मोबाईल ईव्हीएमद्वारे लोकशाहीचा अनोखा धडा; छत्रपती शाहू विद्यानिकेतन, आयरे येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न
दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार दिनांक : 14 जुलै 2026
जव्हार | (प्रतिनिधी : अशोक मालक ):-

राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन संस्था, जव्हार संचलित छत्रपती शाहू विद्यानिकेतन, आयरे (ता. जव्हार, जि. पालघर) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक अत्यंत उत्साहपूर्ण आणि लोकशाही पद्धतीने पार पडली. विशेष म्हणजे, ही निवडणूक मोबाईल ईव्हीएम (Electronic Voting Machine) ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव मिळाला. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे रुजविण्यात यश आले.संस्थेचे संस्थापक आदरणीय शिवश्री सुनिलजी पाटील तसेच संस्था अध्यक्षा आदरणीय सौ. जयश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर, लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास आणि नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने शाळेने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सार्वत्रिक निवडणुकांच्या धर्तीवर आखली होती.निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज भरणे, अर्जांची छाननी, उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणे, प्रचार, आचारसंहितेचे पालन, शांतता कालावधी आणि मोबाईल ईव्हीएमद्वारे मतदान अशा सर्व टप्प्यांचे काटेकोर नियोजन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची प्रत्येक पायरी प्रत्यक्ष अनुभवता आली.
दि. १० जुलै २०२६ रोजी निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कु. शुभम संतोष धिंडा, कु. तेजस शिरीष शनवार, कु. ऋतिक दिलेश खरपडे, कु. पंकज विनायक राबडे, कु. यश संजय पागी, कु. शंकर राजेश फडवळ, कु. रूपिका रमेश फरळे, कु. जितेंद्र रमेश रंधा, कु. वेदिका सतीश राबडे आणि कु. जागृती रामचंद्र धिंडा या दहा विद्यार्थ्यांचा समावेश होता.यानंतर दि. ११ जुलै २०२६ रोजी सर्व उमेदवारांनी विद्यार्थ्यांसमोर आपले विचार, शाळेच्या विकासासाठीचे संकल्प, विद्यार्थीहिताच्या योजना आणि नेतृत्वाबाबतची भूमिका मांडली. प्रचार सभांमध्ये उमेदवारांनी शिस्त, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, क्रीडा, वाचन संस्कृती, शालेय उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत आश्वासने दिली. प्रचारानंतर निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात आले आणि शांतता कालावधी जाहीर करण्यात आला.
दि. १३ जुलै २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया मोबाईल ईव्हीएम ॲप्लिकेशनद्वारे पार पडली. सकाळपासूनच शाळेचे वातावरण निवडणूकमय झाले होते. मतदान केंद्राची मांडणी, मतदार यादी, ओळख पडताळणी, मतदान कक्ष आणि मतदानानंतरची प्रक्रिया यांचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक मा. श्री. पी. एम. रुकारी यांनी जबाबदारी पार पाडली. निवडणूक प्रशिक्षण अधिकारी श्री. जी. एन. हाके, नोडल अधिकारी श्री. जी. ए. कोर, झोनल अधिकारी श्री. आर. के. चव्हाण तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती जे. एस. अहिरे यांनी केले. सर्व शिक्षकांनी समन्वय राखत निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. इयत्ता दहावीचा विद्यार्थी कुमार तेजस शिरीष शनवार याने एकूण ७८ पैकी ३६ मते मिळवत शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्रीपदावर विजय मिळविला. तर इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी वेदिका सतीश राबडे हिने २४ मते मिळवत उपमुख्यमंत्रीपद पटकावले. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. विजेत्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.या अभिनव उपक्रमामध्ये विविध जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनाच देण्यात आल्या होत्या. केंद्राध्यक्ष म्हणून कु. पायल शंकर धिंडा, मतदान अधिकारी केतन प्रवीण गहला, कु. चंद्रशेखर परशुराम धिंडा, सुरेखा कल्पेश जोगारी, शिपाई नकुल चौधरी, सुरक्षारक्षक कु. शंकर संतोष वळवी, बीएलओ कु. पृथ्वीराज सुरेश जोगारी तसेच मतदान प्रतिनिधी कु. उमेश देवराम नडगे यांनी आपापल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक यंत्रणेतील विविध पदांची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे छायाचित्रण व चित्रीकरण श्री. प्रवीण खोडे, श्री. पांडुरंग पगार आणि श्री. यज्ञेश्वर अहिरे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक मा. श्री. पी. एम. रुकारी, श्रीमती जे. एस. अहिरे, श्री. जी. ए. कोर, श्री. जी. एन. हाके, श्री. आर. के. चव्हाण, श्री. पी. एम. खोडे, श्री. पी. एस. पगार, श्री. वाय. एम. अहिरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.आजच्या डिजिटल युगात शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असावे, या विचाराला साजेसा हा उपक्रम ठरला. मोबाईल ईव्हीएमच्या माध्यमातून पार पडलेल्या या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील नागरिकांची भूमिका, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जबाबदार नेतृत्वाची जाणीव प्रभावीपणे झाली. भविष्यात सजग, जबाबदार आणि लोकशाही मूल्यांचा आदर करणारे नागरिक घडविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार दिनांक : 14 जुलै 2026
