दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार , दिनांक : 29 ऑगस्ट 2026

कृषी संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यात कृषी महाविद्यालयांची महत्त्वाची भूमिका; चाचडगाव येथे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

नाशिक, (प्रतिनिधी: डॉ.भागवत महाले ):– दि. २८ ऑगस्ट २०२६ : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी पारंपरिक शेती पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करणे काळाची गरज आहे. शेतीचा वाढता उत्पादनखर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी महाविद्यालयांनी संशोधनाला चालना देतानाच त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने दिंडोरी तालुक्यातील मौजे चाचडगाव येथे उभारण्यात आलेल्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील सुमारे ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे त्यांची शेतीमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची क्षमता मर्यादित आहे. दुसरीकडे शेतीचा उत्पादनखर्च सातत्याने वाढत आहे. हमीभावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार मिळत असला तरी वाढत्या खर्चाच्या तुलनेत अपेक्षित आर्थिक फायदा मिळत नाही. शेतकऱ्यांना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे.यासाठी कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांचा अभ्यास करून संशोधनाला मोठ्या प्रमाणावर चालना देणे आवश्यक आहे. कृषी महाविद्यालये ही केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी केंद्रे न राहता संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शेतकरी मार्गदर्शनाची केंद्रे बनली पाहिजेत. चाचडगाव येथील कृषी महाविद्यालयातील उपलब्ध सुविधा पाहता नाशिक जिल्ह्यात भविष्यात होणाऱ्या कृषी संशोधनामध्ये हे महाविद्यालय अग्रेसर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कृषी क्षेत्रात नाशिक जिल्हा अग्रेसर :
नाशिक जिल्ह्याच्या कृषी प्रगतीचा विशेष उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत मेहनती असून कृषी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे. जिल्ह्यात द्राक्ष, कांदा यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. देशाच्या द्राक्ष निर्यातीमध्ये नाशिक जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. आदिवासी भागातही विविध प्रकारच्या वनोपजांची निर्मिती केली जाते.शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी उत्पादन वाढविण्याबरोबरच उत्पादनखर्च कमी करणे महत्त्वाचे आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता कमी होत आहे. त्यामुळे कमी खतांचा वापर करून अधिक उत्पादन कसे घेता येईल, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. कृषी महाविद्यालयांनी जमिनीचा पोत, पिकांची गरज आणि स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना खतांचा योग्य वापर, पाणी व्यवस्थापन आणि आधुनिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शेतीत मोठी क्रांती शक्य :
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविल्यास उत्पादनखर्चात मोठी बचत करता येऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरामुळे उत्पादनखर्च २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करताना उत्पादकता ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची क्षमता आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.राज्य शासनाने देशात प्रथमच कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून ‘महाविस्तार ॲप’ तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांच्या संपूर्ण उत्पादन साखळीबाबत मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना विविध भाषांमध्ये उत्तरे मिळण्याची सुविधाही या प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.कृषी महाविद्यालयांमध्ये होणारे प्रयोग आणि संशोधन हे प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचले पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषी शिक्षण घेतल्यानंतर शेतीला प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडल्यास ग्रामीण भागात मोठी अर्थव्यवस्था उभी राहू शकते. या माध्यमातून शेतकऱ्यांसमोरील अनेक आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मविप्रचे नाशिकच्या जडणघडणीत मोठे योगदान :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचे विशेष कौतुक केले. नाशिक जिल्ह्याच्या जडणघडणीत या संस्थेचा मोलाचा वाटा असून अनेक पिढ्यांना शिक्षणाची संधी देण्याचे काम संस्थेने केले आहे. संस्थेच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नूतन इमारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणारे ज्ञानमंदिर उभे राहिले आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान आहे. संस्थेला वैभवशाली इतिहास आणि समृद्ध परंपरा लाभली असून संस्थेने अनेक नामवंत आणि यशस्वी विद्यार्थी घडविले आहेत.हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान देऊन सक्षम करणे आवश्यक आहे. कृषी तसेच कृषीशी संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करणारे विद्यार्थी, तसेच भविष्यातील कृषी शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ घडविण्याचे काम महाविद्यालयाने करावे, असे आवाहन महाजन यांनी केले.
‘मविप्र पत्रिका’ विशेषांकाचे प्रकाशन :
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मविप्र पत्रिका’च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला.यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. नूतन इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांनी संपूर्ण इमारत व परिसराची पाहणी केली.या कृषी महाविद्यालयाच्या संकुलात मुख्य महाविद्यालयीन इमारतीसह मुलांचे आणि मुलींचे स्वतंत्र वसतिगृह तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आधुनिक सुविधा आणि कृषी शिक्षणाची सांगड घालणारे हे संकुल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या सोहळ्यास अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, खासदार डॉ. शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, आमदार सीमाताई हिरे, डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, दिलीप बनकर, नितीन पवार, गोकुळ गिते, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, नाशिक महापालिकेचे उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी तसेच संस्थेचे पदाधिकारी, सभासद, नागरिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.नूतन कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून आधुनिक कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रसार ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार , दिनांक : 29 ऑगस्ट 2026
