दिव्य भारत बीएसएम न्यूज : दिनांक : 24 जानेवारी 2026
देवळाली येथे गांजा लागवड करणाऱ्या इसमावर अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई
२ एकर शेतात अवैध गांजा लागवड, १६ किलो गांजा जप्त – आरोपी अटकेत
येडशी / देवळाली (ता. भूम, जि. धाराशिव) | प्रतिनिधी : सुभान शेख):-
धाराशिव जिल्ह्यातील देवळाली परिसरात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) यांनी गांजा लागवडीविरोधात मोठी व निर्णायक कारवाई करत अवैध अमली पदार्थांच्या साखळीला जबर धक्का दिला आहे. देवळाली शिवारातील शेत गट क्रमांक ४६२ मध्ये तब्बल दोन एकर क्षेत्रात गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गोकुळदास रावसाहेब हावळे (वय ५०, रा. देवळाली, ता. भूम, जि. धाराशिव) यास अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ५२ गांजाची झाडे उपटून त्यांचे गठ्ठे बांधण्यात आले असून, एकूण १६ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे ७१ हजार रुपये असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
गुप्त माहितीवरून धडक कारवाई:
छत्रपती संभाजीनगर येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाला देवळाली परिसरात गांजाची अवैध लागवड सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी देवळाली शिवारात अचानक छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान आरोपी गोकुळदास हावळे याच्या शेतजमिनीत गांजा (कॅनॅबिस सॅटिव्हा) वनस्पतीची लागवड, देखभाल व रखवाली सुरू असल्याचे आढळून आले.
५२ झाडे उपटून वजन, पंचनामा पूर्ण:
पोलिसांनी कृषी विभागाच्या सहकार्याने गांजाची झाडे उपटून त्यांचे पंचनामे केले. एकूण ५२ झाडे जप्त करून वजन केले असता १६ किलो गांजा निष्पन्न झाला. सर्व कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल, आरोपी अटकेत:
या कारवाईबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला (ANTF) यांनी फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून, या अवैध लागवडीमागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच विक्रीचे जाळे कुठवर पसरले आहे याचा शोध घेतला जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी ऑपरेशन:
ही कारवाई पोलीस महानिरीक्षक (ANTF) श्रीमती शारदा राऊत, पोलीस अधीक्षक श्री. अजित टिके, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली पाटील, के. डी. सपकाळ, उपनिरीक्षक वाहिद मुल्ला, हनुमान पुरके, तसेच हवालदार शैला टिळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरफाळे, नितीन जाधव, रवींद्र साळवे, सुरज जानेवाल, ज्ञानेश्वर चव्हाण, आम्रपाली सूर्यवंशी आदी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
तरुणाईवर दुष्परिणाम, प्रशासनाचा कडक इशारा:
अमली पदार्थांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तरुणाई व्यसनाधीन होत असून, त्याचे सामाजिक व कौटुंबिक परिणाम गंभीर होत आहेत. गांजा, ड्रग्ज व अन्य अमली पदार्थांच्या लागवड, साठवणूक व विक्रीविरोधात कठोर कारवाई करण्यासाठीच अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना आवाहन:
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, गांजा, ड्रग्ज किंवा कोणत्याही अमली पदार्थांची लागवड, साठवणूक वा विक्रीची माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल. अशा बेकायदेशीर कृत्यांवर शून्य सहनशीलतेचे धोरण राबवले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
देवळालीतील ही कारवाई अमली पदार्थांविरोधातील लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. दोन एकर क्षेत्रात सुरू असलेली गांजाची लागवड उघडकीस येऊन ती उद्ध्वस्त करण्यात आल्याने परिसरातील अवैध व्यवसायांना मोठा धक्का बसला आहे. पुढील तपासात आणखी धागेदोरे उघड होण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून अशा कारवाया आणखी तीव्र केल्या जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
दिव्य भारत बीएसएम न्यूज : दिनांक : 24 जानेवारी 2026

