दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार , दि. १९ मे २०२६

पालघर, (प्रतिनिधी: बाळकृष्ण धोके ):- पालघर जिल्ह्यातील धानीवरी परिसरात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला असून या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या आदिवासी बांधवांच्या कुटुंबांचे पालकत्व आदिवासी विकास विभाग स्वीकारणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्व नागरिकांच्या उपचाराचा शंभर टक्के खर्च राज्य शासनाकडून करण्यात येणाअसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

धानीवरी परिसरात झालेल्या या दुर्दैवी अपघातात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. बापूगाव आणि लाखातपाडा येथील आदिवासी कुटुंबीय साक्षगंध (साखरपुडा) कार्यक्रमासाठी आयशर टेम्पोमधून प्रवास करत असताना हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.माहितीनुसार, मृतांमध्ये बापूगाव व लाखातपाडा येथील १२ जणांचा तसेच वांगर्जे येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. मृतांपैकी १२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो १ पालघर

अंत्यसंस्काराच्या वेळी मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्यासह डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, विनोद निकोले, हरिश्चंद्र भोये, विलास तरे, जिल्हाधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करत शोकाकुल कुटुंबीयांना धीर दिला.या दुर्घटनेत जखमी झालेल्या १७ जणांवर सध्या वेदांत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली असून आवश्यक औषधे, शस्त्रक्रिया आणि इतर सर्व उपचारांचा खर्च शासनाकडून केला जाणार असल्याची माहिती मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. कोणत्याही रुग्णाच्या उपचारात आर्थिक अडचण येऊ दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या घटनेची दखल घेत प्रशासनाला आवश्यक मदत व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी बाधित कुटुंबांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले की, दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या समस्या आणि गरजांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांना आवश्यक असलेली आर्थिक, सामाजिक आणि शासकीय मदत पुरविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शासन कोणत्याही कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“ही घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा आघात विसरणे कठीण असले तरी शासन या सर्व कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील,” असे भावनिक उद्गार मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी काढले.दरम्यान, या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागाने तातडीने बचावकार्य हाती घेतले. ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणावर मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यास सहकार्य केले. प्रशासनाकडून दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात येत असून विविध सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या मदतीसोबतच समाजातील विविध घटकांकडूनही सहकार्य मिळत असल्याने बाधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे.धानीवरी दुर्घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. लग्नसमारंभ, साखरपुडा किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने नागरिक एकाच वाहनातून प्रवास करत असल्याने अशा दुर्घटनांचा धोका वाढत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात असून जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे.

फोटो १ पालघर

दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार , दि. १९ मे २०२६