छत्रपती शिवरायांचे आयुष्य धगधगता संघर्षप्रवास – डॉ. खालकर

एम.व्ही.पी. समाजाच्या स्वामी षट्कोपाचार्यजी महाराज महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व वंदन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिवरायांना अभिवादन करत वातावरणात गौरवशाली इतिहासाची आठवण जागवली.

प्रमुख व्याख्याते प्रा. अभिन पोटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षपूर्ण जीवनाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांनी आपल्या कारकीर्दीत जितक्या लढाया केल्या, त्या प्रत्येक युद्धामागे अत्यंत बारकाईने केलेले नियोजन असायचे. त्यामुळे त्यांना विजयाची खात्री मिळत असे. ते पुढे म्हणाले की, जीवनामध्ये कोणतेही कार्य करताना नियोजन अत्यंत आवश्यक आहे. संकटांना घाबरून न जाता त्यातून पर्याय शोधणे आणि मार्ग काढणे हीच शिवरायांची शिकवण आहे.

प्रा. पोटे यांनी विशेषतः स्वराज्याची संकल्पना स्पष्ट करत सांगितले की, स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. शिवाजी महाराजांनी समाजातील सर्व जाती-धर्मांना राज्यनिर्मितीच्या यज्ञामध्ये सामावून घेतले. सर्वसामान्यांचे राज्य निर्माण करून त्यांनी लोककल्याणाचा आदर्श घालून दिला.

जनतेच्या आग्रहास्तव त्यांनी राज्याभिषेक करून घेतला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवराय जनतेच्या हृदयात कायम घर करून राहिले याचे श्रेय त्यांच्या प्रेमळ स्वभावाला, निष्ठेला आणि रयतेशी असलेल्या जिव्हाळ्याला जाते, असे त्यांनी प्रतिपादन केले. शिवाजी महाराजांचे विचार जगभर पोहोचले आहेत. मात्र, त्यांचे विचार समजून घेण्यासाठी केवळ भाषण पुरेसे नाही, तर त्या विचारांचे आचरण करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. के. एम. खालकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, शिवाजी महाराजांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले अस्तित्व निर्माण केले होते. ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रांतील त्यांचा सहभाग अभ्यासपूर्ण होता.

त्यामुळे स्वराज्य निर्मितीचे त्यांचे कार्य अतुलनीय आणि चिरंतन ठरते. शिवरायांचा इतिहास केवळ पुस्तकात राहता कामा नये, तर तो आपल्या कृतीत उतरला पाहिजे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कैलास गोपाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका कविता पावशे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, नेतृत्वगुण आणि संघर्षाची प्रेरणा निर्माण झाली.

महाविद्यालयात साजरी झालेली शिवजयंती ही केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांसाठी जीवनमूल्यांचा संदेश देणारी ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे संघर्षमय जीवन आणि स्वराज्याची संकल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

जय भवानी! जय शिवाजी!