खिर्डी गावात ‘डोक्यावरचा हंडा’ खाली; २०० रोलर ड्रम वाटपाने महिलांना दिलासा, सामाजिक सेवेतून उभा राहिला आदर्श

दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार : दिनांक : १६ एप्रिल २०२६
सुरगाणा (नाशिक), प्रतिनिधी:रतन चौधरी) :-
अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या खिर्डी गावातील महिलांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणणारा उपक्रम नुकताच यशस्वीपणे राबविण्यात आला. अनेक वर्षांपासून पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करत डोक्यावर दोन-दोन हंडे घेऊन पाणी आणण्याची कसरत करणाऱ्या या महिलांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. ‘मिशन हर घर जल’ या उपक्रमांतर्गत २०० रोलर ड्रम (नीर चक्र) वाटप करण्यात आल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा अक्षरशः जमिनीवर आला असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे.

खिर्डी गावातील महिलांना दररोज पाणी आणण्यासाठी उन्हातान्हात अनवाणी पायांनी दूरवरच्या झऱ्यांपर्यंत, विहिरींपर्यंत जावे लागत होते. या प्रक्रियेत शारीरिक थकवा, आरोग्याच्या समस्या आणि वेळेची मोठी हानी होत होती. अनेक वेळा महिलांना सकाळपासून दुपारपर्यंत केवळ पाणी आणण्यासाठीच वेळ द्यावा लागत होता. त्यामुळे घरकाम, शेतीकाम आणि मुलांच्या संगोपनावरही परिणाम होत होता. या सर्व अडचणी लक्षात घेऊन स्वयंसेवी संस्था, जल परिषद आणि इनर व्हिल क्लब ऑफ जेन नेक्स्ट रोटरी क्लब तसेच स्वयंशक्ती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.या प्रकल्पांतर्गत गावातील गरजू महिलांना २०० रोलर ड्रमचे वितरण करण्यात आले. या ड्रमच्या सहाय्याने महिलांना आता पाणी डोक्यावर न नेता जमिनीवर ओढत नेणे शक्य झाले आहे. यामुळे त्यांच्या शारीरिक श्रमात मोठी बचत होणार आहे. तसेच पाण्याची वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित झाली आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या दैनंदिन जीवनात लक्षणीय बदल होणार असल्याचे दिसून येत आहे.

कार्यक्रमाच्या वेळी इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षा रमा वर्मा, सचिव अंकिता पाटील, खजिनदार विद्या साखरे, उपाध्यक्ष शाल्मली शेट्टी, माजी अध्यक्षा दीपाली चांडक, सदस्य अनुपमा शेवाळे, पूजा छाजेड, शिल्पा शेट्टी, अर्चना सिरसाठ, तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष दिपाली चांडक, आशिष चांडक, अनिल साखरे उपस्थित होते. याशिवाय जल परिषद मित्र परिवाराचे देविदास कामडी, सेवानिवृत्त आरोग्य संचालक रघुनाथ भोये, भारती भोये, शिक्षक रतन चौधरी, विस्तार अधिकारी राज आहेर यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पाहुण्यांचे आदिवासी परंपरेनुसार केलेले स्वागत. कहाळी, संबळ, पावरी, ढोल, तुर यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात ग्रामस्थांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या सुमधुर वाद्यांच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरत कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. आदिवासी संस्कृतीची झलक या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाली.

या प्रसंगी अध्यक्षा रमा वर्मा यांनी सांगितले की, “या प्रकल्पाचा मुख्य उद्देश गावातील महिलांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या डोक्यावर पाणी वाहून नेण्याचा शारीरिक ताण कमी करणे हा आहे. महिलांना दररोजच्या कष्टातून थोडासा दिलासा मिळावा, यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून अधिकाधिक गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल.या कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सीपीआर (CPR) प्रशिक्षण आणि आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली.कार्यक्रमाला परिसरातील सुमारे ५०० हून अधिक ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमानंतर सर्व पाहुण्यांनी आणि ग्रामस्थांनी आदिवासी पारंपरिक खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेतला. एकत्रित भोजनामुळे सामाजिक एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली. या उपक्रमामुळे समाजातील परस्पर सहकार्य, आपुलकी आणि सेवाभावाची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

खिर्डी गावातील या उपक्रमामुळे केवळ महिलांच्या जीवनातच बदल झाला नाही, तर संपूर्ण गावासाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन केलेल्या या कार्यामुळे खऱ्या अर्थाने ‘सेवा हीच परमोच्च धर्म’ ही संकल्पना साकार झाली आहे.एकूणच, खिर्डी गावातील हा उपक्रम हा ग्रामीण भागातील समस्यांवर उपाय शोधण्याचा एक यशस्वी प्रयोग ठरला आहे. महिलांच्या कष्टाला दिलासा देत त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा हा उपक्रम भविष्यात इतर गावांसाठीही मार्गदर्शक ठरणार आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि संस्थांच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला असून, समाजाप्रती संवेदनशीलता आणि बांधिलकीचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार : दिनांक : १६ एप्रिल २०२६
