शिरगाव येथे ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ व पालघर मिनी सरस प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन
“पालघर जिल्हा जगाशी जोडला जाणार…” – पालकमंत्री गणेश नाईक यांचा विश्वास

दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार : दि. 19 फेब्रुवारी 2026
पालघर | ( प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके ):-
शिरगावच्या नयनरम्य किनारपट्टीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ आणि पालघर मिनी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या महोत्सवाचे शुभारंभ करण्यात आले. कोकणच्या संस्कृती, पर्यटन, स्थानिक उद्योजकता आणि बचतगटांच्या उत्पादनांचा संगम साधणारा हा महोत्सव 22 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शिरगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यामध्ये आमदार राजेंद्र गावित, वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर आजिव पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन) एस. पी. रामाराव, उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आदी अधिकारी उपस्थित होते.
तसेच शिरगावचे सरपंच घनश्याम मोरे, प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, सातपाटीच्या सरपंच सीमा भोईर, पालघरचे भूमिपुत्र व राष्ट्रीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर, आयुष म्हात्रे यांच्यासह अनेक सांस्कृतिक व सिने क्षेत्रातील कलाकार – अरुण नलावडे, विजय पाटकर, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे यांचीही उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
किनारपट्टी पर्यटन विकासासाठी व्यापक आराखडा

उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी पर्यटन विकासाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली.शिरगाव, केळवा, सातपाटी, माहीम, चिंचणी, बोर्डी, नांदगाव, वाढराई, एडवन, उसरणी, अर्नाळा तसेच वसई या सर्व किनारपट्टी भागांचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“पर्यटकांसाठी सुरक्षा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत निसर्गसौंदर्य अधिक खुलविण्यावर भर दिला जाईल,” असे त्यांनी सांगितले.यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांना डीपीडीसी बैठकीत सविस्तर विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही दिल्याचे त्यांनी नमूद केले.
वाढवण बंदरामुळे पालघरचा कायापालट
पालकमंत्री नाईक यांनी वाढवण बंदर प्रकल्प पालघर जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असे सांगितले.“वाढवण येथे उभारले जाणारे बंदर आशियातील महत्त्वाच्या बंदरांपैकी एक ठरणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल,” असे त्यांनी सांगितले.तसेच बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, बडोदा–मुंबई मार्ग आणि विरार–अलिबाग मार्ग यामुळे जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे जाळे उभे राहील.“उद्योग येतील; पण स्थानिक शेतकरी आणि युवकांचा विकास केंद्रस्थानी राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘हरित पालघर’ची संकल्पना

राज्यातील 300 कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्टाअंतर्गत पालघर जिल्ह्यात 12 कोटी झाडे लावण्याचे नियोजन असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.वणव्यांवर नियंत्रणासाठी चॉपर व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, ड्रोन व एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वन्यजीव हल्ले रोखण्याचे उपाय केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिकांना विकासाचा थेट लाभ
महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘कोकण सरस’ प्रदर्शनाला चालना देत स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प पालकमंत्री नाईक यांनी व्यक्त केला.भविष्यात प्रवासी जलवाहतूक गुजरातपर्यंत विस्तारण्याचा मानसही त्यांनी जाहीर केला.“निधी कमी पडला तरी उभारला जाईल; विकास थांबणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.
कोकण संस्कृती व आधुनिक विकासाचा संगम
‘ग्लोबल कोकण महोत्सव’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून कोकणच्या पर्यटन, उद्योग, स्थानिक उत्पादन आणि सामाजिक एकात्मतेचा नवा मंच ठरत आहे.पालघर जिल्ह्याला जागतिक स्तरावर जोडणारा हा महोत्सव जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.

✍️ दिव्य भारत बीएसएम न्यूज
प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके | पालघर
📞 जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क : +91 8208180510
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या : www.divyabharatbsmnews.com
