“आमच्यासारखे वागू नका” फलकांसह गाढवांचा तहसीलवर मोर्चा
शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा एल्गार; सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार निदर्शने

मुदखेड, प्रतिनिधी :: साहेबराव गागलवाड ):-
मुदखेड तालुक्यातील शेतकरी विविध समस्यांनी ग्रासले असताना त्यांच्या प्रश्नांकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी तहसील कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेकडो शेतकरी, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी डिझेल टंचाई, खत व बियाण्यांचा तुटवडा, युरिया खताच्या सक्तीच्या लिंकिंगची अट, पीक विमा मंजुरीतील विलंब, पीक कर्ज वितरणातील अडचणी तसेच वाढत्या महागाईविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून या प्रश्नांबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले.
या मोर्चाचे प्रमुख आकर्षण ठरले ते आंदोलनात आणण्यात आलेली गाढवे. गाढवांच्या अंगावर आणि गळ्यात “आमच्यासारखे वागू नका” असे फलक लावण्यात आले होते. या अनोख्या आंदोलनातून सरकार आणि प्रशासनाच्या शेतकऱ्यांबाबतच्या असंवेदनशील भूमिकेवर प्रतीकात्मक स्वरूपात टीका करण्यात आली. शेतकऱ्यांशी होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी हा अभिनव मार्ग अवलंबल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी “डिझेल टंचाई हटवा”, “खत लिंकिंग बंद करा”, “पीक विमा मंजूर करा”, “शेतकऱ्यांना न्याय द्या”, “शेतकरी विरोधी धोरणे रद्द करा” अशा जोरदार घोषणा दिल्या. तहसील कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी आयोजित सभेत बोलताना जिल्ह्याचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. शेतकरी हा देशाचा कणा असूनही त्याच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ते म्हणाले. खत, बियाणे, डिझेल आणि पीक विमा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर शासनाने प्रभावी उपाययोजना करण्यात अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी संकटात असताना सरकार केवळ आश्वासनांची खैरात करत असल्याची टीकाही त्यांनी केली.उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, कार्याध्यक्ष तिरुपती कोंढेकर आणि शेतकरी नेते भगवान पाटील मनुरकर यांनीही शेतकऱ्यांच्या समस्या मांडताना प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याची गरज व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.बालाजी गाडे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मुदखेड तालुक्यातील शेतकरी अनेक समस्यांशी झुंज देत आहेत. डिझेल उपलब्ध नसल्याने मशागतीची कामे प्रभावित झाली आहेत. अनेक ठिकाणी खतांचा तुटवडा निर्माण झाला असून युरिया खत खरेदी करताना सक्तीच्या लिंकिंगमुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. त्याचबरोबर पीक विमा मंजुरीसाठी शेतकऱ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या सर्व प्रश्नांवर प्रशासन आणि सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोर्चात माजी नगरसेवक गोविंद गोपणपल्ले, माजी नगरसेवक गंगाधर डांगे, करीम खान साब, नगरसेवक तथा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, अविनाश चौदंते, खदिर भाई, संजय बोकेफोड, जिल्हा सरचिटणीस गिरीश कोत्तावार, सूर्यकांत चौदंते, सुभाष चौदंते, वेदांत शेवटे, शेख गौस भाई फुलवाले, खदिर कुरेशी, मोईन भाई फुलवाले, श्याम शिंदे, केशव शिंदे, विश्वनाथ पवार, शिवाजी वडजे, माणिक मुंगल, संभाजी गाडे, गणेश ढगे, यदुराज गाडे, विठ्ठल आचार्य, संभाजी पवार, प्रशांत मुंगल, नागोराव भांगे, हनुमान लखे, माधव अक्कमवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनामध्ये डिझेल टंचाई तातडीने दूर करणे, खत व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे, युरिया खतावरील सक्तीचे लिंकिंग बंद करणे, प्रलंबित पीक विमा मंजूर करणे, पीक कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ करणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना त्वरित राबविण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, प्रशासनाने शेतकरी प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा बालाजी गाडे पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरूच राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
आंदोलनातील अनोखा संदेश :
“आमच्यासारखे वागू नका” असे फलक गाढवांवर लावून करण्यात आलेले आंदोलन हे मोर्चाचे मुख्य आकर्षण ठरले. शेतकऱ्यांशी होत असलेल्या दुर्लक्षाचा आणि प्रशासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा प्रतीकात्मक संदेश देण्यात आला. या अनोख्या आंदोलनाची तालुकाभर चर्चा रंगली.

