बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील अल्पभूधारक शेतकरी हाणमंत दिगंबर सिद्धापुरे यांच्या कौलारू घराला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण संसार जळून खाक झाला. या दुर्दैवी घटनेत दागिने, नगदी रोकड, अन्नधान्य, कपडे व घरातील उपयोगी वस्तूंसह मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून कुटुंब उघड्यावर पडले आहे. या संकटाच्या काळात संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी संस्थेचे संचालक रोहित देशमुख यांनी पुढाकार घेत पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिल्याने गावकऱ्यांतून त्यांचे कौतुक होत आहे.

सगरोळी येथे काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि सिद्धापुरे कुटुंबाचे कौलारू घर पूर्णपणे जळून खाक झाले. घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तू, तसेच मौल्यवान दागिने व नगदी रोकडही आगीत भस्मसात झाली. या आगीत आसपासच्या काही घरांनाही नुकसान झाले असून एकूण नुकसानीचा अंदाज सुमारे २५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सर्वाधिक फटका सिद्धापुरे कुटुंबालाच बसला आहे.

घटनेची माहिती मिळताच संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी संस्थेचे संचालक रोहित देशमुख यांनी पीडित कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी सिद्धापुरे कुटुंबाला ४५ हजार रुपयांचा धनादेश देत तातडीचा दिलासा दिला. यासोबतच, भविष्यातही शक्य ती मदत करण्याचे आश्वासन देत कुटुंबाला धीर दिला. या मोलाच्या मदतीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला काहीसा आधार मिळाला असून गावकऱ्यांनी देशमुख परिवाराच्या संवेदनशीलतेचे मनापासून कौतुक केले.

रोहित देशमुख हे गेल्या अनेक दशकांपासून संस्कृती संवर्धन मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही सक्रिय योगदान देत आहेत. गरजू, गोरगरीब, संकटग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी ते सातत्याने पुढे येत असल्याने सगरोळी परिसरात त्यांची ओळख “संकटात धावून येणारा आधार” अशी आहे. या घरजळीत घटनेतही त्यांनी दाखवलेली तत्परता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

या भीषण घटनेनंतरही अद्याप शासनाकडून ठोस आर्थिक मदत मिळालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पीडित कुटुंबाला तातडीची शासकीय मदत, घरकुल योजना, तसेच आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या मदतीबद्दल सिद्धापुरे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत देशमुख परिवाराचे मनापासून आभार मानले. “या कठीण प्रसंगी मिळालेली मदत आमच्यासाठी मोठा आधार ठरली आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी दत्तू कोटनोड, श्रीनिवास दमय्यावार, वैभव भोसले, भगवान सिद्धापुरे, मनोहर देगलरे, सतीश बुच्छलवार, संजय चुन्नमवार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

सगरोळी येथील ही घटना केवळ एक घरजळीत दुर्घटना नसून, ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांच्या असुरक्षिततेचे वास्तव दर्शवते. अशा वेळी समाजातून पुढे येणाऱ्या मदतीच्या हातांमुळेच पीडितांना नवे बळ मिळते. देशमुख परिवाराने दिलेला आधार सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण ठरत असून, शासनानेही तत्काळ मदत करून या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.