येडशीत रमजान उपवासाची सुरुवात – जामा मस्जिद आकर्षक विद्युत सजावटीने उजळली

रमजान महिना हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत पुण्याचा काळ समजला जातो. या महिन्यात अल्लाहची इबादत, नमाज, कुराण पठण, दानधर्म आणि आत्मशुद्धी यावर विशेष भर दिला जातो.रोजा म्हणजे केवळ उपवास नव्हे, तर तो आत्मसंयम, सहनशीलता आणि गरिबांची जाणीव करून देणारा एक धार्मिक साधना मार्ग आहे.

रमजान महिन्यात पहाटेच्या सुमारास मुस्लिम बांधव सहेरी करून दिवसाच्या उपवासाची सुरुवात करतात. त्यानंतर नमाज पठणासाठी मस्जिदकडे जाण्याची लगबग सुरू होते.आज पहिल्या रोजाच्या दिवशी येडशी गावातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने जामा मस्जिदमध्ये नमाजासाठी उपस्थित होते.

रोजा धारण करणारे मुस्लिम बांधव दिवसभर कोणतेही अन्न किंवा पाणी न घेता उपवास करतात. हा उपवास शारीरिक तपश्चर्या नसून आध्यात्मिक साधना मानली जाते.विशेष म्हणजे रमजान महिन्यात लहान मुलांमध्येही रोजा पकडण्याची उत्सुकता दिसून येते. अनेक चिमुकले देखील मोठ्यांचे अनुकरण करून रोजा ठेवण्याचा प्रयत्न करतात.

संध्याकाळी सूर्यास्तानंतर इफ्तार करून उपवास सोडला जातो. परंपरेनुसार खजूर व पाणी घेऊन रोजा पूर्ण केला तो.इफ्तारच्या वेळी विविध फळे, पेये आणि पारंपरिक पदार्थ ठेवले जातात. यामुळे समाजात एकोप्याचे आणि बांधिलकीचे वातावरण निर्माण होते.

रमजानच्या स्वागतासाठी काल दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी येडशी येथील जामा मस्जिद परिसराची स्वच्छता करून आकर्षक विद्युत लाईटिंग सजावट करण्यात आली.ही सजावट पाहून मुस्लिम समाज बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले.या सजावटीसाठी जामा मस्जिद कमिटीने विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमात जामा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष जब्बार यासीन पटेल यांच्या उपस्थितीत सचिव सल्लाऊदिन शेख यांनी पुढाकार घेतला.सजावटीसाठी आणि स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या सर्व सदस्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवर पुढीलप्रमाणे होते :

  • मौल्लवी अमजद पटेल
  • अध्यक्ष : जब्बार यासीन पटेल
  • उपाध्यक्ष : अशफाक पटेल
  • कोषाध्यक्ष : लतिफ (सर) शेख
  • सदस्य : महामुद पटेल
  • खालिद शेख
  • साहेबलाल शेख
  • युसफ कोतवाल
  • समीर कोतवाल
  • अखिल नजीर शेख
  • सुभान शेख

रमजान महिना हा केवळ उपवासाचा काळ नसून समाजात शांती, बंधुता, सेवाभाव आणि आत्मशुद्धीचा संदेश देणारा पवित्र पर्व आहे.येडशी गावातील रमजानची सुरुवात भक्तिमय वातावरणात झाल्याने संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा पसरली आहे.