दिव्य भारत बीएसएम न्यूज : रविवार दिनांक : 9 ऑगस्ट 2026

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम उत्साहात साजरा
‘ध्येय, कौशल्य आणि आत्मविश्वास’चा मंत्र; त्र्यंबकेश्वर महाविद्यालयातील इंडक्शन प्रोग्राम उत्साहात संपन्न

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील नवागत विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय इंडक्शन प्रोग्राम अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. ६ व ७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख करून देणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020), विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी कल्याण योजना, करिअरच्या संधी आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत सविस्तर मार्गदर्शन करणे हा होता.

whatsapp image 2026 08 09 at 3.43.22 pm

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घुले उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून जीवन घडविण्याची प्रक्रिया असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या मनावर नियंत्रण ठेवून निश्चित ध्येय निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य डॉ. सोमनाथ घुले म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने ज्या संस्थेत शिक्षण घेत आहे त्या संस्थेचा इतिहास, संस्थापक कर्मवीरांचे कार्य, समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि महाविद्यालयाची गौरवशाली परंपरा जाणून घेतली पाहिजे. अशा परंपरेचा अभिमान बाळगून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात आणि व्यक्तिमत्त्वात सातत्याने भर घालावी. नाविन्यपूर्ण कौशल्ये आत्मसात करून आत्मविश्वासाने पुढे जाणे हीच आजच्या स्पर्धात्मक युगाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

whatsapp image 2026 08 09 at 11.40.45 am (1)

कला विभागाचे इंडक्शन प्रोग्राम समन्वयक प्रा. डॉ. प्रशांत रणसुरे यांनी नव्या शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे आणि त्यामधील विद्यार्थीकेंद्रित शिक्षण प्रणाली याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरता अभ्यास न करता कौशल्याधारित शिक्षण, संशोधनाची वृत्ती आणि नाविन्यपूर्ण विचार विकसित करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर प्रा. डॉ. प्रशांत रणसुरे यांनी इंडियन नॉलेज सिस्टिम (Indian Knowledge System), करिअर कट्टा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांची माहिती दिली. डिजिटल युगात यशस्वी व्हायचे असेल तर इतरांशी नव्हे तर स्वतःशी स्पर्धा करण्याची मानसिकता विकसित करावी. नियमित वाचन, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि वेळेचे प्रभावी नियोजन यामुळे यश निश्चित मिळते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

untitled design


महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रो. डॉ. भागवत महाले यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक मंडळ क्षेत्रातील विविध संधींची माहिती दिली. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही सुप्त कला दडलेली असते. गायन, नृत्य, नाट्य, वक्तृत्व, लेखन, चित्रकला, लोककला, वाद्यसंगीत अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा विकसित करावी. महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध स्पर्धा, कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

वाणिज्य विभागाच्या विभागप्रमुख डॉ. शाश्वती निरभवणे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-2020) विषयी सविस्तर माहिती दिली. नव्या अभ्यासक्रमाची रचना, मल्टिडिसिप्लिनरी शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, बहुविध करिअर संधी आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांची त्यांनी सखोल माहिती दिली. बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेशी जुळवून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.डॉ. मनोहर जोपळे यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या ‘कमवा व शिका’ योजनेची माहिती देत आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. यासोबतच विद्यार्थी कल्याण मंडळ, निर्भय कन्या अभियान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रो. डॉ. दिनेश उकिर्डे यांनी ग्रामीण भागातील पारंपरिक खेळांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांपर्यंत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींचा आढावा घेतला. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यास शिष्यवृत्ती, शासकीय नोकरीतील आरक्षण, क्रीडा गुण आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक फायदे मिळतात, असे त्यांनी स्पष्ट केले. नियमित व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडावृत्ती ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. वर्षा जुन्नरे यांनी ग्रंथालयातील सुविधा विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. विविध विषयांवरील संदर्भग्रंथ, साहित्य, कथा-कादंबऱ्या, नियतकालिके, मासिके, संशोधनपर पुस्तके आणि वर्तमानपत्रांचा विद्यार्थ्यांनी नियमित वापर करून वाचन संस्कृती जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. चांगले वाचन हे व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्यास आणि ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.डॉ. मनीषा पाटील यांनी विशाखा समिती, निर्भय कन्या अभियान, अँटी रॅगिंग समिती आणि शिस्त समिती यांच्या कार्याची माहिती दिली. महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. रॅगिंगला पूर्णतः प्रतिबंध असून विद्यार्थिनींनी कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे, असा संदेश त्यांनी दिला.

whatsapp image 2026 08 09 at 3.46.07 pm

परीक्षा विभागप्रमुख डॉ. अजित नगरकर यांनी परीक्षा प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्यापासून ते निकाल, पुनर्मूल्यांकन, प्रमाणपत्रे आणि परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी महाविद्यालय सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यानंतर प्रा. डॉ. प्रशांत रणसुरे यांनी इंडियन नॉलेज सिस्टिम (Indian Knowledge System), करिअर कट्टा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांची माहिती दिली. डिजिटल युगात यशस्वी व्हायचे असेल तर इतरांशी नव्हे तर स्वतःशी स्पर्धा करण्याची मानसिकता विकसित करावी. नियमित वाचन, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि वेळेचे प्रभावी नियोजन यामुळे यश निश्चित मिळते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.दोन दिवस चाललेल्या या इंडक्शन प्रोग्राममुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयीन जीवनाविषयी आत्मविश्वास निर्माण झाला. विविध विभागांच्या प्राध्यापकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, महाविद्यालयातील सुविधा, विद्यार्थी विकासाच्या योजना, करिअरच्या संधी आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व समजण्यास मोठी मदत झाली.

whatsapp image 2026 08 09 at 11.40.45 am

या कार्यक्रमास प्रो. डॉ. संतोष जाधव, डॉ. समाधान गांगुर्डे, डॉ.दिलीप भेरे, डॉ. ललिता सोनवणे, प्रा. सीमा ठोके, प्रा. मनोज मगर, डॉ. हिरे, प्रो. डॉ. निकम, डॉ. सुलक्षणा कोळी, प्रा. सोनल दाते, डॉ. शालिनी पाटील, डॉ. वैशाली जाधव, प्रा. ज्योती ढिकले, प्रा. गोतरणे, प्रा. योगिनी पगारे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. वैशाली दामले आणि डॉ. जयश्री शिंदे यांनी केले.

नवागत विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व क्षेत्रांची सविस्तर माहिती देणारा हा इंडक्शन प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महाविद्यालयीन जीवनाची सकारात्मक सुरुवात केली.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : रविवार दिनांक : 9 ऑगस्ट 2026