मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत पिंपळास ग्रामपंचायतीचा दिलासादायक निर्णय

थकीत करावर ५० टक्के सूट – कर वसुलीच्या ‘करदिंडी’तून जनजागृती
दिव्य भरत बीएसएम न्यूज : दिनांक :17-12-2025
पालघर ,( प्रतिनिधी : संजय बहादुरे):-
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर पिंपळास ग्रामपंचायतीने थकीत करधारकांसाठी दिलासादायक आणि लोकाभिमुख निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत पिंपळासच्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर करून निवासी करधारकांच्या थकीत करावर थेट ५० टक्के सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामपंचायतीच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळणार आहे.
५० टक्के सूट – कोणत्या करांवर?
ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल झुंजार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत हद्दीतील निवासी करधारकांकडून थकीत असलेली,घरपट्टी,दिवाबत्ती कर,आरोग्य कर, या करांवर ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या मागील थकबाकीवर थेट ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. ही सवलत शासनाच्या परिपत्रक व्हीपीएम 2025 प्र. क्र. 62 (पॅरा 1) नुसार देण्यात येत असून, केवळ निवासी करधारकांसाठीच लागू राहणार आहे.
सवलतीसाठी अटी काय?
ही सवलत मिळवण्यासाठी करधारकांनी ठरवून दिलेल्या कालावधीत संपूर्ण थकीत रक्कम एकरकमी भरावी लागणार आहे. अर्धवट किंवा हप्त्यांमध्ये रक्कम भरल्यास सवलतीचा लाभ मिळणार नाही, असे ग्रामपंचायत प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ, नागरिकांना दिलासा:
सरपंच उमेश वाघात यांनी सांगितले की, “या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांपासून थकीत राहिलेल्या कररकमेची वसुली होण्यास मदत होईल. परिणामी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होऊन विकासकामांसाठी अधिक निधी उपलब्ध होईल.”मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास, आर्थिक स्वावलंबन आणि पारदर्शक प्रशासन हा शासनाचा मुख्य उद्देश असून, पिंपळास ग्रामपंचायतीचा हा निर्णय त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘करदिंडी’तून अनोखी जनजागृती:
या निर्णयाची माहिती गावकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी ग्रामपंचायतीने एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला. पंचायत समिती वाडा येथील गटविकास अधिकारी श्री. वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुलीची ‘करदिंडी’ काढण्यात आली. या करदिंडीत शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.विद्यार्थ्यांनी फलक, घोषवाक्ये आणि जनजागृतीपर संदेशांच्या माध्यमातून ग्रामस्थांना थकीत कर भरण्याचे आवाहन केले. ‘कर भरा – गाव विकासाला हातभार लावा’, ‘आज कर भरा, उद्या विकास पहा’ अशा घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले.
शिक्षक, नागरिक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग :
या करदिंडीत शाळेतील सर्व शिक्षकवृंद, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ मंडळी आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी
- सरपंच उमेश वाघात,
- उपसरपंच मुकेश वाकडे,
- ग्रामसेवक विठ्ठल झुंजार,
- पोलीस पाटील सौ. दामिनी पाटील,
- शिक्षकवृंद आरती अरुण पाटील, आकांक्षा हरड, दीपक शनवारे, स्वप्निल पाटील,
- ग्रामपंचायत सदस्य व गावातील कर्तव्यदक्ष नागरिक,
यांनी विशेष परिश्रम घेतले.

ग्रामविकासासाठी सामूहिक सहकार्याचा संदेश :
गावामध्ये होत असलेल्या सुधारात्मक कार्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, ग्रामपंचायतीचे व्यवस्थापन अधिक सक्षम व्हावे आणि विकासासाठी सर्वांचे सहकार्य मिळावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. करदिंडीसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक दृढ झाला आहे.
नागरिकांना आवाहन :
ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व निवासी करधारकांना आवाहन केले आहे की,“ही सुवर्णसंधी असून, ५० टक्के सूट मिळत असताना आपली थकीत कररक्कम तात्काळ भरावी आणि ग्रामपंचायतीच्या विकासात योगदान द्यावे.” मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत पिंपळास ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय ग्रामीण भागातील लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श ठरत असून, इतर ग्रामपंचायतींसाठीही तो प्रेरणादायी ठरणार आहे.
दिव्य भरत बीएसएम न्यूज :
पालघर ,( प्रतिनिधी : संजय बहादुरे)

