दिव्य भारत बीएसएम न्यूज : सोमवार : दिनांक : ४ मे २०२६
वेळीच सावध व्हा ! यंदा बदलत्या हवामानामुळे उन्हाचे चटके,दुष्काळाचे सावट व मान्सूनवर”एल निनो”चे संकट
नागपूर :- दिवसेंदिवस बदलत्या हवामानामुळे वातावरणात आमुलाग्र बदल होतांना दिसतो.यामुळे अती उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून पाण्याचा दुष्काळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.सध्याच्या परिस्थितीत राज्यासह देशातील अनेक भागात ४० ते ४६ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचले आहे, म्हणजे सर्वत्र तापमानाने ४० अंश सेल्सिअस तापमान पार केल्याचे स्पष्ट दिसून येते.काही भागात वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस पडत आहे.यामुळे संपूर्ण वातावरणात आमुलाग्र बदल झाल्याचे दिसून येते. राज्यासह देशातील ज्या शहराचे तापमान जास्तीत जास्त फक्त ४० अंश सेल्सिअस पर्यंत रहात होते त्या संपूर्ण शहरांनी तापमानाचा उच्चांक गाठून ४५ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पार केल्याचे दिसून येते.हा तापमान वाढीचा प्रकार अत्यंत धोकादायक स्थितीत आहे.त्यामुळे दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे मोठी बिकट आणि गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे.आज देशातील औद्योगिक, शहरीकरण,सिमेंट रोड, गाड्यांचा धुर,एसी, लोकांच्या वाढत्या सुखसुविधा यामुळे तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून याचा परिणाम आपणा सर्वांना भोगावा लागत आहे.अती उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून याचा परिणाम शेतीवर मोठ्या प्रमाणात पडत असुन यंदा दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांच्या डोक्यावर मंडरावतांना दिसत आहे.सोबतच राज्यात “एल निनो”मुळे भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.कारण प्रशांत महासागरामध्ये “एल निनो”ची स्थिती सक्रिय होत असल्याने मान्सूनच्या पावसावर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे.यामुळे मान्सूनच्या उत्तरार्धात म्हणजे जुलै ते सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण अधिक कमी राहू शकते.”एल निनो”मुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागात विशेषत: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात, नेहमीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.किनारी कोकण विभाग तसेच विदर्भातील काही भागात तुलनेने पावसाचे वितरण चांगले राहू शकते.परंतु सरासरीपेक्षा कमी पावसाचा धोका असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.यंदाची भीषण उष्णता ही वाढते औद्योगिकीकरण, कार्बन उत्सर्जन आणि बेसुमार जंगलतोडीचा परिणाम आहे.ही समस्या तात्पुरती नसून भविष्यात महाभयानक संकटाची नांदी आहे यावर वेळीच लगाम कसली नाही तर भयावह संकट निर्माण होऊ शकते.कारण सध्याच्या परिस्थितीत विदर्भातील मुख्य शहराचे तापमानाच्या बाबतीत विचार केला तर अकोला -४५, वर्धा -४५, नागपूर -४४.४, अमरावती -४४.२, गोंदिया -४४.५, यवतमाळ -४३.२, ब्रम्हपुरी -४३.२, गडचिरोली –४३.२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले आहेत.यामुळे विदर्भ जनूकाय आगीची भट्टी बनली की काय असे वाटत आहे.कारण आजच्या परिस्थितीत विदर्भ हे जगातील हॉट शहरांमध्ये गणल्या गेले आहे ही चिंताजनक बाब आहे.देशात बदलत्या हवामानामुळे काही भागात आगडोंब उसळला आहे,तर काही भागात गारपीट किंवा वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे हा सर्व प्रकार आणि येणारे “एल निनो”संकट मानवाच्या अतिरेकामुळे निर्माण झालेली गंभीर आणि धोकादायक परिस्थिती आहे.असे सांगितले जाते की १४० वर्षांनंतर हा “एल निनो” येत आहे ही महाभयंकर संकटांची नांदी आहे. पॅसिफीक महासागरात जेव्हा तापमान वाढते तेव्हा जगाचे हवामान चक्र बिघडते असे सांगितले जाते यालाच “एल निनो” म्हणतात.परंतु ही अत्यंत धोक्याची घंटा आहे.कारण “एल निनो”मुळे महासागराचे तापमान २ अंश सेल्सिअसने वाढल्याचे सांगितले जाते.महासागराचे तापमान वाढणे म्हणजे संपूर्ण सृष्टीला धोक्याचे संकेत आहे.कारण बदलत्या हवामानामुळे देशासह संपूर्ण जगात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून दिवसेंदिवस समुद्राचे पाणी वाढत आहे व जमीनीच्या पोटातील पाणी कमी-कमी होत आहे.हा सर्वप्रकार जंगलतोडीमुळे निर्माण झाला आहे.कारण शहरीकरण व आधुनिकीकरणामुळे जेवढेही पावसाचे पाणी पडते त्याच्या ८० टक्के पाणी समुद्राला जाऊन मिळते.कारण वाढत्या औद्योगिकरण व शहरीकरणामुळे जमीनीत पाणी जाण्याचे मार्ग ८० टक्के मार्ग बंद झाले आहे.त्यामुळे पाणी जमिनीच्या मुळाशी जातच नाही.याचा परिणाम म्हणजे तापमानात वाढ व भीषण पाणी टंचाई दिसून येते.राज्यांच्या विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगितले जाते आणि आता “एल निनो”च्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी होण्याची चिन्हे आहेत.यावर सरकारने उपाययोजना करण्याची सुरुवात केली आहे.परंतु या संपूर्ण परिस्थितीला सर्वात जास्त औद्योगिकरण, शहरीकरण व जंगलतोड जबाबदार आहे.जोपर्यंत राज्यासह देशात विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड थांबणार नाही आणि मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होणार नाही तोपर्यंत आपण या भयावह घटनांवर मात करू शकणार नाही.त्यामुळे राज्यासह देशातील वाढते तापमान पहाता व वेळोवेळी बदलते हवामान पहाता वृक्षलागवड युद्धपातळीवर होणे आवश्यक आहे.मुख्यत्वेकरून राज्य सरकार, सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यारये यांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण केले पाहिजे.आजही राज्यासह देशातील अति दुर्गम भागात पिण्याच्या पाण्यासह अनेक गंभीर समस्या आहेत.यामुळे या भागात आपल्याला कुपोषण,भुकमरी असे भयावह चित्र दिसून येते.त्यामुळे पावसाचे पाणी रोखायचे असेल वृक्षलागवड करणे गरजेचे आहे अन्यथा शेतकऱ्यांचे हाल बेहाल होतील व याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागेल.जय हिंद.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
( स्वतंत्र पत्रकार )
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
दिव्य भारत बीएसएम न्यूज : सोमवार : दिनांक : ४ मे २०२६
