कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठानच्या वतीने श्री कल्पेश गोसावीप्रा. लक्ष्मीकांत जोशी यांनी प्रास्ताविक सादर करत प्रतिष्ठानच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याचा आढावा मांडला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प. पू. स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी भूषविले. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “समाजाच्या उन्नतीसाठी मूल्याधिष्ठित संस्कार आणि सेवाभाव आवश्यक आहे.”

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे यांनी मनोगतात सांगितले की, “गेली ४८ वर्षे प्रतिष्ठान विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात संस्कृती आणि अध्यात्माचा जागर करीत आहे. दोन वर्षांनी सुवर्ण महोत्सव साजरा होणार असून ही वाटचाल अधिक प्रेरणादायी ठरेल.”यावेळी डॉ. विजय गोसावी यांनीही आपले विचार मांडत महर्षी सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला उजाळा दिला.

कार्यक्रमातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे सन २०२६ साठी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान सोहळा.

प्रमुख पुरस्कार पुढीलप्रमाणे प्रदान करण्यात आले :

  • पुण्यश्लोक सद्गुरु शिवपार्वती आध्यात्मिक पुरस्कार – वे. मू. देवव्रत महेश रेखे
  • पुण्यश्लोक श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार – श्री विवेक दंडवते गुरुजी (नाशिक)
  • नंदलाल जोशी वेदवेदांग पुरस्कार – वे. मू. शांतारामशास्त्री भानोसे
  • लोकसेवक पुरस्कार – श्री सीताराम कोल्हे (नाशिक)
  • वैदेही सर्जनशीलता पुरस्कार – वृषाली बनकर
  • विशेष प्रज्ञावंत पुरस्कार – भानुदास खरोटे

याशिवाय आदर्श संस्था पुरस्कार श्रुति स्मृतिप्रतिष्ठान वेदपाठशाळा, त्र्यंबकेश्वर यांना प्रदान करण्यात आला. तसेच गुणवंत पुरस्कार बाल संस्कार केंद्र (एचएएल हायस्कूल, ओझर) यांना देण्यात आला.शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात “श्रीमद्भगवतगीतेतून वेचलेले मोती (शिवज्योती विशेषोक)” या ग्रंथाचे प्रकाशन वे. मू. देवव्रत रेखे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशनामुळे सोहळ्याला वैचारिक व आध्यात्मिक उंची लाभली.

पुरस्कारार्थींच्या वतीने सीताराम कोल्हेमुकुंद कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प. पू. मकरंद महाराजांनी आशीर्वाद देत प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.यावेळी स्वरूपानंद सरस्वती यांनी वेदांचे महत्त्व सांगताना नमूद केले की, “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही वेदांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक माणसाचा उत्कर्ष व्हावा हेच वेदांचे प्रयोजन आहे.”

कार्यक्रमाचा समारोप प्रा. लक्ष्मीकांत जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानून केला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

एकूणच हा स्मृतिदिन व पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी व यशस्वी ठरला. अध्यात्म, समाजसेवा, शिक्षण व संस्कृती यांचा सुरेख संगम साधणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारा ठरला.