यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की,डहाणूसाठी प्रस्तावित १० बसांच्या ऐवजी आता २५ बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीसुविधा मिळतील आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळेल.तसेच, लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या बसचे अनावरण करण्यात येणार असून, पुढील सहा महिन्यांत राज्यभरात ३,००० नवीन बस सेवा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यापैकी काही बस डहाणू परिसरासाठी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डहाणूच्या पर्यटन विकासासाठी शासन सकारात्मक असून, पर्यटन विभागामार्फत चार कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. याशिवाय भविष्यात आणखी पर्यटन प्रकल्प राबविण्यासाठीही शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.डहाणूतील समुद्रकिनारे, चिकू बागायती, आदिवासी संस्कृती आणि नैसर्गिक संपदा यांचा योग्य उपयोग करून येथे पर्यटन उद्योग विकसित करण्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

डहाणू फेस्टिव्हलमध्ये स्थानिक कला, संस्कृती, खाद्यपदार्थ, हस्तकला आणि लोकपरंपरांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य-गायन, स्थानिक खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स आणि प्रदर्शनांमुळे हा उत्सव अधिक रंगतदार झाला.स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलेला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

पर्यटन वाढल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. हॉटेल व्यवसाय, मार्गदर्शक सेवा, हस्तकला विक्री, वाहतूक सेवा अशा विविध क्षेत्रांत रोजगारनिर्मिती होईल. त्यामुळे डहाणूचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

डहाणू फेस्टिव्हलच्या आयोजनाचे कौतुक करताना मंत्री सरनाईक म्हणाले,“ठाणे आणि मीरा-भाईंदर येथे आम्ही अनेक वर्षांपासून फेस्टिव्हल आयोजित करतो. मात्र डहाणूचा हा उपक्रम अधिक प्रेरणादायी आहे. भविष्यात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या भागाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.”

डहाणू फेस्टिव्हल हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून, तो पर्यटन विकासाचा एक मजबूत पाया ठरणार आहे. शासनाच्या सहकार्याने आणि स्थानिकांच्या सहभागाने डहाणूला एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मार्ग या फेस्टिव्हलने खुला केला आहे. डहाणू फेस्टिव्हलच्या माध्यमातून पर्यटन, रोजगार आणि स्थानिक विकास यांना चालना मिळण्याची शक्यता आहे. शासनाच्या योजनांमुळे आणि वाढत्या सुविधांमुळे डहाणू भविष्यात महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.