दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार ,दिनांक : ९ जून २०२६

सुरगाणा तालुका २४ तासांहून अधिक काळ अंधारात; वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत
वन्यजीवांची दहशत, पाण्याचे संकट तीव्र; मोबाईल चार्जिंगसाठी गुजरातची वाट, नागरिकांचा शासनाला आर्त हाक
सुरगाणा दि. ७ जून (प्रतिनिधी : रतन चौधरी) – नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल व दुर्गम सुरगणा तालुक्यात गेल्या चोवीस तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण तालुका अक्षरशः अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. अचानक खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाला असून पाणीटंचाई, वन्यजीवांची वाढती दहशत, मोबाईल संपर्क व्यवस्था कोलमडणे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी अशा अनेक समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत.दोन दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. विशेषतः जंगलव्याप्त आणि डोंगराळ भागातील आदिवासी बांधवांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक ठरत आहे. वीज नसल्यामुळे रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पूर्ण अंधार पसरला असून विंचू, साप आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरण्याची वेळ आली आहे.

पाण्याचे गंभीर संकट
सुरगाणा तालुक्यात आधीच पाण्याची टंचाई जाणवत असून बोअरवेल आणि विहिरींनी तळ गाठला आहे. वीज नसल्यामुळे मोटारी बंद पडल्या असून थोड्याफार प्रमाणात उपलब्ध असलेले पाणीही नागरिकांना मिळेनासे झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत असून जंगलातील नैसर्गिक पाणवठ्यांवरही मानवी गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, वन्यजीव आणि माणूस यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी आणि ग्रामस्थ एकाच ठिकाणी पोहोचत असल्याने अपघात किंवा हल्ल्याचा धोका वाढला आहे.
वन्यजीवांचा मानवी वस्तीकडे वाढता कल
दिंडोरी, कळवण आणि सुरगाणा परिसरातील डोंगररांगांमध्ये गेल्या काही महिन्यांत लागलेल्या वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जंगल जळून खाक झाले आहे. त्यामुळे बिबट्यासह अनेक वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले असून हे प्राणी आता मानवी वस्तीकडे वळत आहेत. अंधारामुळे त्यांचा वावर अधिक धोकादायक ठरत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेषतः रात्रीच्या वेळी महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. अनेक गावांमध्ये नागरिक टॉर्च किंवा मोबाईलच्या प्रकाशाच्या सहाय्याने हालचाल करत आहेत.

मोबाईल सेवा ठप्प; गुजरातमध्ये चार्जिंगसाठी धाव
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोबाईल टॉवर्सची सेवाही प्रभावित झाली आहे. अनेक मोबाईल नेटवर्क पूर्णपणे बंद पडले असून “नॉट रिचेबल” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संपर्क साधणेही कठीण झाले आहे.सुरगाणा तालुक्याचा काही भाग गुजरात राज्याच्या सीमेलगत असल्याने अनेक नागरिक मोबाईल चार्जिंगसाठी सीमावर्ती गुजरातमधील गावांकडे धाव घेत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात केवळ मोबाईल चार्ज करण्यासाठी दुसऱ्या राज्यात जावे लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम
सध्या शाळा प्रवेश प्रक्रियेचा कालावधी सुरू असून विविध शासकीय दाखले ऑनलाइन पद्धतीने काढावे लागतात. मात्र वीज नसल्याने इंटरनेट सेवा आणि सायबर कॅफे बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.अनेक पालकांना दूरवरच्या गावात जाऊन ऑनलाइन कामे पूर्ण करावी लागत असल्याने अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शैक्षणिक प्रक्रियेवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त
वीज नसल्यामुळे किराणा दुकाने, औषध दुकाने आणि लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. थंड पाण्याच्या बाटल्या, दुग्धजन्य पदार्थ आणि औषधांचे योग्य तापमान राखणे कठीण झाले आहे. अनेक व्यापाऱ्यांना जनरेटरच्या सहाय्याने व्यवसाय सुरू ठेवावा लागत असून त्याचा अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.वीजेअभावी गिरण्या बंद असल्याने दळणाचीही समस्या निर्माण झाली आहे. अनेक कुटुंबांना चपाती किंवा भाकरीऐवजी केवळ भातावर दिवस काढावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
माजी सैनिक चौधरी यांची संतप्त प्रतिक्रिया
सीमावर्ती भागातील माजी सैनिक चौधरी यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “आमचे गाव गुजरात सीमेवर असून तेथील दिवे स्पष्ट दिसत आहेत, मात्र आमचा परिसर चोवीस तासांहून अधिक काळ अंधारात आहे. वीज नसल्यामुळे गिरण्या बंद आहेत, पाणी मिळत नाही आणि मोबाईलही बंद पडले आहेत. पंचाहत्तरी ओलांडलेल्या वयात दूरवरून पाणी आणण्याची वेळ आमच्यावर आली आहे.”ते पुढे म्हणाले, “आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आपण जगाशी स्पर्धा करत असल्याचा दावा करतो; परंतु एका दुर्गम तालुक्याचा वीजपुरवठा चोवीस तासांपेक्षा अधिक काळ सुरळीत करता येत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी वीजवाहिन्यांची नियमित देखभाल झाली असती, तर ही परिस्थिती उद्भवली नसती.”
तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी

वीज वितरण विभागाने तात्काळ युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेऊन सुरगणा तालुक्याचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. पाणी, आरोग्य, शिक्षण आणि संपर्क व्यवस्था या मूलभूत गरजा वीजेशी निगडित असल्याने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.”मायबाप सरकार, आम्हीही माणसे आहोत; आम्हालाही माणूस म्हणून जगू द्या,” अशी आर्त हाक सुरगणा तालुक्यातील नागरिक शासनाला देत आहेत. आता प्रशासन किती वेगाने प्रतिसाद देते आणि अंधाराचे हे जाळे कधी दूर होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार ,दिनांक : ९ जून २०२६
