दिव्य भारत बीएसएम न्यूज :सोमवार : 29 जून 2026
ऑलिंपिक सप्ताहानिमित्त जिल्हा तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न; विरल, प्रणव, प्रणील तर अदिती, अनन्या आणि महिन शेख ठरले विजेते
नाशिक | (प्रतिनिधी : खास ):-

ऑलिंपिक दिन आणि ऑलिंपिक सप्ताहाचे औचित्य साधत नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धांना खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कालिका देवी मंदिर संस्थान, यशवंत व्यायाम शाळा, क्रीडा संस्कृती फाउंडेशन आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील उदयोन्मुख तलवारबाजांनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले. मुलांच्या गटात विरल म्हस्के, प्रणव डेरले आणि प्रणील परदेशी, तर मुलींच्या गटात अदिती पाटील, अनन्या सुळे आणि महिन शेख यांनी आपल्या-आपल्या प्रकारात विजेतेपद पटकावत विशेष लक्ष वेधून घेतले. २३ ते ३० जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ऑलिंपिक सप्ताहातील विविध क्रीडा उपक्रमांपैकी २८ आणि २९ जून रोजी कालिका देवी मंदिर संस्थानच्या सभागृहात जिल्हा तलवारबाजी स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय तलवारबाज आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कु. शरयू पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र थ्रोबॉल संघटनेचे सरचिटणीस राहुल वाघमारे उपस्थित होते.यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी राज्य संघटनेचे सहसचिव अविनाश दुधाने, छत्रपती पुरस्कार विजेते राजू शिंदे, स्पर्धा समन्वयक अविनाश ढोली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू शिंदे यांनी केले.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी अशी स्पर्धा महत्त्वाची
उद्घाटनप्रसंगी बोलताना शरयू पाटील यांनी युवा खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमधूनच खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयार होतात. सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि कठोर मेहनतीच्या जोरावर मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित खेळाडूंना केले.त्यांनी पुढे सांगितले की, तलवारबाजी हा वेग, अचूकता, मानसिक एकाग्रता आणि आत्मविश्वास यांचा खेळ असून, अशा स्पर्धांमुळे खेळाडूंमध्ये स्पर्धात्मक वृत्ती आणि आत्मविश्वास वाढीस लागतो.

मुलांच्या गटात दमदार कामगिरी
मुलांच्या ईपी (Épée) प्रकारात विरल म्हस्के यांनी उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. आदित्य बनकर यांनी द्वितीय, तर अर्णव बनकर आणि विराज गोसावी यांनी संयुक्त तृतीय क्रमांक मिळविला.फॉइल प्रकारात प्रणव डेरले विजेता ठरला. चिरायू पाटील याने द्वितीय क्रमांक मिळविला, तर रियांश कराड आणि साहिल कांदळकर यांनी तृतीय स्थान मिळविले.सॅबर प्रकारात प्रणील परदेशी याने विजेतेपद पटकावले. आदित्य पाटील द्वितीय, तर संकेत पाटील आणि कार्तिक वराडे यांनी संयुक्त तृतीय क्रमांक मिळविला.
मुलींच्या गटातही रंगली चुरशीची लढत
मुलींच्या ईपी प्रकारात अदिती पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. गौरी हेकरे द्वितीय, तर अनन्या फडोळ आणि शिवांस्का पाटील यांनी तृतीय स्थान मिळविले.फॉइल प्रकारात अनन्या सुळे विजेती ठरली. अनन्या पाटील हिने द्वितीय क्रमांक मिळविला, तर इरा परदेशी आणि सानवी दुशिंग यांनी संयुक्त तृतीय स्थान पटकावले.सॅबर प्रकारात महिन शेख हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. तनिष्का कुशारे द्वितीय, तर रिया दशपुते आणि संचिता सुराणा यांनी तृतीय स्थान मिळविले.
यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवकांचे योगदान
स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी छत्रपती पुरस्कार विजेते राजू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद परदेशी, राहुल फडोळ तसेच सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे नियोजन, पंचांचे समन्वय, खेळाडूंची व्यवस्था आणि तांत्रिक बाबी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण स्पर्धा सुरळीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
उद्या पारितोषिक वितरण समारंभ

ऑलिंपिक सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व क्रीडा स्पर्धांचा संयुक्त पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, ३० जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.या समारंभाला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार मनोज कोटक, सरचिटणीस संजय शेटे, कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती स्पर्धा समन्वयक अविनाश ढोली यांनी दिली.
जिल्ह्यातील तलवारबाजीला नवी ऊर्जा
ऑलिंपिक सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील युवा तलवारबाजांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळाले. स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, वेगवान प्रतिक्रिया आणि खेळाडूवृत्तीचे दर्शन घडविले. भविष्यात याच खेळाडूंपैकी अनेक जण राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकचे तसेच महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.अशा स्पर्धांमुळे केवळ पदके मिळत नाहीत, तर खेळाडूंमध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्याची प्रेरणा निर्माण होते. त्यामुळे ऑलिंपिक सप्ताहाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला अधिक बळ देणारा ठरला आहे.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे :
ईपी मुले – प्रथम- विराल म्हस्के, द्वितीय- आदित्य बनकर, तृतीय- अर्णव बनकर आणि विराज गोसावी.
फॉइल मुले – प्रथम- प्रणव डेरले, द्वितीय- चिरायू पाटील, तृतीय- रियांश कराड आणि साहिल कांदळकर
स्टॅबर मुले – प्रथम- प्रणील परदेशी, द्वितीय- आदित्य पाटील, तृतीय- संकेत पाटील आणि कार्तिक वराडे.
मुली:
ईपी – १) अदिती पाटील, २)गौरी हेकरे, ३) अनंन्या फडोळ आणि शिवांस्का पाटील.
फॉइल : १) अनन्या सुळे, २) अनन्या पाटील ३) इरा परदेशी आणि सानवी दुशिंग.
सॅबर : १) महिन शेख, २) तनिष्का कुशारे, ३) रिया दशपुते आणि संचिता सुराणा.

