कासा खडक ते खंदेरी किल्ला : १२ वर्षीय स्वराज पाटीलचा थरारक जलतरण पराक्रम – अवघ्या ५ तासांत नवा विक्रम

स्वराज हा उरण येथील सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सातवी इयत्तेत शिकतो. अभ्यासाबरोबरच जलतरणात त्याने विलक्षण प्रावीण्य मिळवले आहे. आपल्या आईकडून मिळालेला जलतरणाचा वारसा आणि कठोर मेहनत यांच्या जोरावर त्याने हा अद्भुत टप्पा गाठला आहे.स्वराज लहान वयापासूनच पोहण्याचा सराव करत असून, उरण नगर परिषदेच्या जलतरण तलावात तो नियमित सराव करतो. त्याची मेहनत आणि शिस्तच त्याच्या यशामागील खरी ताकद आहे.

शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी स्वराजने कासा खडक येथून आपल्या सागरी मोहिमेला सुरुवात केली. अंधारलेल्या समुद्रात पोहणे हे अत्यंत धाडसाचे काम असते. समुद्रातील लाटा प्रचंड होत्या, वारा वेगाने वाहत होता आणि आसपास मोठमोठी जहाजे ये-जा करत होती.परंतु या सर्व संकटांवर मात करत स्वराजने आपली दिशा कायम ठेवली आणि अखेर खंदेरी किल्ला गाठून इतिहास घडवला.

स्वराजने १८ कि.मी.चे सागरी अंतर ५ तास ६ मिनिटांत पूर्ण करून विक्रम केला. इतक्या कमी वयात, इतक्या कमी वेळेत हा पराक्रम करणारा तो पहिला जलतरणपट्टू ठरला आहे.हा पराक्रम केवळ एक खेळातील यश नाही, तर तो धैर्य, आत्मविश्वास आणि जिद्दीचा विजय आहे.

स्वराजचा हा पहिलाच विक्रम नाही. याआधीही त्याने उरणमधील मोरा जेट्टी ते मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे १२ कि.मी.चे अंतर ४ तास २५ मिनिटांत पोहत पूर्ण केले होते.त्या यशानंतर त्याने आणखी मोठ्या आव्हानासाठी स्वतःला तयार केले आणि आता कासा खडक ते खंदेरी किल्ला हा विक्रम करून दाखवला.

स्वराजच्या या धाडसी कामगिरीमुळे उरणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात त्याचे कौतुक होत आहे. नागरिक, शिक्षक, पालक, क्रीडाप्रेमी आणि सामाजिक संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.स्वराजच्या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक मुलांना प्रेरणा मिळणार असून “लहान वयातही मोठे स्वप्न पूर्ण करता येते” हा संदेश समाजात पोहोचला आहे.

स्वराजचा हा पराक्रम भविष्यातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आशादायक ठरत आहे. योग्य मार्गदर्शन आणि पाठबळ मिळाल्यास तो भारताचा मोठा जलतरणपट्टू म्हणून नाव लौकिक मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कासा खडक ते खंदेरी किल्ला हे अंतर पोहत पार करणे हे मोठ्या जलतरणपटूंनाही कठीण असते. अशा आव्हानावर मात करून स्वराजने सिद्ध केले की, वय नाही तर जिद्द महत्त्वाची असते.