दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार, दिनांक : 1 ऑक्टोबर 2026

whatsapp image 2026 09 26 at 3.14.54 pm
img 9208.jpg

‘शिकवताना जे शिकले’ पुस्तकाचे प्रकाशन; ‘मूल्यमापनाचे मूल्यमापन’वर परिसंवाद

शिक्षण क्षेत्रातील अनुभवांचे दस्तऐवजीकरण आणि विद्यार्थी-केंद्रित मूल्यमापनावर मान्यवरांचे विचारमंथन

नाशिक, | प्रतिनिधी : छाया लोखंडे ):- येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या स्टाफ ट्रेनिंग अकॅडमीच्या रिसर्च अँड पब्लिकेशन विंगतर्फे डॉ. अंजली पटवर्धन-कुलकर्णी लिखित ‘शिकवताना जे शिकले – शैक्षणिक अनुभवाच्या काही नोंदी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तसेच ‘मूल्यमापनाचे मूल्यमापन : समस्या व उपाय’ या विषयावरील परिसंवाद बुधवारी गुरुदक्षिणा कॅम्पसमधील प्राचार्य टी. ए. कुलकर्णी सभागृहात उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदार डॉ. दीप्ती देशपांडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी प्राचार्य डॉ. शिरीष चिंधडे, लेखिका व शिक्षणतज्ज्ञ डॉ. शोभना भिडे, तसेच ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर आणि अरुण जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.स्टाफ ट्रेनिंग अकॅडमीच्या कार्याध्यक्ष डॉ. अंजली कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. शिक्षण क्षेत्रातील अनुभव, अध्यापनातील बदलती आव्हाने आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी अशा वैचारिक उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रकाशकाच्या वतीने मनोगत व्यक्त केले.

शिक्षणातील अनुभवांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे

अध्यक्षीय मनोगतात डॉ. दीप्ती देशपांडे यांनी शिक्षण क्षेत्रातील अनुभवांचे दस्तऐवजीकरण, शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि बदलत्या शैक्षणिक गरजांशी सुसंगत विचारमंथनाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षकांनी आपल्या अध्यापनातील अनुभव, प्रयोग आणि निरीक्षणे नोंदवून ठेवणे ही शैक्षणिक ज्ञाननिर्मितीची महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.यानंतर ‘मूल्यमापनाचे मूल्यमापन : समस्या व उपाय’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. परिसंवादात डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, डॉ. शिरीष चिंधडे, डॉ. शोभना भिडे आणि डॉ. अंजली कुलकर्णी यांनी आपले विचार मांडले.

विद्यार्थी-केंद्रित मूल्यमापनाची गरज

शिक्षण प्रक्रियेत मूल्यमापनाची भूमिका, मूल्यमापनाचा व्यापक अर्थ, सध्याच्या मूल्यमापन पद्धतीतील अडचणी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे मोजमाप आणि अधिक परिणामकारक व विद्यार्थी-केंद्रित मूल्यमापनाच्या दिशेने आवश्यक बदल, अशा विविध पैलूंवर परिसंवादात सविस्तर विचारमंथन करण्यात आले.केवळ परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मूल्यमापन न करता त्यांच्या ज्ञान, कौशल्ये, सर्जनशीलता, विचारक्षमता आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा विचार करणाऱ्या मूल्यमापन पद्धतींची आवश्यकता असल्याचे मान्यवरांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.या परिसंवादाचे संचालक म्हणून एच.पी.टी. आर्ट्स अँड आर.वाय.के. सायन्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी यांनी काम पाहिले. शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आणि वर्तमानातील गरजा यांची सांगड घालणाऱ्या या चर्चेला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुग्धा जोशी व डॉ. स्नेहा रत्नपारखी यांनी केले, तर डॉ. रश्मी मिशाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रिसर्च अँड पब्लिकेशन विंगचे डॉ. प्रशांत पिंगळे, डॉ. लोकेश शर्मा तसेच सर्व समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवांना शब्दबद्ध करणाऱ्या ‘शिकवताना जे शिकले – शैक्षणिक अनुभवाच्या काही नोंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि त्यासोबतच शिक्षण प्रक्रियेतील मूल्यमापन व्यवस्थेवर झालेला विचारप्रवर्तक परिसंवाद यामुळे हा कार्यक्रम शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरला.

whatsapp image 2026 09 26 at 3.14.54 pm

दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार, दिनांक : 1 ऑक्टोबर 2026