गोमघरजवळ भीषण अपघात : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर
बालवयीन वाहनचालकांवर नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; खोडाळा परिसरात शववाहिनीचीही तीव्र गरज
दिव्य भारत बीएसएम न्यूज
मोखाडा | प्रतिनिधी : अशोक मालक

मोखाडा तालुक्यातील गोमघर नजीक गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दोन भरधाव मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाढत्या बेदरकार वाहनचालकांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
खोडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील विहीगाव येथील लक्ष्मण अशोक गांगड (वय २८), दिलीप गांगड (वय २९) आणि देवीदास कृष्णा गांगड (वय ३०) हे तिघेजण एमएच ०४ एलयू ८२८६ क्रमांकाच्या युनिकॉन मोटारसायकलवरून गोमघर मार्गे वाड्याकडे जात होते. दरम्यान, गोमघर परिसरातील बोट्याचीवाडी येथील अनिल यशवंत सवरा हा आपल्या वडिलांना घेण्यासाठी एमएच १५ एफवाय ९३२७ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून खोडाळ्याकडे येत होता.
सकाळी साडेअकराच्या सुमारास गोमघरच्या सपाटीवर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनांचा वेग अधिक असल्याने धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांवरील पाचही जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना उपचारासाठी हलविले.मात्र या दुर्घटनेत लक्ष्मण अशोक गांगड (रा. विहीगाव) आणि अनिल यशवंत सवरा (रा. बोट्याचीवाडी) यांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तिघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. खोडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
बेदरकार वाहनचालकांमुळे वाढते अपघात:
मोखाडा आणि खोडाळा परिसरात अल्पवयीन तसेच बालवयीन मुलांकडून दुचाकी चालविण्याचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब पुन्हा या अपघाताच्या निमित्ताने समोर आली आहे. बाजारपेठेत अनेक व्यापाऱ्यांची लहान मुले बिनधास्त दुचाकी चालविताना दिसून येतात. काही पालक स्वतःच आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहनांची चावी देत असल्याने संभाव्य अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.वाहन चालविताना वेगावर नियंत्रण नसणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे आणि सुरक्षिततेबाबतची उदासीनता यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचे जाणकार सांगतात. पोलिस प्रशासनाने याबाबत कठोर मोहीम राबवून अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्याची तसेच पालकांचे समुपदेशन करण्याची गरज व्यक्त होत आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, “पालकांनीच आपल्या मुलांच्या हट्टाला खतपाणी घालणे थांबविले नाही, तर भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकतात.” त्यामुळे मोखाडा पोलिसांसमोर बालवयीन वाहनचालकांना आळा घालण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात शववाहिनीची कमतरता
या अपघातानंतर खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील मूलभूत सुविधांचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र विस्तीर्ण असून या भागात अनेकदा अपघात व आकस्मिक घटना घडतात. मात्र केंद्राकडे स्वतःची शववाहिनी नसल्याने मृतदेह हलविताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणणे किंवा पुढे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविणे हे अत्यंत जिकिरीचे ठरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे स्थानिक आमदार आणि खासदारांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला शववाहिनी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांमध्ये हळहळ
या भीषण अपघातामुळे गोमघर, खोडाळा आणि विहीगाव परिसरात शोककळा पसरली आहे. दोन तरुणांचा अकाली मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून जखमींवर योग्य उपचार व्हावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे.दरम्यान, वाढते अपघात, बेदरकार वाहनचालक आणि अल्पवयीन मुलांच्या वाहन वापराचा प्रश्न गांभीर्याने घेऊन प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
दिव्य भारत बीएसएम न्यूज

