समारोप :गावातील विविध भागांतून मार्गक्रमण केल्यानंतर जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक जामा मस्जिदसमोर पोहोचली. तेथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित मौलवी व समाजबांधवांनी धार्मिक कार्यक्रम पार पाडला. उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडल्याबद्दल आयोजकांनी सहभागी नागरिकांचे आभार मानले. या जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्सवाच्या आयोजनामध्ये जामा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष जब्बार यासीन पटेल, उपाध्यक्ष अशफाक पटेल, खजिनदार सल्लाऊद्दीन शेख, सदस्य महामुद पटेल, मंजूर उस्मान पटेल, युसूफ कोतवाल, लतीफ शेख तसेच जामा मस्जिदचे मौलवी अमजद पटेल यांनी मार्गदर्शन व नियोजन केले.स्त : उत्सव शांततेत पार पडावा यासाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला होता. पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी मिरवणुकीच्या मार्गावर उपस्थित राहून सुरक्षा व्यवस्था सांभाळली. मिरवणूक कोणत्याही अडथळ्याविना आणि शांततेत पार पडल्याने आयोजकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
पोलीस प्रशासनाच्या वतीनेही मुस्लिम समाजबांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रशासन, आयोजक आणि नागरिक यांच्या समन्वयामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला.
सामाजिक सलोख्याचा संदेश : येडशी येथे पार पडलेल्या १५०१ व्या जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्सवातून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याचा संदेश देण्यात आला. विविध समाजातील नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला तसेच ठिकठिकाणी पाणी, बिस्किटे, सरबत, केळी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करून सहभागी नागरिकांचे स्वागत केले.गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणुकीचा आनंद घेतला. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि परस्पर आदराची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी दिसून आले.येडशीतील १५०१ वी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साह, भक्तिभाव, शिस्त आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत शांततेत संपन्न झाली.

दिव्य भारत बीएसएम न्यूज
येडशी प्रतिनिधी : सुभान शेख
दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार ,दिनांक : 29 ऑगस्ट 2026
