दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार :दिनांक : २९ एप्रिल २०२६

नागपूर:-राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचे अनुकरण करून सर्वत्र वृक्षारोपण व्हावे
३० एप्रिल १९०९ रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर होते.जनुकाय एक चमकता तारा या पृथ्वीवर उदयास आला की काय असे वाटायला लागले.आपण पहातो की, कोणतेही युद्ध जिंकण्यासाठी शस्त्र आवश्यक असते यात तलवार,बंदुक, दारूगोळा किंवा इतर शस्त्रांचा वापर केला जातो.परंतु ईश्वराने जनुकाय इंग्रजांशी लढा देण्यासाठी व राष्ट्रहितासाठी तुकडोजी महाराजांना “खंजिरी” हे शस्त्र दिले की काय असे त्यावेळी सर्वांनाच वाटु लागले.खंजिरी दिसायला जरी छोटी असली तरी समाज प्रबोधनाच्या दृष्टीने आणि इंग्रजांच्या मानगुटीवर बसणारे तीक्ष्ण (धारदार)शस्त्र होते.
तुकडोजी महाराजांनी (खंजिरी)या शस्त्राने एकाच वेळी दोन बाजू साध्य केल्या त्यामध्ये समाजातील भेदभाव दूर करून समाजात एकता व अखंडता प्रबोधनाच्या माध्यमातून निर्माण करून जनजागृती निर्माण केली आणि दुसरे अत्यंत महत्त्वाचे म्हणजे इंग्रजां विरूध्द लढा उभारण्यासाठी खंजिरीच्या माध्यमातून संपूर्ण जनता एकत्र येणे व स्वतंत्र लढा यशस्वी करणे हा मुख्य उद्देश तुकडोजी महाराजांचा होता आणि तो साध्य करून दाखविला.कारण त्याकाळी त्यांच्या खंजिरीचा आवाज संपूर्ण भारतात गुंजत होता अशा परिस्थितीत इंग्रजांमध्ये सुध्दा भितीचे वातावरण निर्माण झाले होते.यावरून स्पष्ट होते तुकडोजी महाराजांच्या खंजिरीने इंग्रजांची झोप उडाली व धाबे दणाणून सोडले होते.कारण त्याकाळी तुकडोजी महाराजांनी खंजिरीच्या बळावर संपूर्ण देश एकत्र करून स्वतंत्र संग्रामाची जोत प्रज्वलित करण्याचे महान कार्य केले आणि खंजिरीच्या माध्यमातून प्रबोधन देवून स्वतंत्र लढा उभारण्यासाठी तुकडोजी महाराजांनी लाखमोलाची कामगिरी केली.खंजिरीच्या माध्यमातून भजन, कीर्तन, प्रवचन करून समाजामध्ये जनजागृती निर्माण करून समाजात बंधुभाव निर्माण व्हावा आणि इंग्रजांविरूध्द लढण्यासाठी संपूर्ण समाजबांधव एकत्रित करून खंजिरीच्या माध्यमातून इंग्रजांना धारेवर धरले आणि समाजात जनजागृती निर्माण केली.तुकडोजी महाराजांचे महान कार्य पाहून संपूर्ण देश आश्चर्यचकित झाला.
अशा परिस्थितीत त्यांच्या सामाजिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन तुकडोजी महाराजांना ‘राष्ट्रसंत’ ही पदवी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी बहाल केली होती. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान, ‘ग्रामगीता’ ग्रंथातून दिलेला सामाजिक संदेश आजही समाजात प्रभावी आहेत.खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामविकास आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी मोठे योगदान दिले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपान सारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. “आते है नाथ हमारे” हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी गावाचा विकास, नैतिकता आणि सुसंस्कृत जीवनाचा मार्ग दाखवला आहे.देशात राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी गावोगावी’गुरुदेव सेवा मंडळा’ची स्थापना केली, ज्याद्वारे भजनाच्या माध्यमातून लोकांमध्ये सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते एक प्रगल्भ विचारवंत व देशभक्त होते. त्यांनी ‘गावाचा विकास म्हणजेच राष्ट्राचा विकास’ हा मुलमंत्र दिला. त्यांचे कार्य आणि विचार आजही ग्रामविकासासाठी प्रेरणादायी आहेत. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते.
संत तुकडोजी महाराजांचे कार्य संपूर्ण मानवतेसाठी आणि देशासाठी प्रेरणादायी आहे.या महान विभूतीची जोत ३१ ऑक्टोबर, १९६८ रोजी मावळली व संपूर्ण देश स्तब्ध झाला.अशा प्रकारे आपले संपूर्ण जीवन राष्ट्रहितासाठी समर्पित करून देशाला महत्वपूर्ण दिशा.त्यामुळे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचे सर्वांनीच अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. आज बदलत्या हवामानामुळे,प्रदुषण,औद्योगिक, शहरीकरण, जंगलतोड,यामुळे निसर्गाचे संतुलन डगमगतांना दिसत असून पृथ्वी भयभीत आहे.यामुळे विदर्भासह संपूर्ण देशात सुर्य आग ओकतांना दिसतो देशातील काही भागात तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर आहे काही भागात ४६ अंश सेल्सिअस पर्यंत पोचले आहे.हा सर्वप्रकार पृथ्वीचे संतुलन बिघडल्यामुळे निर्माण झालेली भयावह परिस्थिती आहे.आता राज्यासह देशातील अनेक भागात” एल निनो”मुळे पाणी टंचाई व दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.यापासुन बचावासाठी राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड अत्यंत गरजेचे आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यासह देशातील जनतेनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली पाहिजे यामुळे हवामानाचे संतुलन स्थिर रहाण्यास मोठी मदत होईल आणि सर्वांना शुद्ध हवा, ऑक्सिजन, सावली व गुरांना चारा मिळेल आणि आपल्याला प्रत्येक झाडाच्या, पानात, फुलात,फळात,मुळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अवश्य दर्शन होईल.कारण संत तुकडोजी महाराजांचा सहवास सर्वात जास्त वृक्षांच्याच सानिध्यात रहाला आहे.त्यामुळे आजच्या दिवशी वृक्षलागवड करून राष्ट्रसंतांना नमन करू या.जय हिंद.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
( स्वतंत्र पत्रकार )
मो.नं.९९२१६९०६७९, नागपूर.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार :दिनांक : २९ एप्रिल २०२६
