दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार , दिनांक : १० जून २०२६
येडशी व शिराढोणच्या पाणीपुरवठा योजनांना तातडीने मंजुरी द्या; आमदार कैलास पाटील यांचे पाणीपुरवठा मंत्र्यांना निवेदन

येडशी, दि. ९ जून (प्रतिनिधी : सुभान शेख ) – धाराशिव तालुक्यातील येडशी आणि कळंब तालुक्यातील शिराढोण या गावांतील प्रलंबित नळपाणी पुरवठा योजनांना तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन कामे सुरू करण्यात यावीत, अशी मागणी धाराशिव-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास (दादा) घाडगे-पाटील यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.मुंबई येथे झालेल्या भेटीत आमदार कैलास पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या येडशी आणि शिराढोण गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा मुद्दा उपस्थित केला. या वेळी येडशीचे माजी उपसरपंच व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा नेते गजानन भैय्या नलावडे यांचीही उपस्थिती होती.
येडशी हे धाराशिव तालुक्यातील महत्त्वाचे व झपाट्याने विकसित होणारे गाव असून येथील लोकसंख्या सुमारे २५ ते ३० हजारांच्या दरम्यान आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून गावातील नागरिकांना शुद्ध व नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उपलब्ध होत नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होत असून नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.जलजीवन मिशन अंतर्गत येडशी गावासाठी १२ कोटी ७८ लाख १० हजार रुपये (१२.७८१ कोटी) तर शिराढोण गावासाठी १५ कोटी २२ लाख ८० हजार रुपये (१५.२२८ कोटी) असा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या दोन्ही योजनांसाठी एकूण २८ कोटी ९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असला तरी अद्याप प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊ शकलेली नाही.
आमदार कैलास पाटील यांनी निवेदनात नमूद केले की, जलजीवन मिशनच्या नियमानुसार तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून कामे तातडीने सुरू करणे आवश्यक असते. मात्र, विविध कारणांमुळे या योजना अद्याप कागदोपत्रीच राहिल्या आहेत. परिणामी, येडशी आणि शिराढोण या दोन्ही गावांतील हजारो नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.दोन्ही गावांची लोकसंख्या सातत्याने वाढत असून भविष्यातील पाणी गरजाही वाढणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि जीवनमानाचा विचार करून या योजनांना तातडीने प्रशासकीय मंजुरी देणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामे त्वरित सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विषयाचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या योजनांना लवकर मंजुरी मिळाल्यास येडशी आणि शिराढोण परिसरातील हजारो नागरिकांच्या दीर्घकालीन पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे.या प्रसंगी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार कैलास (दादा) घाडगे-पाटील, येडशीचे माजी उपसरपंच गजानन भैय्या नलावडे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.स्थानिक नागरिकांनीही या दोन्ही योजनांना तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन कामे सुरू करण्याची मागणी केली असून, जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावांना शाश्वत आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार , दिनांक : १० जून २०२६
