दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार, दिनांक : 22 ऑगस्ट 2026
बोईसरला १५ नव्या बसेसची भर; आता हायटेक बसस्थानक उभारण्याचा आमदार विलास तरे यांचा संकल्प

‘लालपरी’सह ५ अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण; पालघर जिल्ह्यात आतापर्यंत १०८ नवीन बसेस दाखल
पालघर (बोईसर), (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके):– बोईसर विधानसभा मतदारसंघातील नागरिक आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी तसेच आधुनिक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बोईसर आगाराला सन २०२६-२७ या वर्षासाठी एकूण १५ नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये १० पारंपरिक ‘लालपरी’ बसेससह ५ अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचा समावेश आहे. नव्याने दाखल झालेल्या ५ ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. नवीन बसेसमुळे बोईसर आगाराच्या बस ताफ्यात वाढ झाली असून, ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली आणि सुरक्षित वाहतूक सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
पालघर जिल्ह्यासाठी २०० नवीन बसेसची मागणी :
आमदार विलास तरे यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आणि मुंबईसह विविध शहरांमध्ये नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच अन्य कामांसाठी दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एस. टी. बससेवेवर मोठा ताण निर्माण होत आहे.या पार्श्वभूमीवर ५ मार्च २०२६ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानभवनात पालघर जिल्ह्यातील एस. टी. बससेवेच्या प्रश्नांवर विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पालघर जिल्ह्यातील प्रवाशांच्या समस्या, अपुऱ्या बसफेऱ्या, जुन्या बसेस आणि वाढती प्रवासी संख्या याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत पालघर जिल्ह्यासाठी २०० नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यातील वाढती वाहतूक गरज लक्षात घेऊन या मागणीला परिवहन विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली.
आठ आगारांना १०८ नवीन बसेस :
नवीन बस उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत पालघर जिल्ह्यातील विविध आगारांना आतापर्यंत मोठ्या संख्येने बसेस प्राप्त झाल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार पालघर आगाराला १५, सफाळे ९, वसई १४, अर्नाळा १०, डहाणू १५, जव्हार १५, बोईसर १५ आणि नालासोपारा १५ अशा एकूण १०८ नवीन बसेस संबंधित आगारांना मिळाल्या आहेतया नव्या बसेसमुळे जिल्ह्यातील एस. टी. महामंडळाचा बस ताफा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, विविध मार्गांवरील प्रवाशांना त्याचा थेट फायदा मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी एस. टी. ही आजही अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने नवीन बसेसच्या उपलब्धतेमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
‘राजमाता जिजाऊ’ बसेस अत्याधुनिक सुविधांनी सज्ज :
बोईसर आगाराला मिळालेल्या ५ ‘राजमाता जिजाऊ’ बसेस अत्याधुनिक बीएस-६ तंत्रज्ञानावर आधारित आहेत. या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक बसमध्ये ५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे बसच्या आतील हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार असून, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.याशिवाय प्रवाशांना प्रवासादरम्यान मोबाईल फोन चार्ज करता यावा यासाठी सीटजवळ चार्जिंग पॉइंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधुनिक जीवनशैलीत मोबाईलचा वाढता वापर लक्षात घेता ही सुविधा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे.नवीन बसेसमुळे केवळ प्रवास अधिक आरामदायी होणार नसून, सार्वजनिक वाहतुकीबाबत प्रवाशांचा विश्वास वाढण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
“हायटेक बसस्थानक उभारणे हे पुढील लक्ष्य” :
नवीन बसेसच्या लोकार्पणप्रसंगी आमदार विलास तरे यांनी बोईसरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत आपली पुढील दिशा स्पष्ट केली.“बोईसर आगाराला नवीन बसेस मिळवून देण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र, प्रवाशांना केवळ चांगल्या बसेस उपलब्ध करून देणे पुरेसे नाही. त्यांना बसस्थानकावरही आधुनिक आणि दर्जेदार सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आता बोईसरमध्ये सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज हायटेक बसस्थानक उभारणे हे माझे पुढील लक्ष्य आहे,” असे आमदार विलास तरे यांनी सांगितले.बसस्थानकात प्रवाशांसाठी स्वच्छ आणि प्रशस्त प्रतीक्षालय, आधुनिक तिकीट व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, डिजिटल माहिती फलक, बसफेऱ्यांची अद्ययावत माहिती, सुरक्षित पार्किंग व्यवस्था आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यासाठी शासन आणि परिवहन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असेही आमदार तरे यांनी सांगितले.
बोईसरच्या वाढत्या गरजेला आधुनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक :
बोईसर परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. विविध उद्योग, आस्थापना, शैक्षणिक संस्था आणि रोजगाराच्या संधींमुळे परिसरातील प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. अनेक कामगार, विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिक दररोज एस. टी. तसेच अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात.अशा परिस्थितीत बसफेऱ्यांची संख्या वाढविण्यासोबतच बसस्थानकाचा विकास करणेही आवश्यक आहे. नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थेची क्षमता वाढणार असून, आगामी काळात अधिक मार्गांवर बससेवा उपलब्ध करून देण्यास मदत होऊ शकते.विशेषतः बोईसर परिसरातून पालघर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, नालासोपारा आणि मुंबईच्या दिशेने होणारी प्रवासी वाहतूक लक्षात घेता एस. टी. सेवेचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता आहे.
प्रवाशांकडून समाधान व्यक्त :
नवीन बसेस बोईसर आगारात दाखल झाल्यामुळे नियमित प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या बसेसच्या तुलनेत नवीन बसेसमध्ये सुरक्षा आणि तांत्रिक सुविधांचा समावेश असल्याने प्रवास अधिक सुखकर होण्याची अपेक्षा आहे.नवीन बसेसचा योग्य पद्धतीने वापर करून ग्रामीण आणि शहरी भागातील महत्त्वाच्या मार्गांवर प्रवाशांच्या गरजेनुसार बसफेऱ्यांचे नियोजन करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
लोकार्पण कार्यक्रमास बोईसर आगाराचे वाहतूक निरीक्षक जाधव, किरण गावित, शिवसेनेचे अतुल देसाई, अजय दिवे, प्रभाकर विचारे काका, झाकीर सेठी, महिला संघटिका लक्ष्मी चांदणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच एस. टी. महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवीन बसेसच्या लोकार्पणामुळे बोईसरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा असून, आता हायटेक बसस्थानकाच्या मागणीचा प्रश्नही मार्गी लागण्याची आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नवीन बसेसपासून हायटेक बसस्थानकापर्यंतचा प्रवास बोईसरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणातील पुढचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार, दिनांक : 22 ऑगस्ट 2026
