भारतीय शेतकऱ्यांची गरिबी ही निसर्गदत्त नसून ती व्यवस्थात्मक आहे, आणि शेतकऱ्याला कायम दारिद्र्यात ठेवण्याचे धोरण सरकारनेच राबवले आहे—हा कटू पण वास्तववादी विचार निर्भीडपणे मांडणारे, शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाचे आणि स्वाभिमानाचे प्रखर प्रवक्ते म्हणजे युगात्मा शरद जोशी. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाशिक येथील शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन स्थळावर शेतकऱ्यांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.शरद जोशी यांनी “शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण” असे ठणकावून सांगत, शेतीचे अर्थशास्त्र साध्या, सरळ आणि शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत मांडले. प्रस्थापित राजकारण, सरकारी दडपशाही आणि मध्यस्थांच्या मक्तेदारीविरोधात त्यांनी उभारलेली शेतकरी चळवळ केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण देशभर पसरली.

१० नोव्हेंबर १९८० रोजी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा, कांद्याला १०० रुपये आणि उसाला ३०० रुपये दर मिळावा, या मागण्यांसाठी शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आणि रेल रोको आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात माधव खंडेराव मोरे, माधवराव तात्या बोरस्ते, प्रल्हाद पाटील कराड यांच्यासह असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.सलग १७ दिवस रेल्वे मार्ग आणि महामार्ग ठप्प राहिल्याने सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला. अखेर सरकारला नमते घ्यावे लागले आणि कांद्याला शंभर रुपये, उसाला तीनशे रुपये असा दर जाहीर करण्यात आला. या आंदोलनाची यशोगाथा केवळ देशभरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेचा विषय ठरली.

या आंदोलनादरम्यान नाशिक जिल्ह्यातील खेरवाडी (ता. निफाड) येथे झालेल्या रेल रोको आंदोलनात रत्ने आणि जाधव हे दोन शेतकरी पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मा झाले. त्यांच्या बलिदानाने शेतकरी चळवळीला नवे बळ मिळाले आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा संघर्ष अधिक तीव्र झाला.१९८० पूर्वी सरकार शेतकऱ्यांकडून शेतीमाल लेव्ही भावाने खरेदी करत होते. या अन्यायकारक धोरणामुळे शेतकरी कायम तोट्यात राहायचा. सरकारी दडपशाही आणि पुढाऱ्यांची मक्तेदारी यामुळे शेतकरी अनेकदा पुढाऱ्यांना दैवत मानत होता. मात्र शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या मनातील ही मानसिक गुलामगिरी तोडली.

सूट-सबसिडीचे नाही काम, आम्हाला हवे घामाचे दाम” हा नारा देत शरद जोशी यांनी शेतीमालाच्या किमती, उत्पादन खर्च, बाजारव्यवस्था आणि सरकारी धोरणांतील फसवणूक शेतकऱ्यांना समजावून सांगितली. त्यांनी स्पष्ट केले की शेतकरी गरीब असण्याचे कारण त्याची अकार्यक्षमता नसून, सरकारची शोषणकारी धोरणे आहेत.१९८० ते १९९० या दशकात महाराष्ट्रातील ऊस, कांदा, कापूस या प्रमुख पिकांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा यासाठी त्यांनी राज्यभर मोठमोठी आंदोलने उभी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना ही केवळ आंदोलन करणारी संघटना न राहता, शेतकऱ्यांच्या विचारांची शाळा बनली.

शरद जोशी यांचे आंदोलन महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही.१० मार्च १९८४ रोजी पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांच्या गव्हाला रास्त भाव मिळावा म्हणून चंदीगड येथील राजभवनाला सलग दहा दिवस घेराव घालण्यात आला.कर्नाटकातील निपाणी येथे तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांसाठी तंबाखू आंदोलन छेडण्यात आले.या आंदोलनांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर महत्त्व मिळाले.

भारत देश भावनाप्रधान असल्यामुळे ग्रामीण भागात प्रांतवाद, धर्मवाद, जातीयवाद अशा विविध मुद्द्यांवर शेतकऱ्यांची फूट पाडली जात होती. राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना आपापल्या स्वार्थासाठी वापरण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत शरद जोशी यांनी शेतीचे अर्थशास्त्र केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची एकजूट घडवून आणली.“असा शेतकऱ्यांचा नेता पुन्हा होणे नाही” असे आजही शेतकरी अभिमानाने सांगतात. भारतीय शेतकऱ्यांच्या मनाची मशागत करून त्यांना आत्मभान दिल्यामुळे शरद जोशी यांना शेतकरी दैवत मानू लागले.

१२ डिसेंबर २०२५ रोजी शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाशिक येथील शेतकरी कर्जमुक्ती धरणे आंदोलन स्थळावर सर्व शेतकऱ्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात—शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे,

  • भारत स्वाभिमान पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मोती नाना पाटील,शेतकरी सोमनाथ सहाने,तरुण युवक शेतकरी अजित बागुल
  • यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शरद जोशी हे केवळ आंदोलनांचे नेते नव्हते, तर त्यांनी शेतकऱ्यांना विचार करण्याची दिशा दिली. शेती ही भीक मागणारी व्यवस्था नसून ती स्वाभिमानाने जगण्याचा व्यवसाय आहे, हे त्यांनी शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवले. त्यामुळेच शेतकरी चळवळीच्या इतिहासात युगात्मा शरद जोशी यांचे नाव सदैव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल.