दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार :दिनांक : २५ फेब्रुवारी २०२६
🌎 २७ फेब्रुवारी : ‘मराठी भाषा गौरव दिन’ – मातृभाषेचा सन्मान जपूया 🌎
नागपूर, (प्रतिनिधी:रमेश लांजेवार ):-
२७ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरातील मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आधुनिक मराठी साहित्यातील मानदंड, कवी, नाटककार, कथाकार आणि समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी ‘मराठी भाषा दिवस’ अथवा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. मराठी भाषेचा गोडवा, माधुर्य आणि सोज्वळपणा यामुळेच या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे येथे झाला. त्यांनी आपल्या लेखनातून मराठी भाषेचा गौरव वाढवला. त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी भाषा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता जगभर पोहोचवली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणूनच हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणूनही ओळखला जातो.
मराठी भाषेचा वैभवशाली वारसा:
मराठी भाषा ही सोज्वळ, निर्मळ आणि सहज अवगत होणारी भाषा आहे. महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, संत परंपरा, स्वातंत्र्य लढ्याची परंपरा, समाजसुधारकांची चळवळ आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा या भाषेतूनच पुढे आला. पोवाडे, भारूड, कीर्तन, भजन, लावणी अशा लोककलांच्या माध्यमातून मराठी भाषेने समाजजागृतीचे कार्य केले. मराठी भाषा ही गंगेसारखी निर्मळ, तुळशीसारखी पवित्र आणि वटवृक्षासारखी विशाल आहे. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी भाषेचा वापर शासन, प्रशासन आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जातो.
नव्या पिढीची जबाबदारी:
आजच्या आधुनिक युगात इंग्रजीसह विविध भाषा शिकणे आवश्यक आहे. मात्र मातृभाषेला विसरून चालणार नाही. अलीकडील काळात ‘आई-बाबा’ ऐवजी ‘मम्मी-पप्पा’, ‘काका-काकू’ ऐवजी ‘अंकल-आंटी’ असे शब्दप्रयोग वाढताना दिसतात. यामुळे मराठी भाषेतील मूळ शब्दांचा वापर कमी होत आहे.
मराठी भाषा टिकवायची असेल तर घराघरात मराठीत संवाद वाढवणे आवश्यक आहे. मुलांना मराठी वृत्तपत्रांचे वाचन, साहित्यकृतींचे अध्ययन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल. प्रत्येक ४० किलोमीटरवर मराठी भाषेचा वेगळा गोडवा अनुभवायला मिळतो. या बोलीभाषा हेच मराठीचे सौंदर्य आहे.
जागतिक स्तरावर मराठीचा विस्तार:
आज जगातील अनेक देशांत मराठी भाषिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे मराठीचा जागतिक स्तरावर विस्तार होत आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख मिळण्यात मराठी भाषेची सुलभता आणि स्वागतशीलता हेही एक कारण आहे.मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने मराठीचा प्रचार-प्रसार करण्याची शपथ घेणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अधिक सक्षम आणि व्यापक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणेही महत्त्वाचे ठरेल.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश:
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश देणेही काळाची गरज आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल, ग्लेशियर वितळणे, समुद्र पातळी वाढणे अशा समस्यांमुळे पृथ्वीचे संतुलन बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषा दिनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केल्यास एक सकारात्मक संदेश जगाला देता येईल. लाखो झाडे लावून हिरवाई निर्माण करणे ही मराठी भाषिकांची सामाजिक जबाबदारी ठरू शकते. मराठी भाषा ही आपल्या पूर्वजांचा ठेवा आणि ईश्वरी देण आहे. तिचा सन्मान राखणे, प्रचार-प्रसार करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. २७ फेब्रुवारीच्या निमित्ताने आपण सर्वांनी संकल्प करुया की – “जगात कुठेही गेलो तरी मातृभाषा मराठीचा विसर पडू देणार नाही.”
मराठी भाषेला मानाचा मुजरा!
जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
✍️ रमेश कृष्णराव लांजेवार
(स्वतंत्र पत्रकार, नागपूर)
मो. ९९२१६९०७७९
दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार :दिनांक : २५ फेब्रुवारी २०२६

