पाणी उपलब्ध, पण वीज गायब; ‘सांगा साहेब, बागायती शेती करायची कशी?’

तिरकसवाडीत अडीच महिन्यांपासून डीपी नादुरुस्त; पिके करपण्याच्या मार्गावर, शेतकऱ्यांचा संताप

whatsapp image 2026 06 02 at 6.50.00 pm

दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार, दिनांक :२ जुन २०२६

मुदखेड, (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड):
मुदखेड तालुक्यातील तिरकसवाडी शिवारातील शेतकऱ्यांवर सध्या मोठे कृषी संकट ओढवले आहे. परिसरातील शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी खांडरे डीपी (विद्युत रोहित्र) गेल्या तब्बल अडीच महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने बागायती शेती पूर्णपणे अडचणीत आली आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत पिकांना वेळेवर पाणी देणे अत्यावश्यक असताना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विहिरी आणि बोअरवेलवरील मोटारी बंद पडल्या आहेत. परिणामी, पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.तिरकसवाडी परिसरात केळी, ऊस, भाजीपाला, डाळिंब, आंबा तसेच विविध फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या पिकांना नियमित सिंचनाची आवश्यकता असते. मात्र डीपी बंद असल्याने शेतीपंप ठप्प झाले असून अनेक पिके करपण्याच्या मार्गावर आली आहेत. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिके वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित कार्यालयात अनेक वेळा भेट देऊन डीपी दुरुस्तीची मागणी केली. तसेच निवेदने देऊन आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधूनही पाठपुरावा केला. मात्र याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलले जात नाहीत. काही वेळा कार्यालयात गेल्यानंतरही केवळ टाळाटाळ केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक शेतकऱ्यांना टँकर किंवा पर्यायी साधनांचा वापर करून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे, ज्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

वीजपुरवठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात असून, काही ठिकाणी पिके वाळू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे आगामी हंगामातील उत्पन्नावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी महावितरण प्रशासनाने तातडीने नवीन डीपी बसवून अथवा विद्यमान डीपीची दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, समस्येकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी आणि ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात, अन्यथा आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.


“गेल्या अडीच महिन्यांपासून डीपी बंद आहे. अनेकदा महावितरण कार्यालयात जाऊन पाठपुरावा केला, निवेदने दिली; मात्र कोणतीही दखल घेतली जात नाही. पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी.”
— बापुराव कानकाटे, शेतकरी, तिरकसवाडी