कसबे सुकेने येथे शेतकरी-वारकरी समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक; १ ते ९ जूनदरम्यान हरिनाम कीर्तन महोत्सवाचे आयोजन

दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार : दिनांक : २२ एप्रिल २०२६

निफाड ,प्रतिनिधी – भगवान बोराडे

नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेने येथील महालक्ष्मी माता मंदिर परिसरात शेतकरी-वारकरी समन्वय समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत शेती, अध्यात्म आणि अर्थकारण यांचा संगम घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी १ जून २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत महालक्ष्मी मंदिर परिसरात “शेतकरी वारकरी हरिनाम कीर्तन महोत्सव” आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

भगवान बोराडे यांनी सांगितले की, धर्मशास्त्राच्या मार्गदर्शनासोबतच शेतीच्या अर्थशास्त्राचे प्रबोधन होणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या काळात शेतकऱ्यांना केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक आधार नव्हे, तर आर्थिक साक्षरतेचीही गरज आहे. या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधण्यासाठी हा हरिनाम कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.नाशिक जिल्ह्यातील सुमारे ५६ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी जप्ती व लिलावाच्या प्रक्रियेला सामोरे जात असल्याचा गंभीर मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. या अन्यायकारक परिस्थितीच्या विरोधात १ जून २०२३ पासून सुरू असलेल्या शेतकरी कर्जमुक्ती धरणे आंदोलनाला १ जून २०२६ रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरच या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

बैठकीत बोलताना बोराडे यांनी सांगितले की, निवडणुकांपूर्वी राज्यातील सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे मोठे आश्वासन दिले होते. “सातबारा कोरा करू” असे सांगून मतदारांचा विश्वास संपादन करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव थांबलेले नाहीत. कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मानसिक, सामाजिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.१ ते ९ जूनदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात दररोज हरिनाम कीर्तन, प्रवचन, भजन, तसेच कृषी अर्थशास्त्रावरील मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. यासोबतच “बळीराजा महालक्ष्मी महायज्ञ” देखील महालक्ष्मी मंदिरासमोर पार पडणार आहे. या महायज्ञाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, त्यांच्या जीवनात समृद्धी यावी आणि शेतीला नवसंजीवनी मिळावी, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे.या बैठकीत पुणे येथील कृषी अर्थतज्ञ डॉ. सतीश देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या काळात शेती हा केवळ परंपरागत व्यवसाय न राहता तो एक विज्ञानाधारित आणि बाजारपेठेवर आधारित उद्योग झाला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च, बाजारभाव, साठवणूक, प्रक्रिया आणि विपणन यांचा अभ्यास करून पुढे जाणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी पद्धतीने काम केल्यास त्यांना अधिक लाभ मिळू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत शेतकरी संघटनेचे सुरुवातीचे लढवय्ये शिलेदार म्हणून ओळखले जाणारे अशोक गणपत जाधव, लक्ष्मण मामा भंडारे, सुदाम तात्या जाधव आणि धोंडीराम अण्णा जाधव यांनीही आपले अनुभव मांडले. त्यांनी गेल्या काही दशकांतील शेतकरी चळवळींचा आढावा घेताना, आजच्या पिढीने संघर्षाची परंपरा पुढे नेण्याचे आवाहन केले.या प्रसंगी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि वारकरी उपस्थित होते. बैठकीत शकील हसन सय्यद, एकनाथ चौधरी, बाळासाहेब विष्णू जाधव, सुरेश भंडारे, रंगनाथ जाधव, सुरेश रंगनाथ भंडारे, अशोक कचरू भंडारे, बाजीराव भंडारे, बाजीराव जाधव, मनोहर जाधव, प्रकाश शेवकर, दत्तू देशमुख, मोती नाना पाटील, शंकर भाऊ जाधव, मधुकर संगमनेर, दगू संपत जाधव, विलास भंडारे, रमेश भंडारे, रमेश जाधव, मधुकर हरि जाधव, गोविंद जाधव, सर्जेराव त्रंबक मोरे, गणपत भंडारे, योगेश भंडारे, पुंडलिक भोज, लक्ष्मण जाधव, बाळू शेटे, हरिभाऊ भंडारी आदींसह अनेक मान्यवर शेतकरी उपस्थित होते.एकूणच, कसबे सुकेने येथे झालेली ही बैठक शेतकरी आणि वारकरी यांच्यातील समन्वय दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. येणाऱ्या काळात आयोजित करण्यात येणारा हरिनाम कीर्तन महोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकणारा आणि त्यांना नव्या दिशेने प्रेरित करणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार : दिनांक : २२ एप्रिल २०२६