दिव्य भारत बी एस एम न्यूज : दिनांक : 30 जानेवारी 2026
गारमाळच्या लेकीने गाठले महापौरपद
अतिदुर्गम सुरगाणा तालुक्यातून थेट कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेचे नेतृत्व

सुरगाणा, ता. ३० जानेवारी २०२६ | प्रतिनिधी : रतन चौधरी):-
सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटमाथ्याच्या पायथ्याशी वसलेल्या, अतिदुर्गम व आदिवासीबहुल गारमाळ या छोट्याशा गावासाठी आजचा दिवस अभिमानाचा व ऐतिहासिक ठरला आहे. या गावातील कन्या अॅड. हर्षाली राजाराम थविल चौधरी हिची कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाल्याने, आकांक्षित सुरगाणा तालुक्यातून थेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महानगरपालिकेचे नेतृत्व करण्याची संधी एका आदिवासी गावातील लेकीला मिळाली आहे. या निवडीमुळे संपूर्ण सुरगाणा तालुक्यात, आदिवासी समाजात आणि गारमाळ परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
संघर्षातून घडलेले नेतृत्व:

गारमाळ हे नावाप्रमाणेच हिरवळीने नटलेले, बनपाडा–मानतोडी धरणाच्या पाण्यावर आधारित बागायती शेती करणारे तालुक्यातील एकमेव गाव म्हणून ओळखले जाते. याच गावातील मूळ रहिवासी राजाराम थविल हे सुमारे चार–पाच दशकांपूर्वी रोजगाराच्या शोधात कल्याणजवळील पडघा येथे स्थलांतरित झाले. त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत वायरमन म्हणून प्रदीर्घ सेवा बजावली. शहरात स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी गावाशी आपली नाळ कधीही तोडली नाही. आई मंदाबाई थविल यांनी घर सांभाळत मुलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले. कष्ट, काटकसर, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जाणीव हे संस्कार त्यांनी मुलांमध्ये रुजवले. याच संस्कारांतून हर्षाली थविल यांची घडण झाली. त्यांचे भाऊ राहुल थविल सध्या मुंबई येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
वकिलीपासून समाजकारणापर्यंतचा प्रवास:
हर्षाली थविल यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण करून मुंबई उच्च न्यायालयात खाजगी वकिली सुरू केली. मात्र न्यायालयीन कामापुरते मर्यादित न राहता, समाजातील सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी काहीतरी करण्याची तळमळ त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्राकडे घेऊन गेली. त्यांनी शिवसेना (शिंदे गट) या पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील वडवली व अटाळी प्रभागातून सलग दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून येत त्यांनी लोकाभिमुख कामाचा ठसा उमटवला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, महिला सक्षमीकरण, सामाजिक उपक्रम आणि नागरी सुविधा या क्षेत्रांत त्यांनी प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला.
जनतेच्या विश्वासातून महापौरपद:
लोकाभिमुख नेतृत्वशैली, स्वच्छ प्रतिमा आणि संघटनात्मक बांधिलकी यांच्या जोरावर हर्षाली थविल यांना महापौरपदाची संधी मिळाली. गारमाळसारख्या अतिदुर्गम आदिवासी गावातील कन्या थेट महानगरपालिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणे, ही केवळ वैयक्तिक यशोगाथा नसून संपूर्ण आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी बाब ठरली आहे.
कुटुंबाचा ठाम पाठिंबा:
हर्षाली थविल यांचे पती विजय गोविंद चौधरी हे इंजिनिअर असून कल्याण येथे बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. विजय चौधरी यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. कुटुंबातील सामाजिक जाणीव, शिक्षणाची पार्श्वभूमी आणि ठाम पाठिंबा यामुळे हर्षाली यांच्या राजकीय वाटचालीला बळ मिळाले आहे.
आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी ठसा:
यापूर्वी सुरगाणा तालुक्यातील सतखांब येथील सूनबाई आणि साक्री तालुक्याच्या विद्यमान आमदार मंजुळा गावित यांनी धुळे महानगरपालिकेचे महापौरपद भूषविले होते. त्यानंतर आता हर्षाली थविल यांच्या निवडीमुळे आदिवासी समाजातील महिलांच्या नेतृत्वक्षमतेचा आणि कर्तृत्वाचा नवा अध्याय लिहिला गेला आहे. अतिदुर्गम भागातून शिक्षण, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर महानगराच्या नेतृत्वापर्यंत पोहोचलेली ही वाटचाल ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणींना नवी दिशा देणारी ठरणार आहे.
अभिनंदनाचा वर्षाव:
हर्षाली थविल यांच्या निवडीबद्दल सुरगाणा तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट)चे नगराध्यक्ष भरत वाघमारे, तालुका अध्यक्ष हरीभाऊ भोये, एकनाथ भोये, गणेश पवार, अर्जुन शिंदे, राहुल जोशी, तसेच पुष्पा वाघमारे, अरुणा वाघमारे, राधा वाघमारे, प्रमिला भोये, सचिन आहेर, भगवान आहेर, युवराज जाधव, अरुण पवार, सनी सोमवंशी, गणेश चाफळकर यांच्यासह गारमाळचे ग्रामस्थ आणि थविल कुटुंबीय सुरेश थविल, विनायक थविल, चरण थविल, सुभाष थविल, प्रकाश थविल आदींनी अभिनंदन केले आहे.
गारमाळसाठी अभिमानाचा क्षण:
आजही जामूनदरा–अंबाठा परिसरातील कौलारू घरातून शिक्षणाची वाट चोखाळत, संघर्षावर मात करत हर्षाली थविल चौधरी यांनी महानगरपालिकेचे सर्वोच्च नेतृत्व मिळवले आहे. हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नसून, “दुर्गम भागातील लेकही महानगराचे नेतृत्व करू शकते” हा विश्वास संपूर्ण समाजाला देणारा ठरला आहे.

दिव्य भारत बी एस एम न्यूज : दिनांक : 30 जानेवारी 2026
