तोरणडोंगरीचा सुपुत्र दिलीप गावित याने जागतिक क्रीडा पटलावर कोरले नाव! ‘तोरणडोंगरी एक्सप्रेस’चा देशाबाहेरही डंका; भव्य नागरी सत्कार सोहळ्याने परिसर दुमदुमला!

maharashtrian stage award ceremony
logo दिव्य भारत मराठी न्यूज लोगो (1)

आंतरराष्ट्रीय पॅरा धावपटू दिलीप गावित आणि प्रशिक्षक वैजनाथ काळे यांचा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत गौरव; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे गौरवोद्गार – आई-वडिलांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द

दिव्य भारत बीएसएम न्यूज :सोमवार, दिनांक : 9 नोव्हेंबर 2026

सुरगाणा (प्रतिनिधी : रतन चौधरी) : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील तोरणडोंगरी या छोट्याशा गावातील सुपुत्र दिलीप महादू गावित याने आपल्या जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि अफाट क्रीडा कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला आहे. आपल्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीने देशासह राज्याचे आणि सुरगाणा तालुक्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचविणाऱ्या या सुवर्णपदक विजेत्या पॅरा धावपटूचा तसेच त्याला घडविणारे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांचा तोरणडोंगरी येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलीप गावितच्या कामगिरीचे कौतुक करताना, “दिलीप गावितच्या रूपाने तोरणडोंगरी एक्सप्रेसने देशाबाहेर जागतिक पटलावर आपले नाव कोरले आहे,” असे गौरवोद्गार काढले. या सोहळ्याला मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, खेळाडू आणि हजारो आदिवासी बांधवांची लक्षणीय उपस्थिती लाभली.

आदिवासी बांधवांच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य स्वागत

तोरणाई गाव विकास समितीच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्यानिमित्त आंतरराष्ट्रीय पॅरा धावपटू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ढोल, पावरी, संबळ आणि कहाळी या पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच पारंपरिक नृत्याच्या तालावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गावातील वातावरण उत्साह, आनंद आणि अभिमानाने भारावून गेले होते.दूरवरच्या वाड्या, वस्त्या, पाडे आणि गावांमधून आदिवासी बांधव पायपीट करीत या सोहळ्यासाठी उपस्थित झाले होते. आपल्या मातीतून घडलेला खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला, याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. दिलीपच्या यशामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवकांमध्ये क्रीडा क्षेत्राविषयी नवी उमेद निर्माण झाली आहे.

“निरोगी आणि काटक आयुष्यासाठी परमेश्वराने डोंगर-दऱ्यांत जन्माला घातले!”

सत्कार सोहळ्यात बोलताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “आज सर्वत्र भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होताना दिसते. दर्जेदार अन्न आणि शुद्ध हवा मिळावी म्हणून अनेक लोक आदिवासी भागात येतात. आपण मात्र भेसळयुक्त पदार्थ खातो. आपले शरीर काटक, निरोगी आणि सुदृढ राहावे, यासाठी परमेश्वराने आदिवासी बांधवांना डोंगर, दऱ्या आणि खोऱ्यांमध्ये जन्माला घातले आहे. त्यामुळे आपली जीवनशैली निसर्गाशी जोडलेली असून आपण निरोगी आहोत.”यावेळी त्यांनी दिलीप गावितच्या यशाचे कौतुक करताना खास शैलीत,

“आदिवासी जनता, भूषण भारता…
वंदन करतो दिलीप भाऊंना!”

अशी शायरी सादर केली. त्यांच्या या शब्दांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

indian community health ceremony stage (1)

शिक्षणाशिवाय आदिवासी समाजाची प्रगती अशक्य : खासदार भास्कर भगरे

खासदार भास्कर भगरे यांनी आपल्या मनोगतात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, आदिवासी समाजाची खरी प्रगती शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. जीवनात परिस्थितीपेक्षा प्रयत्न महत्त्वाचे असतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दिलीप गावितने मिळविलेले यश हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.आदिवासी विकास विभाग नेमका कोणासाठी आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना आणि युवकांना शिक्षण, क्रीडा व इतर क्षेत्रांत योग्य संधी उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. दुर्गम भागातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास तेही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आदिवासी भागात क्रीडा प्रबोधिनी उभारण्याची गरज : आमदार नितीन पवार

आमदार नितीन पवार यांनी सुरगाणा आणि परिसरातील आदिवासी युवकांमध्ये क्रीडा क्षेत्रातील मोठी क्षमता असल्याचे सांगितले. या भागातील नैसर्गिक परिस्थिती, मेहनती वृत्ती आणि खेळाडूंची जिद्द लक्षात घेता येथे क्रीडा विकासासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे.आदिवासी भागात क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात यावी. ग्रामीण आणि दुर्गम भागातील गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. दिलीप गावितच्या यशामुळे या भागातील अनेक युवकांना प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

“सह्याद्रीच्या कुशीत अनेक क्रीडा हिरे दडलेले!” : माजी आमदार जे. पी. गावित

माजी आमदार कॉ. जे. पी. गावित यांनी दिलीप गावितच्या यशाचे आणि प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्या मेहनतीचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “जगात अनेक माणसे जन्माला येतात; मात्र त्यापैकी काही मोजकीच माणसे देश, जग आणि मानवकल्याणासाठी आपले आयुष्य समर्पित करतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आदिवासी समाजात असे अनेक अष्टपैलू खेळाडू रूपी हिरे दडलेले आहेत. सोने कुठेही सापडेल; मात्र त्या सोन्यावर पैलू पाडणारा कारागीर पारंगत असावा लागतो. दिलीपच्या बाबतीत प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या हिर्‍याला पैलू पाडले आणि त्याला जागतिक स्तरावर चमकविले.”यावेळी त्यांनी नार-पार बंधाऱ्यांचा मुद्दाही उपस्थित केला. बंधारे आणि सिंचनाच्या योजना होणे आवश्यक असले तरी त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी घ्यावी. केवळ भेसळ तपासण्यापुरते मर्यादित न राहता आदिवासी जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीही काम करावे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

दिलीपच्या आई-वडिलांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत

या सोहळ्यातील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या दिलीप गावितच्या आई-वडिलांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मंत्री नरहरी झिरवाळ आणि आमदार नितीन पवार यांच्या वतीने प्रत्येकी ५० हजार रुपये, अशी एकूण एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिलीपच्या आई-वडिलांना सुपूर्द करण्यात आली.दिलीपच्या यशामागे त्याच्या आई-वडिलांचे योगदान, कुटुंबाचा पाठिंबा आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागातील खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी कुटुंब आणि प्रशिक्षक यांचे योगदान किती मोलाचे असते, याचे हे उदाहरण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

उलगुलान आदिवासी शिक्षक संघटनेच्या वतीनेही सत्कार

या कार्यक्रमात उलगुलान आदिवासी शिक्षक संघटनेच्या वतीने दिलीप गावित आणि प्रशिक्षक वैजनाथ काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा, कला, संशोधन आणि इतर क्षेत्रांतही प्रावीण्य मिळवावे, यासाठी अशा यशस्वी व्यक्तिमत्त्वांचा गौरव प्रेरणादायी ठरतो, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.यावेळी शिक्षक रतन चौधरी, मंगलदास गवळी, बाळू चौधरी, रामदास भोये, पुंडलिक चौधरी, मनोहर भोये, गणेश पाडवी, मधुकर राऊत, पंडित गायवन, दिगंबर चौधरी आदी उपस्थित होते.

मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती

या भव्य नागरी सत्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार नितीन पवार, साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित, माजी आमदार कॉ. जे. पी. गावित, डॉ. तुळशीराम गावित, एन. डी. गावित, मोहन गांगुर्डे, गोपाळ धूम, सुभाष चौधरी, जयराम गावित, धर्मेंद्र पगारिया, इंद्रजित गावित, सरपंच हिरामण गावित, विनायक गावित, चंद्रकांत वाघेरे, पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, राजू पाटील, भास्कर अलबाड, आदिवासी बचाव अभियानचे ॲड. दत्तू पाडवी, किसन ठाकरे, विजय पवार, जयवंत गारे, काशिनाथ बागुल, नामदेव ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयराम गावित यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश पाडवी यांनी केले. या सोहळ्यास हजारो नागरिकांनी उपस्थित राहून दिलीप गावित आणि प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना शुभेच्छा दिल्या.

चौकट : दोन सुवर्णपदकांच्या यशाने तोरणडोंगरीचा नावलौकिक जागतिक स्तरावर!

आपला देश, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, शाळा आणि समाजाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणाऱ्या दिलीप महादू गावितने दोन वेळा ‘कॉमनवेल्थ गेम्स’ आणि ‘एशियन पॅरा गेम्स २०२६’ मध्ये सुवर्णपदके मिळवून भारताचा गौरव वाढविला आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमागे भारतीय-आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि अथक परिश्रम आहेत.या दोन्ही मान्यवरांचा समाजाच्या आणि सुरगाणा तालुक्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. दूरवरच्या वाड्या-वस्त्यांमधून पायपीट करून आलेल्या आदिवासी बांधवांची उपस्थिती या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली. पारंपरिक वाद्ये, नृत्य आणि उत्स्फूर्त स्वागताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मतदारसंघातील सर्वच लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून खेळाडूच्या यशाचे कौतुक केले. मंत्री नरहरी झिरवाळ आणि आमदार नितीन पवार यांच्या वतीने दिलीपच्या आई-वडिलांना प्रत्येकी ५० हजार रुपये, अशी एकूण एक लाख रुपयांची आर्थिक मदतही देण्यात आली.तोरणडोंगरीच्या मातीतून जागतिक क्रीडा क्षेत्रात झेप घेणाऱ्या दिलीप गावितचे यश हे केवळ एका खेळाडूचे यश नसून संपूर्ण आदिवासी समाजाच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि क्षमतेचे प्रतीक आहे. या यशातून दुर्गम भागातील हजारो युवकांना नवी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

maharashtrian stage award ceremony

दिव्य भारत बीएसएम न्यूज
सत्याची धार, जनतेचा आधार

दिव्य भारत बीएसएम न्यूज :सोमवार, दिनांक : 9 नोव्हेंबर 2026