येडशी येथे जनता विद्यालय ते चोराखळी डांबरीकरण रस्त्याचे काम बंद , जनता त्रस्त , धाराशिव पालकमंत्रीचे दुर्लक्ष.
दिव्य भारत बी एस एम न्यूज : गुरुवार : दिनांक: ३० एप्रिल २०२६
येडशी येथे जनता विद्यालय ते चोराखळी डांबरीकरण रस्त्याचे काम बंद , जनता त्रस्त , धाराशिव पालकमंत्रीचे दुर्लक्ष.
येडशीतील जनता विद्यालय–चोराखळी रस्ता रखडला; नागरिकांचा संताप, तातडीने काम सुरू करण्याची मागणी
दिव्य भारत बीएसएम न्यूज | गुरुवार | दिनांक : ३० एप्रिल २०२६

येडशी (प्रतिनिधी : सुभान शेख) – धाराशिव तालुक्यातील येडशी गावातील जुना चमडा बाजार परिसरातील गट क्रमांक 9505 अंतर्गत असलेला जनता विद्यालय ते चोराखळी हा महत्त्वाचा रस्ता सध्या रखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने मंजूर केलेल्या या रस्त्याच्या कामाला वारंवार खंड पडत असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी हा रस्ता अत्यंत नित्कृष्ट अवस्थेत होता. मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. विशेष म्हणजे हा रस्ता जनता विद्यालयापासून ग्रामपंचायतीकडे जाणारा मुख्य मार्ग असून, प्रभात फेरी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
दररोज येडशी गावासह आसपासच्या खेड्यांमधून हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी जनता विद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करतात. याशिवाय, गावातील वयोवृद्ध नागरिक, महिला तसेच शेतकरी आणि व्यापारी वर्गातील लोक भारतीय स्टेट बँकेत आर्थिक व्यवहारांसाठी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था ही केवळ गैरसोय नसून नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण करणारी ठरली होती.या गंभीर परिस्थितीची दखल घेत येडशी येथील संजय (काका) लोखंडे यांनी पुढाकार घेत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. मात्र, काम सुरू झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून या कामाला स्थगिती देण्यात आली. परिणामी, अनेक महिने हे काम प्रलंबित राहिले.
नंतर स्थगिती उठविल्यानंतर ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजना’ अंतर्गत जनता विद्यालय ते चोराखळी या रस्त्यासाठी सुमारे २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, स्थानिक स्तरावर पुढाकार घेतलेल्या संजय काका लोखंडे यांना या कामाचे टेंडर न देता, लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील कंत्राटदार बी. एस. पवार यांना हे काम देण्यात आले, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दिनांक ३ मार्च २०२६ रोजी या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. मात्र, उद्घाटनानंतर काही दिवसांतच कामाला अचानक ब्रेक लागला. अनेक दिवस काम पूर्णपणे बंद राहिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.या संदर्भात दिव्य भारत बीएसएम न्यूजचे संपादक डॉ. भागवत महाले यांच्या मार्गदर्शनाखाली येडशी येथील पत्रकार सुभान शेख यांनी संबंधित कंत्राटदार बी. एस. पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार फोन करूनही त्यांनी कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. पत्रकारांना सहकार्य न केल्याने प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.पाठपुरावा केल्यानंतर काही प्रमाणात हालचाल झाली आणि रस्त्यासाठी दगड व मुरूम टाकण्यात आले. नंतर मजुरांच्या साहाय्याने दगड फोडण्याचे कामही करण्यात आले. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा काम बंद करण्यात आले असून, सध्या रस्ता अर्धवट अवस्थेतच आहे.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जर हे काम स्थानिक पातळीवर संजय काका लोखंडे यांना देण्यात आले असते, तर आजपर्यंत रस्ता पूर्ण झाला असता आणि नागरिकांना या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या नसत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा एसटी महामंडळाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी होत आहे.या रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत धोकादायक बनली असून, कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि वयोवृद्ध नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून रस्त्याचे काम सुरळीतपणे सुरू करावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही अपघातास जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. त्यामुळे जनता विद्यालय ते चोराखळी हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
दिव्य भारत बी एस एम न्यूज : गुरुवार : दिनांक: ३० एप्रिल २०२६
