दिव्य भारत बीएसएम न्यूज : सोमवार दिनांक : ४ मे २०२६
डहाणू तालुक्यात लालबावट्याचे नवे कार्यालय उद्घाटन; ‘शिव विचार जागर’ कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह

पालघर, (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके ):
डहाणू तालुक्यातील आशागड येथे पक्षाच्या नव्या कार्यालयाचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे कार्यालय अखेर पक्ष कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून उभे राहिले असून, त्यामुळे तालुक्यातील संघटनात्मक कामकाजाला नवे बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. या कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे ज्येष्ठ नेते ९८ वर्षीय एल. बी. धनगर आणि पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमाची सुरुवात पक्षाचे प्रणेते कॉ. शामराव परुळेकर व कॉ. गोदावरी परुळेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात उपस्थित मान्यवरांनी पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला तसेच नव्या कार्यालयामुळे संघटनात्मक कामकाजाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ‘शिव विचार जागर सप्ताह’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेला बौद्धिक उपक्रम. पक्षाच्या राज्य कमिटीने दिलेल्या हाकेनुसार, या सप्ताहाचा भाग म्हणून कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकातील काही भागाचे वाचन करण्यात आले. प्राची हातिवलेकर यांनी अत्यंत प्रभावीपणे या पुस्तकातील निवडक भाग सादर केला. या वाचनातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची सामाजिक व प्रगतिशील बाजू अधोरेखित करण्यात आली.कार्यक्रमात ज्येष्ठ नेते एल. बी. धनगर यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या दीर्घ संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करताना कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे कौतुक केले. “श्रमदानातून उभे राहिलेले हे कार्यालय केवळ एक इमारत नसून, कार्यकर्त्यांच्या जिद्दीचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी तरुण कार्यकर्त्यांना पक्षाच्या विचारसरणीशी निष्ठावान राहण्याचे आवाहन केले.

पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी आपल्या भाषणात सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “पक्षाचे काम केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून समाजातील वंचित, शोषित घटकांसाठी सातत्याने लढा देणे ही आमची भूमिका आहे. नव्या कार्यालयामुळे हा लढा अधिक संघटित आणि प्रभावी होईल.”वेळी आमदार विनोद निकोले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी डहाणू तालुक्यातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या समस्यांशी जोडलेले राहण्याची गरज अधोरेखित केली. “जनतेच्या प्रश्नांवर लढा देणे हेच खरे राजकारण आहे,” असे ते म्हणाले.कार्यक्रमात किरण गहला, रडका कलांगडा, चंद्रकांत घोरखाना, लहानी दौडा, लक्ष्मण डोंबरे, सुनिता शिंगडा आदी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनीही आपली मते मांडली. सर्वांनी एकमुखाने नव्या कार्यालयामुळे पक्षाच्या कामाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

या उद्घाटन सोहळ्याला डहाणू तालुक्यातील ३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. अनेक कार्यकर्त्यांनी कार्यालय उभारणीसाठी केलेल्या श्रमदानाचा अभिमान व्यक्त केला.हे कार्यालय उभारण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतः श्रमदान करून मोठे योगदान दिले आहे. आर्थिक अडचणी असूनही कार्यकर्त्यांनी एकत्र येत हे काम पूर्ण केले. त्यामुळे हे कार्यालय त्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक बनले आहे. यामुळे पक्षाच्या बैठका, संघटनात्मक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी एक हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.डहाणू तालुक्यातील पक्ष व जनसंघटनांसाठी स्वतंत्र कार्यालय नसल्यामुळे अनेक वर्षांपासून अडचणी निर्माण होत होत्या. बैठका घेण्यासाठी योग्य जागेचा अभाव जाणवत होता. मात्र, आता या नव्या कार्यालयामुळे त्या अडचणी दूर झाल्या असून, संघटनात्मक कामकाज अधिक सुसूत्रपणे पार पाडता येणार आहे.कार्यकर्त्यांमध्ये या नव्या कार्यालयामुळे उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात अधिक जोमाने काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. “हे कार्यालय आमच्यासाठी प्रेरणास्थान ठरेल,” अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.एकूणच, डहाणू तालुक्यात उभारण्यात आलेले हे नवे कार्यालय पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, ‘शिव विचार जागर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विचारप्रबोधनालाही चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : सोमवार दिनांक : ४ मे २०२६
